दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 12 ऑगस्ट 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 21 श्रावण शके 1948; तिथि : अमावस्या 23:06; नक्षत्र : पुष्य 07:59, आश्र्लेषा 30:06;
- योग : व्यतिपात 15:25; करण : चतुष्पाद 12:27;
- सूर्य : कर्क; चंद्र : कर्क 30:06; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:09;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
दर्श अमावस्या समाप्ती रात्रौ 11:06
दीपपूजन
खग्रास सूर्यग्रहण (भारतातून दिसणार नाही)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन
टीम अवांतर
भारतीयांमध्ये वाचनसंस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिलेल्या एस. आर. रंगनाथन यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 रोजी मद्रास प्रांतातील (सध्याचे चेन्नई) तंजावर जिल्ह्याच्या शियाळी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शियाळी येथील हिंदू हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी संस्कृत वाङ्मयाचे देखील अध्ययन सुरू केले होते. नंतर मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी इंग्रजी विषयात बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
शिक्षण घेणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यामुळे रंगनाथन यांनी त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे अध्यापनशास्त्राची ‘एल. टी.’ परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि गणिताचे प्राध्यापक बनले. मात्र नंतर प्राध्यापकाची नोकरी सोडून ते मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहू लागले.
हेही वाचा – स्वत:ला सांभाळूया…
ग्रंथालयशास्त्राचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी मद्रास विद्यापीठाने स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. रंगनाथन यांनी 1928मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना करून भारतातल्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. 1931मध्ये त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ ‘द फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’ प्रसिद्ध झाला. भारतीय ग्रंथालयांची चौकट रंगनाथन यांनी दिलेल्या या पाच सिद्धांतावरच आधारित आहे. हे नियम वरवर पाहता अत्यंत साधे वाटू शकतात, पण त्यामुळे भारतातल्या ग्रंथालयांना कलाटणीच मिळाली. कारण, सामान्य वाचकाचा विचार करून त्यांनी ही तत्वं मांडली आहेत.
1931 ते 1967 या काळात त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. ग्रंथालय आणि माहितीशास्त्रावरील त्यांची 65 पुस्तके आणि 2500 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. या विषयावर इतके विपुल लिखाण केलेले ते जगातील एकमेव अभ्यासक होते.
भारतात जर ग्रंथालयांची संख्या वाढवायची असेल तर, ग्रंथपाल देखील लागणार, त्यासाठी भारतातच याविषयीचे पदवी प्रशिक्षण मिळावे, असे त्यांना वाटू लागले. यातूनच मद्रास विद्यापीठात त्यांच्या पुढाकाराने ग्रंथालयाशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू झाला. पुढे बनारस हिंदू विद्यापीठातही त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला. 1945मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी रंगनाथन यांची नियुक्ती बनारस विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून केली. पुढील दोन वर्षं ते या ठिकाणीच राहिले.
भारतात ग्रंथालयाची चळवळ ही सरकारी अनुदानाशिवाय उभी राहू शकत नाही, ही गोष्ट त्यांनी सुरुवातीलाच हेरली. त्यामुळेच पूर्ण देशभरातच असा कायदा असावा, ज्यामुळे ग्रंथालयांचे नियमन आणि व्यवस्थापन सुलभ होऊन ग्रंथालयं सर्वांसाठी खुले होतील, असा विचार त्यांनी केला. त्यानुसार 1930 साली त्यांनी हा विचार पहिल्यांदा सार्वजनिकरित्या मांडला. अर्थात, भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक राज्यांनी ग्रंथालय विधेयक मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली.
आशिया, युरोप, अमेरिका या खंडांतील अनेक देशांमधून त्यांनी ग्रंथालयशास्त्र या विषयावर व्याख्याने दिली. युनो, युनेस्को, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन यासारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांची निवड झाली होती. तिथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. 1957मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. 1964 साली अमेरिकेतील पीटर्सबर्ग विद्यापीठाकडून “डीलिट’ने त्यांना सन्मानित करण्यात आले. तालिकीकरण आणि वर्गीकरण या विषयातील संशोधनासाठी 1970 साली अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने त्यांना “मार्गरेड मॅन’ हा पुरस्कार दिला. 27 सप्टेंबर 1972 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – संमिश्र परिणाम देणारा आजचा दिवस असेल. कामाचा ताण थोडा जास्त असेल, पण जबाबदारी स्वीकारण्याची सवय तुम्हाला कोणत्याही आव्हानावर मात करण्यास मदत करेल. न्यायालयीन बाबींमध्ये काही विलंब किंवा अडथळे येऊ शकतात, त्यामुळे अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. खर्च वाढेल, पण भविष्यासाठी बचत करण्याचा विचारही दृढ होईल. पैशांसंबंधीचे निर्णय घाईने घेणे टाळा. एका लहानशा निष्काळजीपणामुळेही मोठे नुकसान होऊ शकते.
