दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 19 मे 2026; वार : मंगळवार
भारतीय सौर : 29 वैशाख शके 1948; तिथि : तृतीया 14:19; नक्षत्र : मृगशीर्ष 08:41;
योग : धृति 17:49; करण : वणिज 24:39;
सूर्य : वृषभ; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06;
पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
विनायक चतुर्थी (अंगारक योग)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ विजय तेंडुलकर
टीम अवांतर
चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथालेखक, लघुनिबंधकार, प्रसिद्ध नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ अशी ओळख असणाऱ्या विजय तेंडुलकर यांचा जन्म 6 जानेवारी 1928 रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. शालेय शिक्षणापेक्षा घरातील वाङ्मयप्रेमी वातावरणाचे संस्कार त्यांच्यासाठी प्रेरक ठरले. वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादींमधून वाङ्मयग्रहणाचे आणि लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. लहानपणी ते पाश्चिमात्य नाटके पाहायचे. त्यातूनच त्यांना नाटके लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
पुढे तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी आणि ‘रंगायन’, ‘आविष्कार’, ‘भारतीय विद्या भवन कला केंद्र’, ‘अनिकेत’ यांसारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी आणि त्यांतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित झाला.
1955पासून तेंडुलकरांनी नाट्यलेखनास सुरुवात केली. नभोवाणीकरिता लिहिलेली ‘रात्र’ ही त्यांची पहिली एकांकिका. याशिवाय रात्र आणि इतर एकांकिका हा त्यांचा पहिला एकांकिकासंग्रह. यानंतर त्यांचे अजगर आणि गंधर्व, भेकड आणि इतर एकांकिका हे दोन एकांकिका संग्रह प्रसिद्ध झाले. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका यासारखी काही बालनाट्येही लिहिली. टेनेसी विल्यम्सच्या ‘स्ट्रीट कार नेम्ड डिझायर’ या नाटकाचा ‘वासनाचक्र’ या नावाने केलेला अनुवाद विशेष लक्षणीय आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरे या नाटकाचा तसेच गिरीश कर्नाड यांच्या तुघलक या नाटकाचाही त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.
हेही वाचा – दिनचर्या… तिची अन् त्याची!
तेंडुलकरांचे प्रसिद्धीदृष्ट्या पहिले नाटक श्रीमंत हे बरेच गाजले. त्यानंतर त्यांची माणूस नावाचे बेट, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, मी जिंकलो−मी हरलो, कावळ्यांची शाळा, सरी ग सरी, एक हट्टी मुलगी ही नाटके रंगभूमीवर आली. तेंडुलकरांना अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक 1968 साली रंगभूमीवर आले. या नाटकाला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळाले आहे. अनेक भारतीय भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ अशी पाखरे येती आणि गिधाडे ही नाटके आली. ‘गिधाडे’तील उग्र कठोर वास्तववादी चित्रणाने बरीच खळबळ उडवून दिली.
तर, तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर आणि घाशीराम कोतवाल या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला. दंबद्वीपचा मुकाबला, मल्याकाका आणि नंतर आलेले बेबी ही त्यांची त्यानंतरची प्रसिद्ध झालेली नाटके. त्यांनी सुमारे 27 नाटके, 25 एकांकिका लिहिल्या. याखेरीज आठ ते दहा बालनाट्ये लिहिली.
तेंडुलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकावर याच नावाने चित्रपट करण्यात आला. विजय तेंडुलकरांचे हे पहिले पटकथा लेखन. मराठी चित्रपटांमध्ये हा समांतर चित्रपटांची नांदी ठरला. त्यानंतर निशांत, आक्रोश, अर्धसत्य, उंबरठा अशा वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांनी लिहिल्या. त्यांची पटकथा असलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला सामना हा एक महत्त्वाचा मराठी चित्रपट होय. त्यांच्या मंथन या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेंडुलकरांना या चित्रपटाच्या पटकथेसाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर पुरस्करासाठी हा चित्रपट भारताकडून पाठवण्यात आला होता. सिंहासन या चित्रपटाची पटकथाही तेंडुलकरांची. अरुण साधूंच्या दमदार लेखणीतून हा चित्रपट उतरला होता. राजकारण, पत्रकारिता यांचे वेगवेगळे पैलू यात होते. त्यांनी छोट्या दोस्तांसाठी ये है चक्कड बक्कड बुम्बे बो हा बालचित्रपटही लिहिला होता.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मंथन या चित्रपटाच्या पटकथालेखनासाठी 1977 चा राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ती, भारत सराकरकडून पद्मभूषण आणि महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र गौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांच्या कारकीर्दीचा सन्मान करण्यात आला. 19 मे 2008 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – निष्काळजीपणामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. एखादा महत्त्वाचा व्यावसायिक करार अडकू शकतो, ज्यामुळे थोडे अस्वस्थ व्हाल. वैयक्तिक कौटुंबिक बाबी घरापुरत्याच मर्यादित ठेवणे उत्तम. वडीलधाऱ्यांसोबत वेळ घालवल्याने नात्यांमध्ये नवीन जिव्हाळा निर्माण होईल.
