“काकू, कसली काळजी करताय?” घरात प्रवेश करताच नेहाने विचारले.
“नेहा अगं, राज म्हणजे तुझे काका एक तारखेला घरात खूपच कमी पैसे आणतात. ते कशावर एवढा खर्च करत असतील, याचा मी विचार करत होते, आणि या आठवड्यात तर मला धक्काच बसला. अगं, गेले दोन-तीन दिवस ते चक्क पिऊन घरी येताहेत, कसाबसा स्वतःचा तोल सांभाळत!”
“काकू, राज काका कोणत्या कंपनीत काम करतात?” नेहाने विचारले.
“अगं, टिळक रोडवर, एस. पी. कॉलेजजवळच्या भाटिया इंटरनॅशनल कंपनीत काम करतात ते.”
“काका कधीपासून काम करतात तिथे?”
“अगं, सहा महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यानंतर चार महिने घरीच होते आणि गेल्या दोन महिन्यांपासून या कंपनीत लागलेत. एवढी मोठी कंपनी, पण खूपच कमी पगार देतात, असं ते मला सांगतात. परंतु माझा त्यांच्यावर विश्वासच नाही. ते नक्की बाहेरच पैसे उडवत असतील.”
टेबलवरील फोटो पाहून नेहाने विचारले, “काकू, हे कोण?”
“अगं, हेच की तुझे काका. हो, पण तू कशी ओळखणार त्यांना? तू प्रथमच तर आलीस आमच्या घरी. तुझ्या आईची आणि माझी ओळखच तर मागच्या महिन्यात झाली.”
हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम
गेले दोन आठवडे नेहा भाटिया इंटरनॅशनल कंपनीत ऑडिटसाठी जात होती. तिने राज काकांना कंपनीत कधीच पाहिले नव्हते. एवढेच नव्हे, तर भाटिया इंटरनॅशनल कंपनीत पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणीही कर्मचारी नव्हता. शिवाय, कंपनीत एकही व्यक्ती कॉन्ट्रॅक्टवर नव्हती. असे असताना राज काका या कंपनीत दोन महिन्यांपासून काम करत आहेत, हे कसे शक्य आहे?
“काका सकाळी ऑफिसला किती वाजता जातात आणि केव्हा परत येतात?” नेहाने विचारले.
“ते सकाळी बरोबर नऊ वाजता घरातून निघतात आणि संध्याकाळी साडेसहा वाजता घरी परत येतात.”
“येईन मी कधीतरी काकांना भेटायला,” असे म्हणत नेहाने काकूंचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेनऊ वाजताच नेहा काकूंच्या घराजवळ येऊन थांबली. बरोबर नऊ वाजता काका घराबाहेर पडले. नेहाही त्यांच्या मागे निघाली. साधारण अडीच किलोमीटर चालल्यानंतर काका भाटिया इंटरनॅशनल कंपनीसमोरील सिटी लायब्ररीत गेले. नेहा चालून चालून थकली होती.
“गुड मॉर्निंग, काका,” म्हणत लायब्ररियनने त्यांचे स्वागत केले.
लायब्ररीतील एका कोपऱ्यात जाऊन पुस्तके चाळताना नेहाचे लक्ष काकांवरच होते.
थोड्या वेळाने एक कॉलेजकन्या आली आणि तिने काकांना एक फाइल दिली. त्यानंतर आलेल्या दोन-तीन मुला-मुलींनीही काकांना फाइल्स दिल्या. काका संगणकावर टायपिंग करण्यात मग्न होते.
साधारण एक वाजता काका लायब्ररीतून बाहेर पडले.
“बहुतेक जेवायला जात असतील,” असे म्हणत नेहाही त्यांच्या मागे गेली.
बाजूच्या दुकानातून काकांनी पाच रुपयांचा बिस्किटांचा पुडा घेतला. बिस्किटे खाऊन ते पुन्हा लायब्ररीत परतले आणि टायपिंग सुरू केले.
