सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें । तैसीं इयें तुझां देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥257॥ अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें । कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥258॥ तयापरी श्रीहरी । तुझां विश्वात्मकीं इये शरीरीं । स्वर्ग देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥259॥ प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहें अनेक । आणि भूतग्राम एकैक । भूतसृष्टीचें ॥260॥ जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे । आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥261॥ श्रीमहादेव भवानियेशीं । तुझां दिसतसे एके अंशीं । आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखें ॥262॥ पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझां स्वरूपीं सकळें । देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥263॥ किंबहुना त्रैलोक्यपति । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों ॥264॥ आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसें देखतसें अलौकिक । गांभीर्य तुझें ॥265॥
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् । नान्त न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ॥16॥
तया दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहत असें । तंव दोर्दंडीं जैसें । आकाश कोंभैलें ॥266॥ तेसे एकचि निरंतर । देवा देखतसें तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकीं काळीं ॥267॥ मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें । तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥268॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज
अर्थ
देवा, मंदर पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशूंची अरण्ये असतात, त्याप्रमाणे या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहात आहे. ॥257॥ महाराज, आकाशाच्या खोळेत ग्रहसमुदायाचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत, ॥258॥ हे श्रीहरी ऐक, त्याप्रमाणे तुझ्या या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी देवसमुदायासह मला स्वर्ग दिसत आहे. ॥259॥ महाराज, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहात आहे आणि एकेक भूतसृष्टीतील प्राणीसमुदाय मी पाहात आहे. ॥260॥ महाराज, सत्यलोक तुमच्या विश्वरूपात आहे. हा (मी) पाहिला, हा ब्रह्मदेव नव्हे काय? आणि दुसरीकडे पहातो तो कैलासही दिसतो. ॥261॥ पार्वतीसह श्रीशंकर तुझ्या एका भागात दिसत आहे, आणि हे श्रीकृष्णा, तुलादेखील तुझ्या या विश्वरूपामध्ये मी पाहात आहे. ॥262॥ कश्यपादी ऋषींचे समुदाय, हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणे सर्पासह सातही पाताळे तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत. ॥263॥ फार काय सांगावे? हे त्रैलोक्याच्या राजा श्रीकृष्णा, तुझ्या शरीरावरील एक एक भाग हीच कोणी भिंत, तीवर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट उमटलेले आहेत, असे वाटते. ॥264॥ आणि त्या लोकातील जे जे प्राणी, तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत. याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे. ॥265॥
हे विश्वेश्वरा, विश्वरूप कृष्णा, मी तुला अनेक हात, उदरे, मुखे आणि नेत्र असलेला आणि अनंत रूपांनी सर्व ठिकाणी भरलेला असा पाहात आहे. तुझा आरंभ, मध्य अथवा अंत (यापैकी) मला (काहीच) दिसत नाही. ॥16॥
त्या दिव्य दृष्टीच्या बळामुळे मी जो चहुकडे पाहात आहे, तो बळकट भुजांच्या ठिकाणी जणू काही आकाश उत्पन्न झालेसे दिसते. ॥266॥ त्याचप्रमाणे देवा, एकटे तुझे हातच एका वेळी सर्व व्यापार निरंतर करत आहेत, असे मी पाहातो. ॥267॥ मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत, अशी तुझी अमर्याद पोटे मी पाहातो. ॥268॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : माजीं सापडलेनि अलिकुळें, जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे


