दोन-तीन दिवसांपासून अनुचे काहीतरी बिनसले होते. समजत नव्हते काय, पण तिच्या एकूण वागण्यावरून अजयच्या ते लक्षात येत होते. थोड्यावेळाने अजयने चहा दिला तरी, तिचे चिडचिड करणे चालूच होते. ऑफिसमध्ये काही झाले असेल, असे समजून अजय शांतपणे त्याचे काम करीत बसला. तेवढ्यात दार वाजल्यामुळे अजय दार उघडायला गेला. त्यावेळेस पण “कोणाला आत्ताच यायचे होते? कोण आले काय माहीत?” असे म्हणत अनू आत निघून गेली…
अचानक आलेल्या आईला बघून अजयला खूप आनंद झाला. हातातील बॅग घेत त्याने आईचे हसून स्वागत केले. आईला बसायला सांगून तो पाणी आणायला आत गेला. बाकी घरात एकदम शांतता वाटली. त्यामुळे आईला अनू घरी नसेल, असे वाटले. कारण अनू म्हणजे घरातील चैतन्य… अनू घरात असेल तर, घर अगदी जिवंत वाटते. आईने अजयकडे अनूची चौकशी केली, तेव्हा अनू घरातच आहे, असे समजले. आई आत अनूच्या खोलीकडे जायला निघाली, तेव्हा अजयने तिचा मूड खराब असल्याचे सांगितले. “काय झाले माहीत नाही पण दोन-तीन दिवसांपासून चिडचिड सुरू आहे,” असे सांगितले.
हेही वाचा – गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य
आई आत गेली तर अनू नुसतीच शून्यामध्ये नजर रोखून बसलेली दिसली… आईने अनूच्या डोक्यावरून हात फिरवला, तशी ती सावध झाली. आईला बघितल्यावर लगेच उठून उभी राहिली. तर, आईने तिला लगेच मिठीत घेतले आणि काही कळायच्या आत अनू रडायलाच लागली! अजयला काही समजेना काय झाले ते… आईने त्याला बाहेर जाण्याची खूण केली. अनू तसं तर घरची सून पण या सासू-सुना कमी आणि मैत्रिणी जास्त असल्यामुळे एकमेकींबरोबर सगळ्या गोष्टी बोलत. त्यामुळे आत्ता पण तसेच झाले. अनू थोडी शांत झाल्यावर तिनेच सांगायला सुरुवात केली…
“सध्याच्या परिस्थितीमध्ये कामाचा ताण खूप वाढला आहे. सारख्या नवनवीन गोष्टी कराव्या लागत आहेत. वेळेचा तर मेळच बसत नाही. काहीच समजत नाही. अजय खूप मदत करतो, समजून घेतो, पण कुठेतरी खूप एकटे वाटत होते. पण आता नाही वाटत. तुम्ही जवळ घेतले आणि एकदम ताण कुठल्या कुठे निघून गेला, असेच वाटले.”
बाहेर उभा असलेला अजय हे सगळे ऐकत होता. त्याला पण त्याच्या लहानपणीचा काळ आठवला. आई-बाबा आपला मूड बिघडलेला दिसला की, छान मिठीत घ्यायचे आणि किती बरे वाटायचे! कोणत्याही अडचणींचा सामना करण्याचे बळ यायचे. खरचं ही “जादू की झप्पी” किती मोठ काम करते!
हेही वाचा – घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…
थोड्यावेळाने दोघीजणी खोलीमधून बाहेर आल्या त्याचमुळी हसत. “तुम्ही दोघे बसा मीच सगळ्यांना चहा करते,” असं म्हणत आई स्वयंपाकघराकडे गेली. अजय अनूकडे बघत हसत म्हणाला, “अरे, या चिडचिडीवर एवढे सोपे औषध होते, हे माहीतच नव्हते.” अनू पण हसत त्याच्या मिठीत आली.
खरंच, प्रत्येक वेळेस सगळंच बोलले पाहिजे, असे नसते… काही न बोलता मारलेली मिठी पण खूप काही बोलून जाते. आश्वासन देऊन जाते की, मी आहे तुझ्याबरोबर!