थोड्यावेळाने नेहा काकांजवळ गेली आणि तिच्या डब्यातील एक पराठा त्यांना देऊ केला.
“नको बेटा, आत्ताच तर भरपेट जेवण केलं,” काका म्हणाले.
“काका, काय करताय तुम्ही?”
“प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करून कॉलेजच्या मुला-मुलींना ई-मेल करायचे आहेत. उद्या त्यांचा सबमिशनचा शेवटचा दिवस आहे.”
थोड्यावेळाने आलेला चहा नेहाने आग्रहाने काकांना दिला. चहा पिता-पिता काकांनी आपली कहाणी सांगितली.
पस्तीस वर्षे खासगी कंपनीत नोकरी करून काका निवृत्त झाले होते. ग्रॅच्युइटी आणि प्रॉव्हिडंट फंडाचे मिळालेले वीस लाख रुपये ते फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार होते. त्याच दिवशी काकूंचा भाऊ वरद आला.
“दोन महिन्यांत वीस लाखांचे तीस लाख करून देतो,” असे आमिष त्याने दाखवले.
काकांना ते पटले नाही; पण काकूंच्या आग्रहापुढे त्यांचे काहीच चालले नाही.
दोन महिन्यांनी वरदने, “शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले. तुमच्या वीस लाखांचे दोन लाख झालेत,” असे सांगत काकांना दोन लाख रुपये दिले.
“माझा भाऊ किती प्रामाणिक! दुसरा कुणी असता, तर दोन लाख रुपये त्याच्या कष्टाचा मोबदला म्हणून ठेवून घेतले असते,” असे म्हणत काकूंनी भावाच्या घोडचुकीवर पांघरूण घातले.
हेही वाचा – आभास… की वास्तव?
आधीच केलेल्या गुंतवणुकीमुळे काकांना दरमहा पंधरा हजार रुपये मिळत होते; पण काकूंच्या खर्चिक स्वभावामुळे ते अपुरे पडत होते. मागच्या महिन्यात तर त्यांनी कळसच केला. बहिणीसाठी आठ हजारांची साडी, भावाच्या मुलासाठी फरसाण म्हणत मिठाई, फरसाण आणि ड्रायफ्रूट्सवर बाराशे रुपये उडवले. काकांची नोकरी असताना हे परवडत होते; पण आता नाही, याची जाणीव काकूंना नव्हती.
या वयात काकांनी पुन्हा नोकरी शोधायचा प्रयत्न केला; पण कुठेच नोकरी मिळत नव्हती.
“तुम्ही दिवसभर घरीच असता. तुमच्यासाठी तीन-चार वेळा चहा, नाश्ता, जेवण करावं लागतं. तरीही या माणसाला माझी कवडीच किंमत नाही. नुसता बसून असतो, आळशी कुठला!” अशी काकूंची कुरकुर सुरू होती.
काकांनी नाश्ता आणि चहा घेणे बंद केले, जेवणही कमी केले, सर्व आवडी-निवडी बाजूला ठेवल्या; तरीही काकूंची कुरकुर थांबली नाही. शेवटी काकांनी भाटिया इंटरनॅशनल कंपनीत नोकरी लागली, असे खोटे सांगितले. आता ते दिवसभर घराबाहेर राहू लागले. एके दिवशी ते सिटी लायब्ररीत गेले. लायब्ररीत सार्वजनिक वापरासाठी तीन संगणक ठेवले होते. कॉलेजमधील एका मुलीशी त्यांची ओळख झाली. काकांनी तिचा प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करून दिला. तिने आग्रहाने त्याचा मोबदला दिला आणि तिच्या इतर मित्र-मैत्रिणींनाही काकांकडे पाठवले. काकांना थोडेफार पैसे मिळू लागले; अर्थातच ते कंपनीतील पगाराच्या तुलनेत तुटपुंजे होते.
