नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
खरंतर आजकाल घराघरात कलाकार जन्माला येत असतो. प्रत्येकाला सुपरस्टार व्हायचं असतं. एखाद्याला छोटं-मोठं काम मिळालंच तर, स्वतःला ‘सुपरस्टार’ समजायला लागतात. तसे तर, आजकाल काम मिळवून देणारे कितीतरी एजंट्स आहेत. 20 टक्के – 25 टक्के घेऊन ते लोक काम मिळवून देतात. पण काम करणारे खरंच कलाकार आहेत का, स्वतःला फक्त समजणारे आहेत. त्यामुळे काम मिळण्याआधी पैसे घेणारे आणि देणारे आहेत. मग त्यात कितीतरी जण फसवले जातात.
मधे एक मुलगा मला भेटला होता. म्हणाला, मॅडम तुमच्यासोबत मी नवीन सिनेमा करतोय. मला आश्चर्य वाटलं. माझं तर कोणाशी बोलणं पण सुरू नव्हतं, नव्या सिनेमाबाबत! वर त्याने मला अजून एक सांगितले की, त्याने माझ्यासोबत त्या सिनेमात काम करण्यासाठी कुठल्याशा ऑफिसमध्ये 50 हजार रुपये दिले होते. मी मात्र त्याच्या उत्साहावर पाणी फिरवलं… “मी असा कोणताही सिनेमा करत नाहीये अणि तुम्ही सांगताय त्या माणसाला मी ओळखत पण नाहीये. ज्यांना तुम्ही एवढे पैसे दिलेत ते परत घ्या,” असं मी त्याला समजवायचा प्रयत्न केला.
हेही वाचा – Flirting… काही असेही अनुभव!
पण तो आपलं घोडं पुढेच दामटवत होता… “अशा कशा ओळखत नाही तुम्ही त्या सरांना? त्यांच्या ऑफिसमध्ये तुमचा केवढा मोठा फोटो लावलाय त्या सरांसोबत…!”
झालं. आता टेन्शन घ्यायची वेळ माझी होती. मी विचारात पडले की, बाई कोण असावा हा माणूस? त्या मुलाने त्याच्या मोबाईलमधला आमचा फोटो दाखवला. बरं, मला तो फोटो बघून काही आठवेच ना की, हा माणूस कोण? मी याच्यासोबत कधी कुठं फोटो काढला होता? कारण, बरेचदा कुठेही अगदी, ट्रेनमध्ये, बसमध्ये, मेट्रोमध्ये, मार्केटमध्ये, लग्नकार्यात… एवढंच काय कोणाच्या मयताला गेलं की, तिथे सुद्धा लोक ओळख दाखवतात, सेल्फी काढतात. काही ठिकाणी असे अगदीच लाजिरवाणे होतं… अशाच कोणीतरी माझ्यासोबत काढलेला सेल्फी मस्तपैकी अशा कामासाठी वापरला होता!
हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!
खूप विचार केला की, कोणी रस्त्यात ओळख दाखवून थांबवतात. आपली चौकशी करतात, कौतुक करतात. सेल्फी मागतात… बाकी सगळ ठीक आहे. प्रश्न हा आहे की, मग सेल्फी काढायचा का? पुन्हा कोणीतरी काहीतरी गडबड केली तर? पण सगळे जण असली कामं करणारे नसतात. शिवाय, प्रेक्षक म्हणजे आपले मायबाप. ते आहेत म्हणून आपण आहोत. मागितला सेल्फी देऊन टाकायचा. बाकी काय होईल, ते स्वामी बघून घेतील.
पण एक गोष्ट नक्की, पैसे देऊन कोणालाही काम मिळत नाही, असे बोलणारे लोक पैसे घेऊन काम न देता गायब होतात. सावध रहा, योग्य व्यक्ती तुम्हाला नक्कीच काम देऊ शकतात. काळजी घ्या…


