Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य
    ललित

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरApril 14, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, राजची नोकरी जाणे, राजच्या नोकरीवर कुऱ्हाड, साक्षात वरद, राजचे झोपेच्या गोळ्या घेणे, गणपती स्तोत्र पठण, संकष्टीला इंटरव्ह्यूचा कॉल, वरदने दिल्या राजला झोपेच्या गोळ्या, नेहाचे टेन्शन,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कंपनीचा ई-मेल आणि चक्क पर्सनल मेल आयडीवर! राजला आश्चर्य वाटले. “तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होईल…” हा तर खूप मोठा धक्का होता राजला! नुकत्याच घेतलेल्या आलिशान तीन बेडरूम फ्लॅटचा ईएमआय जबरदस्त होता. दोन महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं. आईचं उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न…

    एक तारखेला जमा होणारी पगाराची भलीमोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार? अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा? हा विचारच त्याला घाबरवत होता.” फक्त एका लाइनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते. आई-बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणे कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही, असं राजने ठरवलं.

    राज एका मोठ्या आयटी कंपनीत काम करत होता. मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स… यामुळे तो कामात सदैव व्यग्र असायचा. “माझी कंपनी… माझ्या कंपनीची प्रगती” याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनीबाहेर टाकलं होतं, एक लाइनचा मेल पाठवून! नेहा राजला नेहमीच सांगायची की, कंपनीला जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंतच तू कंपनीत असशील, कंपनी आपली कधीच नसते तर, ती कायमच असते मालकाची… पण राजने ते कधीच मान्य केलं नव्हतं.

    हेही वाचा – आई… रक्ताच्या नात्यापलीकडचे प्रेम!

    “नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्यामुळे पुढचे 1-2 आठवडे घरून काम करायचं आहे. मीटिंग असली की, तेव्हा फक्त ऑफिसला जायचं.”

    “मालक भलतेच खूश दिसतात तुझ्यावर,” नेहाने टोमणा मारला… “बरं झालं, मला पापड करायचे आहेत, तुझी मदत होईल मला.”

    000

    संध्याकाळी राज, जिवलग मित्र वरदच्या दुकानात गेला. वरदही पूर्वी राजबरोबर काम करायचा, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला आणि त्याने व्यवसाय चांगलाच वाढवला. एका कोपऱ्यात त्याने प्रिंटिंग, स्कॅनिंग कामदेखील सुरू केलं होतं…

    राजने वरदला त्याचा जॉब गेल्याचं सांगितलं. घरी अजून काहीच सांगितलेलं नाही, हेही त्याने कबूल केलं. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, “वरद, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत… मी संपलो मित्रा…” असं म्हणताना राज नजर चोरत होता.

    “राज, किती पैसे हवेत तुला? मी देतो.”

    “वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं, तेच समजत नाही. मित्रा, त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे, तेवढीच शांत झोप लागेल.”

    “राज, झोपेच्या गोळ्या प्रीस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत. मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो. मी गोळ्या दिल्या, असं कोणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त एक गोळी घ्यायची म्हणजे रात्रभर शांत झोपशील. दोन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, तीन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आणि चार घेतल्या तर कायमचा…”

    वरद बोलत होता पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, “राज तू त्या गोळ्या नेऊ नकोस, मला भीती वाटते.”

    “असू दे, तू गोळ्या दिल्या हे मी कुणाला सांगणार नाही.”

    000

    “डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या, झोपण्यापूर्वी घेईन,” असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, एटीएम पिन आणि इतर महत्त्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली… सहज, पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून!

    आवराआवर करून यायला नेहाला बराच वेळ लागला.

    “राज, हे काय पाठवलंस?” नेहाने विचारलं.

    “अगं, तुला माहीत असावं, एवढाच उद्देश.”

    सर्व झोपले आहेत, याची राजने खात्री करून घेतली. तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. 4 गोळ्या घ्याव्या की 5? की सर्व 10 घ्याव्यात? सर्व 10 घेऊया म्हणजे पुरावाही राहणार नाही, असा विचार करत त्याने पुडी उघडली. आई-बाबांचे थकलेले चेहरे डोळ्यासमोर आले… नेहाचा हसरा चेहरा… ‘मी पळ काढतोय का?’ हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या, तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं, ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं-

    गणपती महात्म्य

    11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा

    तुमची इच्छा पूर्ण होईल.

    करून तर पाहा…

    राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुडीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता.

    सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केलं आणि मनोभावे त्याचं पठण केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च, सीव्ही ई-मेल करणं त्याने मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्स होत्या, त्याला हव्या तशा. “माझी कंपनी”च्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं.

    गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं, हा त्याचा उपक्रम सुरू झाला. पाचव्या दिवशी दोन फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे तीन-चार दिवस हे चालूच होतं. पण फेस-टू-फेस इंटरव्ह्यू मात्र झाला नव्हता. आज गणपती स्तोत्र पठणाचा अकरावा दिवस होता. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं.

    “राज, आज संकष्टी आहे. पाऊस कधीही सुरू होईल. मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब. मी पाच मिनिटांत येईन…” नेहाने विचारलं खरं, पण नेहमी कंटाळा करणारा राज अगदी आनंदाने तयार झाला, नेहाला आश्चर्य वाटलं!

