दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 16 मे 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 26 वैशाख शके 1948; तिथि : अमावस्या 25:31; नक्षत्र : भरणी 17:30;
- योग : सौभाग्य 10:25; करण : चतुष्पाद 15:23;
- सूर्य : वृषभ; चंद्र : मेष 22:47; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:05;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
दर्श अमावस्या
भावुका अमावस्या
शनैश्चर जयंती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
शास्त्रीय संगीत आणि सुगमसंगीत गायिका माणिक वर्मा
टीम अवांतर
सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि सुगमसंगीत गायिका माणिक वर्मा यांचा जन्म 16 मे 1926 रोजी पुणे येथे झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार आणि कलावंत असल्याने आपल्याही मुलीने सुविद्य गायिका व्हावे, असा त्यांचा पहिल्यापासूनचा आग्रह होता. माणिकताईंना आईव्यतिरिक्त आप्पासाहेब भोपे, बापूराव केतकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेशबाबू माने, उस्ताद इनायत खाँ, अजमत हुसेन खाँ आणि नंतर आग्रा घराण्याचे ‘गुणिदास’ पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून त्यांनी गाण्याची तालीम घेतली.
अलाहाबादचे पंडित भोलानाथ भट्ट यांच्याकडूनही त्या सुंदर बंदिशी शिकल्या. सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श. माणिकताईंनी प्रथम किराणा घराण्याची मूळ पीठिका उचलली असली तरी, आवाजाचा लगाव, आलापांचा शिस्तशीरपणा आणि तानक्रियेची निर्मळता या तीन बाबतींत त्यांनी किराणा घराण्याच्या परंपरेबाहेर जाऊन स्वत:ची एक स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी गणपती उत्सवात पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला. तर, 1939 साली माणिकताईंच्या गायनाची पहिली ध्वनीमुद्रिका ‘बहरली जणू लतिका कलिका…’ दत्ता डावजेकर यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली प्रसिद्ध झाली. 1950-55 या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावरून गोविंदराव टेंबे यांनी सादर केलेल्या महाश्वेता या संगीतिकेत गायिका म्हणून माणिकताईंचा समावेश होता. 1955-56 साली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत रामायण या सुप्रसिद्ध संगीत मालिकेमध्ये सात गाणी त्यांनी गायली.
शास्त्रीय संगीताबरोबरच अनेक भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते अशी वेगवेगळ्या प्रकारची गीते माणिकताईंनी गायली. माणिक ताईंची ‘सावळाच रंग तुझा’, ‘घननीळा लडिवाळा’, ‘हसले मनी चांदणे’, ‘त्या चित्तचोरट्याला’ इत्यादी भावगीते; ‘कौसल्येचा राम बाई’, ‘सगुण निर्गुण’, ‘अमृताहूनी गोड’ ही भक्तिगीते आणि ‘नाथ हा माझा’, ‘स्वकुल तारकसुता’, ‘नरवर कृष्णासमान’ इत्यादी नाट्यगीते रसिकप्रिय झाली.
‘किती रंगला खेळ’ हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. भारत सरकारतर्फे पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार (या पुरस्काराच्या त्या पहिल्या मानकरी होत्या), गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना लाभले. क्लीव्हलँड, ओहायओ येथे 16 मे हा त्यांचा जन्मदिवस ‘माणिक वर्मा दिन’ म्हणून घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 10 नोव्हेंबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एक महत्त्वाचे काम अखेर पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक सलोखा टिकून राहील. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा अडचणीचा ठरू शकतो, त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.
वृषभ – आजचा दिवस जरी सामान्य असला तरी, तो अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकतो. वरिष्ठांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल. मेहनतीमुळे तुम्हाला एक नवीन ओळख मिळण्यास मदत होईल. खर्चात अचानक झालेली वाढ थोडीशी चिंता निर्माण करू शकते. काही विशिष्ट व्यक्तींना भेटणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील.
मिथुन – आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उसने दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जबाबदाऱ्यांपासून दूर पळण्याऐवजी, आत्मविश्वासाने पुढे गेल्यास नक्कीच यश मिळेल. जोडीदारासाठी दिलेले सरप्राइज नात्यात एक नवीन गोडवा आणेल. बालपणीच्या मित्राला भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
कर्क – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण झाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. रागावर नियंत्रण ठेवणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. भावंडांसोबत सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. संततीच्या वागणुकीबद्दल थोडी चिंता वाटू शकते, पण संयम आणि समजूतदारपणा परिस्थिती हाताळण्यास तुम्हाला मदत करेल.
सिंह – एक नवीन व्यावसायिक भागीदारी भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ताणामुळे थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. पैसे उधार घेणे टाळा, कारण यामुळे आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. मंगलकार्याशी संबंधित अडथळे दूर झाल्याने कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.
कन्या – जबाबदारी वेळेवर पूर्ण करणे हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. नवीन पद किंवा सन्मान मिळण्याचीही चिन्हे आहेत. प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल.
तुळ – आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात समन्वय साधला तर तुमची मनःशांती टिकून राहील. कौटुंबिक बाबींवर बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेणे टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतात, पथ्यपाणी सांभाळा.
वृश्चिक – आर्थिक गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. रखडलेल्या कामांनाही गती मिळेल. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीला भेटल्याने मनाला शांती मिळेल. घराच्या सजावटीचा किंवा नूतनीकरणाचा खर्च वाढू शकतो. लहान मुलांसोबत काही वेळ घालवल्याने मनाला आनंद मिळेल. कुटुंबात सामंजस्याची भूमिका ठेवा, वाद टाळता येतील.
हेही वाचा – कवी ग्रेस… वेदनेच्या शब्दांत भटकणारा अश्वत्थामा
धनु – व्यवसाय नव्या उंचीवर नेण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. मित्रांसोबत घालवलेला वेळ तणाव कमी करेल. संततीकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. अविवाहित जातकांच्या प्रेम जीवनातील एक विशेष भेट आनंद घेऊन येऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मकर – तुमची मेहनत आणि तुम्ही पकडलेला वेग काही लोकांना नाराज करू शकतो, ज्यामुळे नवीन विरोधक निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात चाणाक्षपणे वागणे महत्त्वाचे आहे. शासकीय कामात यश मिळण्याची शक्यता आहे. इतरांवर अवलंबून राहणे टाळा, कारण कोणीतरी तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो.
कुंभ – दिवस अधिक सुखद आणि शांततापूर्ण असेल. कुटुंबात आनंद आणि एकोप्याचे वातावरण राहील. जोडीदाराला मिळणारी बढती अभिमान आणि आनंदाची गोष्ट ठरेल. भावंडांचा सल्ला फायदेशीर ठरेल. संध्याकाळी मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. जवळच्या एखाद्या नातेवाईकाच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटू शकते.
मीन – कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या शब्दांबाबत काळजी घ्या. अविवाहित जातकांचे विवाह ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायातील गुंतवणुकीतून भविष्यात चांगला नफा मिळेल. व्यवसायासाठी भागीदारीचा विचार करण्यापूर्वी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.


