दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 13 मे 2026; वार : बुधवार
भारतीय सौर : 23 वैशाख शके 1948; तिथि : एकादशी 13:29; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 24:17;
योग : विष्कंभ 20:54; करण : कौलव 24:30;
सूर्य : मेष; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:04;
पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
अपरा एकादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
विख्यात कादंबरीकार, कथाकार आर. के. नारायण
टीम अवांतर
विख्यात कादंबरीकार, कथाकार आर. के. नारायण यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 रोजी मद्रास (चेन्नई) येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव होते राशिपुरम कृष्णस्वामी नारायण. त्यांच्या वडिलांची महाराजा हायस्कूल येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले. 1930 मध्ये म्हैसूरच्या महाराज कॉलेजातून नारायण पदवीधर झाले. त्यानंतर प्रथम म्हैसूर येथील सचिवालयात आणि नंतर काही दिवस शिक्षक म्हणून एका शाळेत त्यांनी नोकरी केली.
या नोकरीतच यानंतर केवळ लेखनावर जगण्याचा निर्णय नारायण यांनी घेतला. स्वामी अँड फ्रेंड्स ही त्यांची पहिली कादंबरी. नारायण यांनी या कादंबरीचे हस्तलिखित ऑक्सफर्डमधील एका मित्राला पाठवले. या मित्राने ते हस्तलिखित ग्रॅहम ग्रीन यांना दाखवले. ग्रॅहम ग्रीन यांनी ते लिखाण आपल्या प्रकाशकाला प्रकाशित करण्याची शिफारस केली आणि 1935 साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, द इंग्लिश टीचर, वेटिंग फॉर द महात्मा, द गाइड, मॅनईटर ऑफ मालगुडी, द व्हेंडॉर ऑफ स्वीट्स यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘मालगुडी’ नावाचे एक दक्षिण भारतीय गाव कल्पून त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्या रचल्या आहेत. या गावातील मध्यम आणि कनिष्ठ वर्गीयांचे वास्तववादी चित्रण करीत असताना, सरळ, साध्या आयुष्यातही आढळणारे नाट्य आणि विक्षिप्तपणा त्यांनी कौशल्याने टिपला आहे. साधी, पण प्रसंगी वक्रोक्तियुक्त भाषाशैली आणि रचनासौष्ठव ही त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची उल्लेखनीय वैशिष्ट्ये.
हेही वाचा – तो राजहंस एक…
आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’वर आधारित 1980 च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.
द गाइड ही त्यांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती. प्रवाशांचा ‘गाइड’ म्हणून काम करणाऱ्या राजूची ही कहाणी. खेडुतांच्या अंधश्रद्धेमुळे तो साधू बनतो पण पुढे त्या साधुत्वाच्या ओझ्याखाली चिरडून मरतो. आपल्या व्याजोक्तिपूर्ण, शैलीत त्यांनी ही कहाणी घाटदारपणे मांडलेली आहे. या कादंबरीवरचा गाइड (हिंदी आणि इंग्रजी) हा चित्रपटही गाजला. 1960 साली या कादंबरीस साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. भारत सरकारने नारायण यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 13 मे 2001 रोजी नारायण यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – नशीब नवीन संधी घेऊन तुमच्यासमोर येऊ शकते. सुज्ञपणे घेतलेला आर्थिक निर्णय नफ्याचा मार्ग मोकळा करू शकेल. कामातील तुमचा उत्साह इतरांना प्रभावित करेल. मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने तुमच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; छोटी खबरदारीही मोठा फायदा देऊ शकते.
वृषभ – समाजातील तुमच्याबद्दलच्या वाढत्या आदराची आणि प्रतिष्ठेची चिन्हे दिसत असल्याने आत्मविश्वास वाढेल. घरातील मंगलकार्य किंवा कुटुंबातील एखादी चांगली बातमी आनंद घेऊन येऊ शकते. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो, यातून नवीन ओळखी होतील आणि भविष्यात त्याचा उपयोग होईल. राग आणि वाद टाळा, तरच दिवस अधिक चांगला जाईल.