    “राज मी आलेच,” असं सांगून नेहा गाडीतून उतरली. “मी पण येतो” म्हणत राजही गाडीतून उतरला. नेहाला दोन-तीन मैत्रिणी भेटल्याने ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. दर्शन घेऊन बाहेर येताना तो नेहाला म्हणाला, “मी गाडीपाशी थांबतो. टेक युवर टाइम.”

    हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटं झाली तरीही बाईसाहेब आल्या नव्हत्या. नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील एचआर ऑफिसरचा फोन होता, “उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या.”

    दुसऱ्या दिवशी राजचा फेस-टू-फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली, दोन दिवसांनी जॉइन करायचं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू घेतला गणेश साहेबांनी आणि राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं होतं आणि झोपेच्या गोळ्या तशाच होत्या, त्याच पुडीत.

    000

    “नेहा, वरदला कॉफी प्यायला बोलवतो मी?”

    “अवश्य, केव्हा बोलवतोस?”

    “आज संध्याकाळी, सहा वाजता, पण घरी नाही, मॉडर्न कॅफेत. तूही ये.”

    सहा वाजता नेहा आणि राज कॅफेत पोहोचले, लगेच वरदही आला. फेसाळलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. “वरद, या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या.”

    “राज, किती गोळ्या संपवल्यास?”

    “एकही नाही.”

    “राज, वरद हे काय ऐकतेय मी? झोपेच्या गोळ्या? राज तू घेतल्या? वरदकडून? का? कशासाठी? आणि वरद, तू गोळ्या दिल्यास?”

    “नेहा, मी सगळं सांगतो, ऐक. साधारण दोन आठवड्यांपूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता. त्याचा जॉब गेल्यामुळे…”

    “राज, काय ऐकतेय मी? मला काही बोलला नाहीस? मला खोटं सांगितलं की, घरून काम करतो म्हणून!”

    “त्याने मला विनंती केली की, मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान शांत झोप येईल. मी पूर्ण वॉर्निंग दिली आणि मगच गोळ्या दिल्या. नेहा, तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतली नाही.”

    “वरद, या झोपेच्या गोळ्या माझ्या टेन्शनमधून मला सोडवतील, असं वाटलं होतं मला, पण गोळ्यांनी नाही तर, त्या ज्या कागदात बांधल्या होत्या, त्या कागदाने माझी सुटका केली.”

    “कागदाने? समजलं नाही मला?”

    “मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे त्या कागदावर लिहिलं होतं-

    ‘गणपती महात्म्य

    11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा

    तुमची इच्छा पूर्ण होईल.

    करून तर पाहा…’”

    “राज, हा काय चमत्कार! मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी!”

    “ते वाचून मी विचार बदलला. अघोरी मार्ग नाही तर, अध्यात्माचा वापर करायचं ठरवलं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला “इंटरव्ह्यूला या” असा फोन आला, जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो होतो, संकष्टीला. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. विशेष म्हणजे, मी तिथे अॅप्लाय पण केलं नव्हतं आणि इंटरव्ह्यू घेतला!”

    राजला थांबवत वरद म्हणाला, “गणेश सरांनी आणि तुला छान ऑफर मिळाली, बरोबर?”

    “वरद! हे तुला कसं माहीत?”

    “राज, गोळ्या घेऊन तू गेलास आणि माझं टेन्शन वाढलं. मी दोन-तीन मित्रांना फोन करून तुझ्याबद्दल बोललो. तुझा सीव्ही आपण मागे प्रिंट केला होता तो माझ्या कॉम्प्युटरमध्ये होताच, मी तो माझ्या मित्रांना पाठवला. परवाच गणेश सरांचा फोन आला की, तुझा इंटरव्ह्यू घेणार आहे म्हणून, आणि आज त्यांनी सांगितलं ऑफर दिली म्हणून!”

    “पाहा, सद्बुद्धी देणारा गणपती, इंटरव्ह्यूचं कळलं ते गणपती मंदिरात, संकष्टीच्या दिवशी! इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि सीव्ही पाठवला वरदने!! म्हणजे काय तर गणपती बाप्पा पावला.”

    “राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या चार ओळींमुळे. त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर?”

    इतका वेळ शांतपणे ऐकत असलेली नेहा म्हणाली –

    “रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती म्हटली. फुलवात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याचवेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं म्हणून मी कागद बदलला. माझ्या भजनी मंडळाच्या वहितील कागद वापरला.”

    हेही वाचा – गैरसमज… पुत्राचे पितृप्रेम!

    “परत गणेशच…” राज म्हणाला.

    “पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर?”

    “नेहा, चुकलोच मी. मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे,” असं म्हणत वरदने पुडीतील चार गोळ्या घेतल्या. वरदला कसंतरीच वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला… “नेहाने मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं…” असं तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने सुवाच्च अक्षरात पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं.

    “वेटर, ही कॉफी थंड झाली आहे. गरम कॉफी द्या, लवकर,” असा स्पष्ट आवाज ऐकून राज आणि नेहाने डोळे उघडले. वरदने पेपर नॅपकिन प्रथम राजसमोर आणि नंतर नेहा समोर धरला. त्यावर लिहिलं होतं- “त्या गोळ्या झोपेच्या नव्हत्या तर ‘व्हिटॅमिन सी‘च्या होत्या.”

    वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही कारण तिला समोर ‘साक्षात वरद’ दिसत होता.

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026 ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    By सतीश बर्वेMay 30, 2026

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात…

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 436
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026
    Most Popular

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.