नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
माझी एक मैत्रीण आहे… छोटी मैत्रीण, सहकलाकार, मुलगी… सगळंच. खूप छान अभिनेत्री, सशक्त निर्माती, धडाडीची राजकारणी, उत्तम मैत्रीण आणि परफेक्ट आई! अजून एक महत्त्वाची ओळख – मराठी ‘बिग बॉस’ पहिल्या सीझनची विजेती!! अशी माझी लाडकी व्यक्ती म्हणजे मेघा धाडे. तशी ती खूप लहान असताना घर, शहर सोडून करिअर करण्यासाठी मुंबईत आली. खूप मेहनत केली. तेव्हा कुठे ती ‘The Megha Dhade’ म्हणून नावारूपाला आली. स्वभावाने कडक, शिस्तप्रिय आणि फटकळ. गोरीपान, देखणी, कमी वयाची आणि एकटी मुलगी, काही बेशिस्त आणि अव्यवहारी लोकांशी जराशी दोन हात लांब राहूनच नावारूपाला आली…
शिवाय, लहान वयातच सिंगल पॅरेंट म्हणून लाडक्या लेकीची, साक्षीची, जबाबदारी नीट पार पाडली. त्याकरिता तिलाही जबाबदारीने वागणं भाग होतं. तिने तिच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या. पण कोणतीही गोष्ट तिला सहज नाही मिळाली. मेहनत अटळ… मात्र, तिने ती केली!
हेही वाचा – गुरू अन् शिष्याची घट्ट ‘वीण’
बरं, मुलगी एवढी गोड आहे की, जर कुठे तिने मला बघितलं, माझं लक्ष नसेल तरी आवर्जून हाक मारणार. आम्ही दोघींनी एका सीरियलमध्ये काम केलं होतं. त्यात मी तिला खूप छळायचे. एका सीनमध्ये तर, मी तिला जमिनीवर पाडते आणि हात धरून फरपटत घराबाहेर हाकलते… त्या धावपळीत तिची काचेची बांगडी फुटली. काच लागून तिच्या हातातून रक्त आलं. सीन झाला, तशी मी मेकअप रूममध्ये जाऊन खूप रडले. तर ही बया माझ्या मागे मला समजवायला आली.
त्याच दरम्यान तिची निर्मिती असलेला सिनेमा – ‘सुपरस्टार’ प्रदर्शित झाला. त्याच्या पहिल्या शोला बऱ्याच लोकांना निमंत्रणं गेली. त्यात मलाही निमंत्रण होतं. हॉलमध्ये सामोरासमोर आल्यावर आम्ही दोघींनी एकमेकींना मिठी मारली. तिची लेक तेव्हा बहुतेक 5-6 वर्षांची होती. तिने रागाने मला ढकललं आणि मेघाला म्हणाली, “मम्मा, ही तुला एवढा त्रास देते तरी तू तिचे लाड काय करतेस?” आज ती साक्षी पण खूप मोठी झालीय.
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…
अशी आमची दोस्ती. नियमितपणे भेटत नाही, बोलत नाही तरी, दोस्ती मात्र घट्ट! तिची एक भावनिक आठवण सांगते… ती भाजपामध्ये बऱ्यापैकी मोठ्या पोस्टवर आहे. जेव्हा माझा पक्षप्रवेश झाला, तेव्हा इतर बऱ्याच लोकांचाही पक्षप्रवेश झाला होता. सगळ्यांना पक्षात ‘Welcome’ करण्यासाठी गळ्यात स्टोल (Stole) आणि गुलाबचं फूल देऊन सत्कार केला जात होता. नेमका माझा नंबर आला. नाव पुकारल आणि स्टोल संपले. थोडा वेळ थांबवं लागणार होतं… स्टोलचा बॉक्स येईपर्यंत. तेवढ्यात मेघाने तिच्या गळ्यातला स्टोल काढून तत्कालीन पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हातात दिला आणि म्हणाली, “साहेब, हे घाला ताईच्या गळ्यात.” साहेब म्हणाले की, “थोडं थांबूया. हा स्टोल तुमचा मान आहे.” तेव्हा मेघा म्हणाली, “साहेब, आम्ही मुली न आईच्या प्रत्येक लहान मोठ्या कोणत्याही वस्तूवर आपला हक्क गाजवत असतो. आज आईचा सत्कार लेकीच्या वस्त्राने होऊ दे…!” बावनकुळे साहेब एकदम खूश झाले. माझ्या गंगा-यमुनेला वाहा, असं सांगायची गरजच नव्हती.
अशी माझी मेघा… कितीही मोठी झाली तरी माझ्यासाठी कायम छोटी मैत्रीण राहील.


