दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 ऑगस्ट 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 29 श्रावण 1948; तिथि : अष्टमी 21:17; नक्षत्र : विशाखा 09:07;
- योग : ऐंद्र 28:24; करण : विष्टि 08:15;
- सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:04;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
दुर्गाष्टमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्रशासकीय अधिकारी आणि साहित्यिक मधुकर यार्दी
टीम अवांतर
प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या मधुकर रामराव यार्दी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1916 रोजी कोकणातल्या सुपे नावाच्या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. लहान मधुकरला सर्वोत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आईवडिलांनी कंबर कसली होती. त्यामुळे मधुकर शालेय शिक्षणासाठी कारवार आणि धुळे या ठिकाणी मोठ्या भावांकडे राहिले. 1933 साली मॅट्रीकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक घेऊन जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्यांनी प्राप्त केली.
नंतर यार्दी यांनी पुण्याला येऊन आधी फर्ग्युसन आणि नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. बी.ए. तसेच एम.एला त्यांनी कुलपती पदक (चँसलर मेडल) हे अतिशय मानाचे पदक पटकावले. प्राध्यापक रा.ना.दांडेकर, डी.डी.कोसंबी आणि डी. डब्ल्यू. केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यार्दी यांनी संस्कृत, गणित तसेच प्राच्यविद्या यांचा अभ्यास केला.
हेही वाचा – धनवापसी… मोडक आजोबांची प्रतीक्षा
1940 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा आयसीएस परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला. त्या वेळच्या मुंबई राज्यात जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द फार गाजली. पुढे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर गृह सचिव आणि वित्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. 1962 मध्ये त्यांची केंद्रीय अर्थ खात्यामध्ये नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारच्या नियोजन विभागाचे सल्लागार आणि गृह खात्यात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले. योजना आणि गृह खात्यामधील विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. केंद्रीय वित्तसचिव या पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 1974 साली ते सेवानिवृत्त झाले.
शासकीय सेवेत कार्यरत असतानासुद्धा यार्दी यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू ठेवला होता. नाशिकला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली शांकरभाष्यातील ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याआधी प्रा. कोसंबी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संख्याशास्त्राचा अभ्यास केला होता. कोसंबी आणि डॉ.कुर्तकोटी या दोन विरुद्ध विचारधारेच्या विद्वानांचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.
निवृत्तीनंतर यार्दी यांनी संस्कृतचा अभ्यास, लेखनकार्य आणि शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संस्थांच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे ते विश्वस्त होते. त्यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने पुण्यामध्ये ‘भारतीय विद्या भवन’ या संस्थेच्या केंद्राची स्थापना झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन उत्तम दर्जाच्या शाळा आणि अनेक अभ्यासक्रम सुरू झाले.
1979 मध्ये ‘दि योगा ऑफ पतंजली’ हा त्यांचा पहिला ग्रंथ भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रसिद्ध केला. महाभारत हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. महाभारताच्या अनुष्टुभ छंदाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन, या श्लोकांना संख्याशास्त्राचे निकष लावून प्रत्येक पर्वाचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केला. याआधी त्यांनी संख्याशास्त्रावर आधारित शेक्सपियरचे साहित्य अभ्यासून ‘क्रोनोलोजी ऑफ शेक्सपीयर्स प्लेज’ हा ग्रंथ तयार केला होता. त्याच पद्धतीने त्यांनी महाभारताचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले. भगवद्गीता हा सुद्धा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. ‘भगवद्गीता – ए सिंथेसिस’ हा ग्रंथ त्या संशोधनाचे फलस्वरूप ठरले. पत्नी अनुसूया हिच्यासह त्यांनी रामकृष्ण मिशन आणि शारदा मठाच्या कार्यातही रस घेतला होता. 20 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – आज नशीबाची मोठी साथ तुम्हाला मिळत असल्याची चिन्हे आहेत. व्यवसायात मोठे यश मिळेल, नोकरदार जातकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीची आता दखल घेतली जाईल. राजकारणात असलेल्यांना जनतेचा पाठिंबा मिळू शकतो. नवीन घराचे तुमचे स्वप्नही पूर्ण होताना दिसत आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, वडिलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद घ्या.
वृषभ – तुम्हाला आज एखादी दिलासादायक बातमी मिळू शकते. तुमची दीर्घकाळापासूनची चिंता हळूहळू दूर होईल. महिलांना माहेरून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अडकलेल्या कामालाही गती मिळू शकते. मात्र प्रत्येक गोष्टीवर आपले मत व्यक्त करणे आवश्यक नाही. जर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा हुशारीने वापरला, तर आजचा दिवस खूप फायदेशीर ठरेल.
