भाग – 17
रेवतीसोबत घरी आलेली जुईली बरीच खुलली होती. घरी आल्या आल्या चक्क हसली! आई-बाबा बघतच राहिले. त्यांना बरं वाटलं खरं, पण एकाएकी झालं काय एवढं… त्यांनाही हा प्रश्न पडला. काही वेळ सर्वांशी गप्पा मारून रेवती जायला निघाली. आईने तिला जेवायला थांबायचा आग्रह केला तरीही, ‘महत्त्वाचं काम आहे,’ असं म्हणून तिने जुईलीला डोळा मारला आणि ती निघालीच.
रेवतीचा निरोप घेऊन जुईलीने हात-पाय धुतले आणि स्पीकरवर गाणं लावलं. सलीलनेच संगीत दिलेलं…
माझ्या मना रे ऐक जरा
हळवेपणा हा नाही बरा
ती गुणगुणतच खिडकीत बसून विचार करू लागली…
खरंतर, तिला थोडी भीती वाटत होती. असं कसं जायचं ना एकाएकी!
‘हा इतका इग्नोर करतोय मला… मग त्याने ओळखच नाकारली तर?’
‘नाही, नाही, असं काही व्हायचं नाही… एवढी तरी त्याला मी ओळखतेच!’
‘किंवा काहीच नाही तर तो अजून कुणासोबत दिसला तर? बापरे! कसं काय हॅन्डल करणार हे सगळं मी?’
पण एक मन म्हणत होतं, ‘तो धावत येईल आणि मिठीत समावेल.’
‘देवा! कसं व्हायचं हे सगळं… छे! कसं एकाएकी सगळं बदलत गेलं हे… किती छान दिवस होते ते…’
हेही वाचा – रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू
0000
सूर्य अस्ताला गेला तेव्हाच जुईलीची श्रीच्या तावडीतून सुटका झाली.
“जुये… माझं तुझ्यावर खूप, खूप, खूप प्रेम आहे!” श्रीने जुईलीच्या कानात सांगितलं. जुईली लाजून गुलाबी झाली की, सूर्यास्ताच्या लालीने ती लाल-गुलाबी दिसत होती, तेच कळेना!
“माझं पण तुझ्यावर खूप, खूप, खूप प्रेम आहे माझ्या जीवा!” जुईलीनेही श्रीच्या कानात हळूच सांगितलं.
दोघांनीही हातात हात गुंफले आणि कितीतरी वेळ किनाऱ्यावरून चालत राहिले. खूप बोलत राहिले. जुईली चालताना पायात येणारे शंख-शिंपले गोळा करत होती. दूर दूर कुठे कुठे दिवे चमकत होते. समुद्रावर असलेल्या एका ‘खुर्सा’कडे दोघेही थांबले. तिथल्या बाकड्यावर बसून दोघांनीही एक दिवस कधीतरी समुद्राच्या सोबतीने, लाटांचा आवाज ऐकत पहाटेपर्यंत जागायचं ठरवलं. जुईलीने श्रीच्या खांद्यावर डोकं टेकवलं. श्रीने तिला जवळ ओढलं आणि तिच्या खांद्यावर हात टाकून तिच्या केसांत बोटं फिरवू लागला.
“श्री, ऐक ना… तू मला सोडून नको ना जाऊ…”
“अगं मी कधी तुला सोडून गेलो? मी आहे तिथेच आहे!”
“नाही… तू जातोस. अगदी मला विसरून जातोस तू. मी वाट बघत असते, अरे दिवस-दिवसभर तुझी. ए, हे बघ, मला सांग मी वेडी आहे का? मला वेड लागलंय का? म्हणून तुझी वाट बघत असते मी…”
“अगं नाही यार… कोण म्हणतं तुला वेडी… समजून घे यार. कामात असतो मी. दिवसभर फुरसत नसते गं.”
“एक मिनिट पण मिळत नाही? कितीतरी वेळ माझा मेसेज बघत पण नसतोस यार तू. किती वाईट वाटतं मला अशा वेळी माहीत आहे? एक मिनिट पण वेळ नसतो तुला?”
“अगं ऐक ना बाळा… डोकं एवढं ‘बाद’ होत असतंय माहीत आहे? एका-एकाचं एकेक ऐकून जीव नको होतो.”
“श्री मग यात माझा रे काय दोष? मला का शिक्षा? हे तुझं प्रोफेशन आहे ना… यात असं होणारच. हे ठरलेलं आहे. प्रोफेशनल लाइफ आणि आपली पर्सनल लाइफ वेगळी नाही का? मला त्रास होतो ना या सगळ्याचा… तुला हे चांगलंच माहीत आहे. मी कशी कासावीस होते हे तू बघितलंयस कितींदा… आणि यावरूनच आपली कितीतरी वेळा भांडणं पण झालीयेत.”
“अरे, पण भांडणं झाली तरी, आधी बोलायला कोण येतं? मीच ना?”
“हो तूच! पण म्हणून मग भांडणं तरी कशाला ती? तू आहेस तसाच राहत जा ना. एकदा ‘स्विच ऑन’, एकदा ‘स्विच ऑफ’, तुझ्या सवडीप्रमाणे तू जवळ करणार मला, तुझ्या सवडीने तू बोलणार…”
“बघ… आता तू माझ्याजवळ आहेस ना… आता आहे ना मी पण जवळ… आता शांत हो बघू!”
“श्री यार! हे क्लीअर करू ना रे… तू सांग ना मला… असं नको ना यार वागूस माझ्याशी…”
“चूप!”
एवढंच बोलून श्रीने पुन्हा तिच्या ओठांवर मोहर उमटवली…
हेही वाचा – मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…
0000
खिडकीत बसून जुईली भूतकाळात हरवलेली… कधी तिचे डोळे भरून ओघळू लागले ते तिचं तिला कळलं नाही. ‘बापरेsss किती कठीण आहे हे सगळं… का असा वागतोयस श्री माझ्याशी…’
जुईलीने सवयीने फोन चेक केला. काहीच नव्हतं…
‘एकदा मेसेज करून बघूयात… “श्री यार बोल ना रे”…’ पण तिने हात आवरला. स्वतःला आवरलं. ‘नको… नकोच याला मेसेज वगैरे आता करायला.’ तिने सलीलला अशावेळी गातं करणं पसंत केलं… स्पीकरवर गाणं चालू होतं…
लागते अनाम ओढ श्वासांना,
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना?