वृषभ – तुमची निर्णयक्षमता प्रभावी ठरू शकते, पण न मागितलेला सल्ला देण्याचे टाळा, तो शहाणपणा ठरेल. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदार प्रत्येक टप्प्यावर तुमचा खंबीर आधार असेल. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या विरोधात कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेचाच विजय होईल.
मिथुन – प्रलंबित कामे लवकर पूर्ण होऊ लागतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नाही. प्रवास करताना किंवा फिरताना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. जोडीदाराच्या यशामुळे तुमच्या मनाला आनंद होईल. कौटुंबाच्या बाबतीतले निर्णय घेण्याची घाई टाळा, सौहार्दपूर्ण वातावरण टिकवून ठेवा.
कर्क – जबाबदाऱ्यांचा भार थोडा जास्त वाटू शकतो. अनेक कामांमुळे गोंधळल्यासारखे वाटेल. भूतकाळातील चुकांमधून शिकणे आज खूप उपयुक्त ठरेल. पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण असेल. खर्च आणि उत्पन्न यांच्यात संतुलन राखा. मुलांच्या आनंदासाठी नवीन लॅपटॉप किंवा गॅझेट खरेदी करू शकता.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन येऊ शकतो. जुन्या नोकरीतून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जिंकल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल, मात्र काही लोकांना यामुळे मत्सर वाटू शकतो. सामाजिक कार्यात तुमची लोकप्रियता वाढेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी खास आणि रोमांचक असू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार कराल, मात्र आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशनमुळे मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.
तुळ – आज लहान समस्यादेखील मोठ्या वाटू शकतात. सुखसोयी आणि ऐषारामात वाढ झाल्याने आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी, तुमची मेहनत आणि कार्यशैली इतरांना प्रभावित करेल. वरिष्ठदेखील तुमची प्रशंसा करू शकतात. मात्र इतरांच्या कामात ढवळाढवळ करणे टाळा. विद्यार्थी अभ्यासासाठी कठोर परिश्रम घेतील आणि यशाच्या जवळ पोहोचतील.
वृश्चिक – सकारात्मक विचार यशाचा मार्ग मोकळा करू शकतो. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, जी तुम्ही उत्कृष्टपणे पार पाडाल. मालमत्तेचा रखडलेला व्यवहार पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा मोठा नफा तुमचा आनंद द्विगुणित करेल. उत्पन्नातील वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवेल.
हेही वाचा – शेअर बाजार अन् सामंत काका
धनु – मोठी स्वप्ने तुमच्या प्रयत्नांना नवी दिशा देतील, पण काही अडथळेही येऊ शकतात. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. लहानसहान गोष्टींवरून जोडीदारासोबतचा तणाव वाढू शकतो, त्यामुळे संयम बाळगा. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना काही मोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळू शकते, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.
मकर – व्यवसाय आणि उत्पन्नाशी संबंधित उत्कृष्ट कल्पना सुचू शकतात. योग्य वेळी उचललेले पाऊल मोठा नफा मिळवून देऊ शकते. विरोधकांच्या प्रभावाखाली येणार नाही, याची काळजी घ्या. जुने व्यवहार आणि सरकारी बाबींमध्ये दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल.
कुंभ – रागावर नियंत्रण ठेवणे हा तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल. कुटुंबातील सदस्य अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही नाराज होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणेच उत्तम. चैनीच्या वस्तू आणि छंदांवरील खर्च वाढू शकतो. वैयक्तिक माहिती उघड केल्याने भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. घरातील एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या तयारीमुळे आनंदी वातावरण राहील.
मीन – अनावश्यक संघर्ष आणि त्रास टाळणे शहाणपणाचे ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या चातुर्याने पार पाडल्या जातील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. संततीकडून आलेली चांगली बातमी मनःशांती देऊ शकते. जुन्या मित्राला भेटल्याने जुन्या आठवणी ताज्या होतील. कोणाहीबद्दल वाटणारा मत्सर किंवा नकारात्मक भावना सोडून पुढे वाटचाल केल्यास, यश प्राप्त होईल.