मिथुन – नवीन सुरुवात करण्यासाठी अनुकूल दिवस असेल, पण घाई टाळणे महत्त्वाचे आहे. खूप दिवसांपासूनची एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असेल. वादविवाद टाळा, कारण अगदी लहानसहान गोष्टीदेखील विनाकारण मोठ्या वादात बदलू शकतात.
कर्क – आजचा दिवस सर्वसामान्य असेल, मात्र स्वच्छता, सजावट किंवा पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रफुल्लित आणि खास होईल. कायदेशीर बाबींमध्ये अधिक सावधगिरी बाळगा आणि कोणतीही कागदपत्रे किंवा प्रक्रिया हलक्यात घेऊ नका. शेजाऱ्यांशी वैयक्तिक बाबींबद्दल बोलणे टाळणे उत्तम. शांतता राखल्यास दिवस सुरळीतपणे जाईल.
सिंह – आजचा दिवस चमकण्याचा आणि पुढे जाण्याचा आहे. नवीन लोकांना भेटल्याने भविष्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने तुम्हाला अधिक शहाणपणाने पुढे जाण्यास मदत होईल. तुमची कला, सर्जनशीलता आणि एखादे विशिष्ट कौशल्य बहरेल. जुन्या कर्जातून सुटका होण्याचेही संकेत आहेत. नवीन ओळख झालेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच आपले म्हणण्याची चूक करू नका.
कन्या – तुमचे गोड शब्द आणि वागणूक आज लोकांना प्रभावित करतील. तुम्ही ज्या प्रकारे तुमचे विचार मांडता, त्यामुळे लोक सहजपणे आकर्षित होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप छान जाऊ शकतो आणि त्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. प्रवास करताना तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारी महत्त्वाची माहिती मिळू शकते. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने नवीन संधींचे दरवाजे देखील उघडू शकतात.
तुळ – आज संपत्ती आणि आत्मविश्वास या दोन्हींची तुम्हाला साथ मिळेल. सर्जनशील विचारांमुळे नवीन यश मिळवू शकाल. भागीदारीच्या प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, कारण त्यांना पैशांची परतफेड करणे कठीण होऊ शकते. इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे ठरेल. हा अनुभव तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करेल.
वृश्चिक – तुमचा आत्मविश्वास लोकांचे लक्ष वेधून घेईल. मेहनतीचे फळ मिळाल्याने आनंद होईल आणि दीर्घकाळापासूनची चिंता कमी होऊ शकते. वडिलांच्या आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दबावाखाली असताना मोठे धोके पत्करणे टाळा. कामाच्या ठिकाणी निश्चितच दबाव असेल, परंतु तुमची क्षमता तुम्हाला प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास मदत करेल.
हेही वाचा – भूक लागत नाही?
धनु – आजचा दिवस आनंद घेऊन येईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक परिस्थितीत संयम राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कठोर परिश्रमानंतरही, निकाल तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी लागू शकतात, पण याला अपयश समजू नका. कोणतेही वचन देण्यापूर्वी, आपल्या परिस्थितीचे आणि क्षमतांचे मूल्यांकन नक्की करा.
मकर – आज तुम्हाला छंद पूर्ण करण्यासाठी, वेळ घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटची काळजी घ्या. कुटुंबात मालमत्तेसंदर्भात चर्चा किंवा उलथापालथ होऊ शकते. इतरांच्या कामात विनाकारण गुंतण्याऐवजी, आपल्या स्वतःच्या कामावर आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे उत्तम राहील.
कुंभ – नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज एक चांगली संधी मिळू शकते. कामातील तुमची मेहनत तुमच्या बॉसला प्रभावित करेल. तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. इतरांना मदत करण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. खर्च नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रवासादरम्यान वाहनाशी संबंधित समस्येमुळे खर्च अचानक वाढू शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
मीन – रागावर नियंत्रण ठेवणे आज महत्त्वाचे ठरेल. बोलण्यात संयम ठेवा, कारण तुमच्या बोलण्यावरून गैरसमज होऊन प्रकरण चिघळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला थोडा संयम बाळगावा लागेल. कोणतीही माहिती पडताळून पाहिल्याशिवाय इतरांना देऊ नका, कारण यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. शासकीय कामात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करताना संयम बाळगा. संततीला दिलेली कोणतीही वचने नक्की पूर्ण करा; यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि दृढता वाढेल