वृषभ – संयम, सहनशीलता आणि समजूतदारपणा हे तीन गुण तुमचे सर्वात मोठ्या सामर्थ्याचे ठरतील. नवीन ठिकाणी प्रवास करण्याऐवजी किंवा मोठे निर्णय घेण्याऐवजी, स्वतःच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. गोड शब्दांनी लोकांची मने जिंकाल. रुचकर मेजवानी, कुटुंबाची सोबत आणि काही निवांत क्षण यामुळे तुमचा दिवस खास बनेल.
मिथुन – आज नव्या आशा आणि नव्या संधींची सुरुवात होत आहे. काही आव्हाने निश्चितपणे येतील, पण विवेकबुद्धी आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही त्यावर सहज मात कराल. भूतकाळातील चुकांमधून शिकणे खूप उपयुक्त ठरेल. नवीन उपक्रम सुरू करणे ही एक चांगली कल्पना आहे, परंतु योग्य वेळी आणि सविस्तर योजनेनंतरच पुढे जा. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आपली कौशल्ये सुधारण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतील.
कर्क – आजचा दिवस नोकरदारांसाठी खूप अनुकूल असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील. बढती, प्रशंसा किंवा नवीन जबाबदाऱ्या यासारख्या चांगल्या बातम्यांमुळे तुमचा उत्साह वाढू शकतो. महिलांना माहेराहून आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत कोणाच्याही सल्ल्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळेच भविष्यात फायदा होईल.
सिंह – यशाचे नवीन मार्ग आज खुले होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. व्यवसायातील नवीन योजना सकारात्मक परिणाम देतील. कोणत्याही कामात घाई करू नका. मामाच्या बाजूने आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात विश्वास आणि सामंजस्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कन्या – कामाबाबत निष्काळजीपणा करू नका. स्वतःच्या जबाबदाऱ्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यास, सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. अनोळखी व्यक्तींच्या प्रभावाखाली कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी भविष्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.
तुळ – आज प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सकाळीच जोडीदाराकडून एखादे सुखद आश्चर्य किंवा आनंदाची बातमी मिळेल. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा. दुसऱ्याचे वाहन चालवणे शक्यतो टाळा. वैयक्तिक आणि आरामदायी वस्तूंवरील खर्च वाढू शकतो. लग्न किंवा कुटुंबातील शुभ प्रसंगाशी संबंधित आनंदाची बातमी घरातील वातावरण प्रफुल्लित करेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन केले जाईल.
वृश्चिक – आजचा दिवस दिलासा आणि समाधानाची भावना घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी एखादे अवघड काम पूर्ण करण्यासाठी टीमकडून किंवा कनिष्ठ सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. त्यामुळे अखेरीस यश तुमचेच असेल. अनावश्यक खर्चात कपात केल्याने आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होऊ शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने मनःशांती मिळेल. संततीच्या संगतीकडे आणि त्यांच्या उपक्रमांकडे थोडे लक्ष देणे आवश्यक ठरेल.
हेही वाचा – माझे आजी-आजोबा आणि गणगोत
धनु – तुमच्यावर आज नवीन जबाबदाऱ्या येतील आणि तुम्ही त्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न कराल. रोजच्या धावपळीमुळे थोडा थकवा जाणवू शकतो, पण ताण हळूहळू कमी होईल. खर्च वाढलेला असूनही, तुमची ऊर्जा आणि उत्साह जराही कमी होणार नाही. जोडीदार प्रत्येक पावलावर तुम्हाला साथ देईल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वडीलधाऱ्यांचा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल.
मकर – प्रत्येक पाऊल आज काळजीपूर्वक उचलावे लागेल. कायदेशीर बाबींमध्ये काही अडथळे येऊ शकतात, परंतु संयम आणि योग्य रणनीतीने तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना, भावनांऐवजी तर्क आणि विवेकबुद्धीचा वापर करा. शांतपणे घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे अवघड विषयसुद्धा सोपे वाटतील.
कुंभ – तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये आज इतरांना प्रभावित करतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या, पदे किंवा सन्मान मिळण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. एक मोठी इच्छा पूर्ण झाल्याने आनंद मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली प्रगती आता पुन्हा मार्गी लागत असल्याचे दिसत आहे. सरकारी कामात निष्काळजीपणा टाळा.
मीन – प्रत्येक कामात आज संतुलन आणि संयम राखणे आवश्यक आहे. तुम्हाला उत्पन्नवाढीच्या चांगल्या संधी मिळतील, पण त्याच गतीने खर्चही वाढू शकतो, त्यामुळे बजेटकडे लक्ष द्या. वडिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांची नियमितपणे काळजी घ्या. विरोधकांच्या अफवांकडे लक्ष देण्याऐवजी, तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. शहाणपणाने आणि शांतपणे घेतलेल्या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम दिसतील आणि सर्व समस्या हळूहळू नाहीशा होतील.