मिथुन – आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा आणि नवीन आशा यांनी भरलेला असेल. स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असाल आणि हाच विचार तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. घरात आनंदी वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला इतरांना लाभदायक ठरेल, वरिष्ठही तुमची प्रशंसा करतील. वडिलांकडून एक विशेष शिकवण मिळू शकते.
कर्क – सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. नवीन वाहन किंवा नव्या घराच्या खरेदीचे नियोजन कराल. अडचणीत सापडलेल्या मित्राला मदतीचा हात द्याल, त्याने समाधान मिळेल. जुनी वित्तीय प्रकरणे पुन्हा समोर येऊ शकतात, ती शहाणपणाने सोडवणेच उत्तम ठरेल. संयम बाळगा, कारण शासकीय कामांमध्ये काहीसा विलंब होऊ शकतो.
सिंह – आज तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळणार आहे. व्यवसाय आणि गुंतवणूक या दोन्हीमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल, तर अविवाहित जातकांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. अध्यात्माकडे वाढणारा कल मनाला शांती देईल. एखादा नवीन, शुभ प्रकल्प सुरू होण्याचीही शक्यता आहे.
कन्या – कामाप्रति निष्ठा आणि कठोर परिश्रम यामुळे इतरांपेक्षा वेगळे ठराल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. खर्चावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. नात्यांमधील समजूतदारपणा आणि प्रेमळ शब्दांमुळे अनेक समस्या कमी होतील. मात्र विरोधकांपासून सावध रहा, आत्मविश्वास टिकवून ठेवा. विद्यार्थी अभ्यासात प्रावीण्य मिळवू शकतील.
तुळ – प्रत्येक सुज्ञ निर्णय तुमचे भविष्य मजबूत करू शकतो. राग आणि दिरंगाई टाळा, तरच यश निश्चित मिळू शकते. नवीन व्यावसायिक योजनांमधून नफा मिळण्यास सुरुवात होईल. तथापि, आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे अत्यावश्यक असेल. जोडीदारासोबत घालवलेला वेळ नात्यात ताजेपणा आणू शकतो.
वृश्चिक – आर्थिक आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणचे जुने वाद संपुष्टात आल्याने वातावरणात हलकेपणा येईल. आपल्या विरोधकांपासून सावध रहा. बेधडक कोणावरही विश्वास ठेवू नका. लहानपणीच्या मित्राला भेटल्याने जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण हळूहळू सुधारेल.
हेही वाचा – Bookshelf : गारंबीचा बापू… बंडखोर बापू प्रत्येकाच्या मनात!
धनु – जी काही योजना हाती घ्याल, तिचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सन्मान किंवा पुरस्कार मिळाल्याने अभिमान वाटेल. व्यवसायातील समस्या सुटतील आणि मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही साकार होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणावातून दिलासा मिळू शकतो.
मकर – प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे. सध्या समोर असलेल्या समस्या शांत चित्ताने सोडवा. नवीन प्रकल्पाचे नियोजन केल्यास भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. संघर्षापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. थोडे मनोरंजन किंवा प्रवासामुळे मन हलके होईल, त्यातून आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा.
कुंभ – लहान आव्हाने तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे, कारण कोणीतरी प्रतिकूल वातावरण निर्माण करू शकते. वाढत्या खर्चामुळे चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून बजेटबाबत दक्ष राहा. भूतकाळातील चुकांमधून शिकल्याने भविष्य अधिक मजबूत होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल.
मीन – सकारात्मक विचार आणि ऊर्जा प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी करू शकते. थकीत निधीची वसुली झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घकालीन व्यावसायिक योजनांना आता गती मिळू शकते. शासकीय कामातही यश मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील आनंदी वातावरणामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील.


