संध्याकाळचा फेरफटका मारून गोपाळराव घरी परतले. ते घरात शिरताच सावित्रीबाईंची तुफान एक्सप्रेस सुरू झाली… आजचा विषय गंभीर होता…
“थोड्या वेळापूर्वी वकील साहेब घरी आले होते. त्यांनी हे ॲप्लिकेशन दिले आहे आणि हे ॲप्लिकेशन कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. ॲप्लिकेशन सबमिट करताना आपल्याला चार डॉक्युमेंट्सचे ओरिजिनल दाखवावे लागतील आणि कलेक्टर ऑफिसमध्ये रोज फक्त दहा लोकांनाच अपॉइंटमेंट मिळते. म्हणजेच थोडक्यात, उद्यालाच तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तेही लवकर जावे लागेल.”
“सावित्री, आपल्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आहेत, त्यामुळे माझा कलेक्टर ऑफिसला जाऊन काहीच उपयोग होणार नाही.”
“अहो, जाऊन तर बघा. कधी कधी कामं होऊन जातात, प्रयत्न करायला काय हरकत आहे?”
“ठीक आहे बाईसाहेब, जसं तुम्ही म्हणता आहात तसंच मी करतो,” गोपाळराव म्हणाले.
सकाळी गोपाळराव लवकर उठले आणि झटपट तयारी करून बसस्टॉपकडे जायला निघाले. जलद चालण्याच्या नादात त्यांच्या चपलेचा अंगठा तुटला आणि साहजिकच त्यांच्या चालण्याचा वेग मंदावला.
गोपाळराव बसस्टॉपवर पोहोचण्याआधीच बस सुटली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी समोरून येणाऱ्या बसला हात दाखवला आणि काय ते सुदैव! बस चक्क त्यांच्या जवळ येऊन थांबली. ड्रायव्हरचे आभार मानत गोपाळराव पुढच्या दरवाजानेच बसमध्ये चढले.
त्यांनी मागितलेले कलेक्टर ऑफिसचे तिकीट कंडक्टरने दिले. पैसे देण्यासाठी म्हणून गोपाळरावांनी खिशात हात घातला. निघण्याच्या घाईगडबडीत पैशांचे पाकीट घ्यायला ते विसरले होते.
“साहेब, तिकिटाचे पैसे लवकर द्या,” कंडक्टर जरा चिडूनच म्हणाला.
“कंडक्टर साहेब, मी पैशांचे पाकीट घरीच विसरलो,” असे म्हणत त्यांनी कंडक्टरकडे केविलवाणी नजर टाकली.
“पैसे नाही तर बसमधून उतरा,” कंडक्टर रागावून म्हणाला.
त्याच क्षणी जवळच बसलेल्या एका मुलाने गोपाळरावांना शंभर रुपयांची नोट देत सांगितले, “काका, मी वरद. तुमच्या सोसायटीच्या मागच्या दगडी चाळीत राहतो. तुम्हाला रोज संध्याकाळी फिरताना पाहतो. हे पैसे असू द्या. परत येताना पण लागतील तुम्हाला.”
“थँक्स बेटा,” म्हणणाऱ्या गोपाळरावांना वरदने स्वतः उभे राहत त्याची जागा दिली.
“काका, मी पुढच्या स्टॉपवर उतरणार आहे. बसा तुम्ही.”
वयाची साठी पार केलेल्या गोपाळरावांचा सीटवर बसताच डोळा लागला.
“काका, कलेक्टर ऑफिस आलं. तुम्हाला उतरायचं ना?” असे म्हणत कंडक्टरने त्यांना जागे केले.
कंडक्टरचे आभार मानत गोपाळराव कलेक्टर ऑफिसमध्ये शिरले. तेव्हा अपॉइंटमेंटचे नऊ टोकन्स दिले गेले होते आणि शेवटचं एक टोकन बाकी होतं. या धावपळीचे चीज होणार म्हणून त्यांना मनापासून आनंद झाला.
हेही वाचा – आई… रक्ताच्या नात्यापलीकडचे प्रेम!
रिसेप्शन काऊंटर आता फक्त वीस–पंचवीस फुटांवर होता. तेवढ्यात मागून एक तरुणी लगबगीने त्यांच्या पुढे गेली — फक्त दोन-तीन सेकंदांचा फरक!
“सर, हे शेवटचं टोकन मी या ताईला देतेय. ती तुमच्या आधी पोहोचली,” रिसेप्शनिस्ट म्हणाली.
भरभर चालल्यामुळे गोपाळरावांना धाप लागली होती. ते काही बोलणार तेवढ्यात ती तरुणी म्हणाली, “काका, तुम्ही माझ्यापुढे होतात. त्यामुळे हे टोकन मी तुम्हाला देणेच योग्य आहे.”
“थँक्स बेटा,” म्हणताना गोपाळरावांचे मन भरून आले.
आजचा दिवस त्यांचा होता. प्रथम बस ड्रायव्हरने, नंतर वरदने, त्यानंतर कंडक्टरने आणि आता या तरुणीने त्यांना सुखद धक्का दिला होता. जगात माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय आज त्यांना पदोपदी आला होता.
त्यानंतर पाच मिनिटांत कलेक्टर साहेबांचे आगमन झाले. केबिनकडे जाताना त्यांचे लक्ष त्यांच्या भेटीसाठी आलेल्या उपस्थितांकडे गेले. साहेब केबिनमध्ये गेल्यानंतर दोन मिनिटांनी त्यांचा सेक्रेटरी बाहेर आला आणि म्हणाला की आजच्या सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल कराव्या लागतील, कारण साहेबांना आज मिनिस्टर साहेबांबरोबर मीटिंग आहे.
