दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 25 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्थी 16:52; नक्षत्र : हस्त 27:50;
- योग : साध्य 28:07; करण : बव 28:50;
- सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:07;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
विनायक चतुर्थी
ऋक् हिरण्यकेशी श्रावणी
दुर्गा गणपती व्रत
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार
टीम अवांतर
संगीत रंगभूमी गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म 16 ऑगस्ट 1952 रोजी पुण्यात झाला. जयमाला आणि जयराम शिलेदार हे कीर्ती यांचे आई आणि वडील. हे दोघेही मराठी संगीत रंगभूमीवरील गायक, अभिनेते असल्याने संगीत आणि अभिनयाचे संस्कार त्यांच्यावर जन्मापासूनच झाले.
शिलेदारांच्या त्रिपात्री सौभद्रपासून कीर्ती शिलेदारांचे वयाच्या दहाव्या वर्षी संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकात नारदाची भूमिका त्यांनी साकारली होती. या भूमिकेने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील बी.ए.ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी घेतली.
हेही वाचा – भिऊ नकोस, मी आहे!
शिलेदार घराण्याचा वारसा पुढे चालवत कीर्ती शिलेदार यांनी एकंदर 27 संगीत नाटकांमधून 34 भूमिका साकारल्या. साधारणपणे साडेचार हजारांवर त्यांच्या संगीत नाटकांचे प्रयोग झाले. मराठी रसिकांसाठी त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांच्या संगीत मराठी नाटकातील सर्वच भूमिका गाजल्या.
बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने त्यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. आपल्या आई, वडिलांच्या संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार होत्या.
आपली मोठी बहीण लता शिलेदार (दीप्ती भोगले) यांच्या ‘संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही शिलेदार यांनी केले. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि काळानुरूप नावीन्याचा अंतर्भाव त्यांच्या संगीत नाटकात आणि संगीतातही दिसतो.
कीर्ती शिलेदार यांनी स्वर-ताल-शब्दसंगती हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध देखील लिहिला. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता.
हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन.एस.डी.तर्फे सादर करण्यात आलेल्या एकच प्याला या नाट्यप्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. याशिवाय, संगीत शारदा या नाटकाचा हिंदी नाट्यांश देखील त्यांनी सादर केला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘मम सुखाची ठेव’ हा लघुपट त्यांच्या भगिनी दीप्ती भोगले यांनी तयार केला आहे.
2014 सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कृत बालगंधर्व पुरस्कार, नाट्यदर्पण रजनीचा नाट्यव्रती सन्मान, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केले. 22 जानेवारी 2022 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.