पैसे वाचवण्यासाठी काका चालत जात-येत. लायब्ररीजवळील मंदिरातील अन्नछत्रात मिळेल ते खाऊन पोट भरत. अपुऱ्या आहारामुळे त्यांची तब्येत ढासळली. चार दिवस मंदिर बंद असल्यामुळे ते पाच रुपयांच्या बिस्किटांवर दिवस काढत होते. त्यामुळे चालताना त्यांचा तोल जात होता. काकूंनी मात्र त्याला व्यसन समजले.
हे ऐकताना नेहाच्या डोळ्यांत पाणी आले.
सहा वाजता काका घरी निघाले.
“काका, मी तुम्हाला सोडते,” म्हणत नेहाने त्यांना रिक्षात बसवले.
“अय्या काका, हेच तुमचं घर का? मी काकूंना ओळखते,” म्हणत नेहाही घरात शिरली.
काका आत गेल्यावर नेहाने काकूंना सर्व सांगितले. काकूंचा गैरसमज दूर झाला.
हेही वाचा – दिसलीस तू फुलले ऋतू…
“काका, आता तुम्हाला लायब्ररीत जायची गरज नाही. तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन मला मदत करा. मी तुम्हाला चांगला पगार देईन. उद्यापासूनच या,” नेहाने सांगितले.
“आमच्या ऑफिसमध्ये चहा, नाश्ता आणि जेवणही असतं,” असे म्हणत तिने काकूंना लाजवले.
“परमेश्वरानेच तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं,” असे म्हणत साश्रूनयनांनी काकांनी नेहाला हात जोडले.
थोड्यावेळाने काकू भावाकडे जाताना पर्स विसरल्या. पार्किंगमध्ये भावाला रिक्षाचे पंच्याहत्तर रुपये द्यायला सांगितले.
“माझ्याकडे कॅश नाही,” म्हणत भावाने हात झटकले.
तेवढ्यात सोसायटीतील राजच्या मित्राने पैसे दिले आणि काकूंना शंभर रुपये देत म्हणाला, “वहिनी, परत जायला लागतील.”
“भाऊजी, निवृत्तीनंतर कसं चाललंय? काय करता तुम्ही?” काकूंनी विचारले.
“काही नाही वहिनी. मस्त खाणे-पिणे, मित्रांना भेटणे, मनसोक्त झोपणे… अगदी आराम चालू आहे. सर्वच वेळ रिकामा असल्याने छंद जोपासतो. जे आयुष्यात करायचे राहून गेले ते करतो. फुल एन्जॉय करतो. ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये टाकली आहे. त्याच्या व्याजावर छान जगतोय,” असे म्हणताना भाऊजी फ्रेश दिसत होते.
निवृत्तीनंतरही नोकरीसाठी धडपड करणारा, बायकोला त्याच्या खाण्यापिण्याचा त्रास होऊ नये म्हणून दिवसभर घराबाहेर राहणारा, अन्नछत्रात मिळेल त्या अन्नावर भूक भागवणारा, बसचे भाडे वाचवण्यासाठी पायी जाणारा आपला नवरा राज चुकतोय की आपण? या विचाराने काकू शरमल्या.
“राज, काय करतोस?” त्यांनी फोन केला.
“उद्या ऑफिसला जायचं आहे ना, म्हणून तयारी करतोय,” राज म्हणाला.
साठी पार केली तरीही राज स्वतःला पुनश्च घाण्याच्या बैलासारखे जुंपून घ्यायला तयार होता. शरीराने नव्हे, तर मनाने तो फ्रेश होता. प्रतिकूल परिस्थितीतही तो रडत नव्हता, तर लढत होता.
आपल्या भावाच्या चुकीमुळे आणि स्वतःच्या अति खर्चिकपणामुळे राजवर पुनश्च नोकरी करण्याची वेळ आल्याचा काकूंना पश्चात्ताप झाला. अनावश्यक खर्च थांबवून राजला निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्याच्या आवडीप्रमाणे जगू द्यायचे, असा निर्धार करूनच त्या घरी परतल्या.