“तुम्हाला उद्या परत अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. आजच्या अपॉइंटमेंट्स उद्याला चालतील. आपल्यात गोपाळराव जोशी कोण आहेत? साहेबांनी त्यांना आत बोलावलं आहे.”
आपलं नाव पुकारलेलं ऐकून गोपाळराव आश्चर्यचकित झाले. ते साहेबांच्या केबिनमध्ये गेले, तेव्हा साहेबांनी उठून उभे राहत त्यांना नमस्कार केला. परत एकदा आश्चर्याचा सुखद धक्का त्यांना बसला!
“काका, ओळखलंत का मला? मी राज… राज मराठे. शंकर मराठेंचा मुलगा.”
गोपाळराव क्षणात भूतकाळात शिरले…
0000
शंकर सांगत होता, “गोपाळ, अरे हा माझा मुलगा राज. याला अमेरिकेत एका चांगल्या युनिव्हर्सिटीत अॅडमिशन मिळतेय. पुढच्या महिन्यात त्याचा व्हिसा इंटरव्ह्यू आहे. व्हिसा मिळण्यासाठी मला तगडा बँक बॅलन्स दाखवावा लागेल. त्यासाठी मला तुझ्याकडून पाच लाख रुपये मिळतील का? साधारणतः एक ते सव्वा महिन्यासाठी.”
“शंकर, अरे तू फक्त सांग. कधी पैसे पाहिजेत तुला?” गोपाळराव म्हणाले.
“मला पैसे पुढच्या आठवड्यात लागतील,” शंकर म्हणाला.
दुसऱ्याच दिवशी शंकर मराठेंच्या मृत्यूची बातमी आली. हार्ट अटॅकमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दहा दिवसांनी शंकर मराठेंचा मुलगा राज गोपाळरावांकडे पैसे मागायला आला.
“राज, तू उद्या ये. मी तुला पैसे देईन,” गोपाळराव म्हणाले.
दुसऱ्या दिवशी राज गेला, पण गोपाळराव बाहेर गेले होते. सावित्रीबाईंनी त्याला पुढच्या दिवशी यायला सांगितले. राज तिसऱ्या दिवशी गेला, पण गोपाळराव दोन-तीन आठवड्यांसाठी बाहेरगावी निघून गेले होते.
राजचा अमेरिकेत शिक्षण घेण्याचा प्लॅन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता — गोपाळरावांनी माणुसकी न दाखवल्याने आणि दिलेला शब्द न पाळल्यामुळे!
त्यानंतर गोपाळरावांनी राजची कधीच चौकशी केली नाही आणि राजही त्यांच्याकडे कधीच फिरकला नाही. शंकरबरोबरच्या अतूट मैत्रीला गोपाळरावांनी शंकर जाताच निर्दयपणे तडा दिला होता…
0000
“काका, चहा घ्या ना. चहा गार होतोय,” राजच्या बोलण्याने गोपाळराव भानावर आले.
“काका, माझ्या ऑफिसला तुम्ही का आलात? काय काम आहे तुमचं?” राजने विचारले.
“राज, या ॲप्लिकेशनवर मला तुझं अॅप्रुव्हल हवं आहे. खरंतर यासाठी चार डॉक्युमेंट्सची गरज असते, पण माझ्याकडे फक्त दोनच आहेत. उरलेली दोन घरी आहेत, पण आज आणता आली नाहीत.”
गोपाळरावांच्या ॲप्लिकेशनवर ‘Approved’ असे लिहून त्याखाली स्टॅम्प मारताना राज म्हणाला, “काका, त्या न आणलेल्या डॉक्युमेंट्सपेक्षा तुमच्या शब्दांवर माझा जास्त विश्वास आहे.”
हेही वाचा – Love Story : एक नवी रेशीमगाठ!
राजचे ते शब्द ऐकून गोपाळराव मनोमनी शरमले. आज राजने त्याच्या वडिलांबरोबरच्या गोपाळरावांच्या मैत्रीचा मान ठेवला होता आणि म्हणूनच अशक्यप्राय असणारे काम एका क्षणात झाले होते.
राजला ‘बाय’ करून गोपाळराव जायला निघाले, तेवढ्यात राजचं लक्ष त्यांच्या तुटलेल्या चपलेकडे गेलं.
“काका, दोन मिनिटं थांबा. मला तुमच्याच भागात जायचं आहे. मी तुम्हाला घरी सोडतो.”
राजने त्याच्या आलिशान गाडीतून गोपाळरावांना घरी सोडताना सांगितले,
“काका, यापुढे कोणतंही काम असेल तर तुम्ही यायची गरज नाही. मी स्वतः येईन किंवा माझ्या सेक्रेटरीला पाठवीन.”
राज मोठ्या पदावर होता, पण हवेत गेला नव्हता. माणुसकी तो विसरला नव्हता.
काम झाल्याचा आनंद होता, पण गोपाळराव मनोमनी खजील झाले होते. सावित्रीबाईंना सगळा वृत्तांत सांगताना, काही वर्षांपूर्वी त्यांनी माणुसकी विसरून केलेल्या अक्षम्य चुकीच्या पश्चात्तापामुळे त्यांचे डोळे मात्र पाणावले…


