दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 04 एप्रिल 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 14 चैत्र शके 1948; तिथि : द्वितीया 10:08; नक्षत्र : स्वाती 21:34;
- योग : हर्षण 14:16; करण : वणिज 23:01;
- सूर्य : मीन; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:52;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिन विशेष
प्रसिद्ध लेखक आनंद साधले
टीम अवांतर
महाभारत आणि रामायण यावरील संशोधनपर लेखन तसेच शृंगाररसपूर्ण लेखन करणारे आनंद साधले यांचा जन्म 5 जुलै 1920 रोजी सावंतवाडी जिल्ह्यातील साळगाव येथे झाला. मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. पोस्टखात्यात 35 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून त्यांनी मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. लेखनाला वेळ देता यावा म्हणून नोकरीत त्यांनी कायम रात्रपाळी घेतली होती.
संस्कृतमधील कथा साहित्याचा अभ्यासपूर्ण ललित शैलीत परिचय करून देणारे लेखक म्हणून साधले यांची ओळख आहे. त्यांनी मुख्यत्वे संशोधनपर निबंध, ललित साहित्य, कथा साहित्य, अनुवाद आणि भाषांतर असे अनेक प्रकारात लेखन केले. ‘लढाई संपल्यावर’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये सुमारे 59 पुस्तकांची भर पडली. त्यांच्या संशोधनात्मक लेखनात महाभारत आणि रामायण यावरील साहित्य उद्बोधक आहे. महाभारत या ग्रंथाला अनुसरून अनेक लेखकांनी लेखन केले; पण साधले यांच्या ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ या कादंबरीत त्यांनी युधिष्ठिराला खलनायक बनवल्यामुळे मोठी खळबळ उडाली आणि त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले; मात्र त्यामुळेच त्यांचे नाव वाचकांपर्यंत पोहोचले.
हेही वाचा – गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…
शाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, मालती माधव, वेणीसंहार, मृच्छकटिक, मुद्राराक्षस अशा प्रसिद्ध संस्कृत नाटकांचे अनुवाद त्यांनी कादंबरीरूपात केले. तसेच, कुट्टनीमतम्, अमरुशतक, गीतगोविंद ही काव्ये त्यांनी गद्यात अनुवादित केली. ‘आनंदध्वजाच्या कथा’ या संग्रहात प्रामुख्याने विविध देशांतील संस्कृतीतील कथांवर आधारित कथा आहेत. “मातीच्या चुली’ हे त्यांचे आत्मचरित्र देखील वाचकप्रिय होते. 4 एप्रिल 1996 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – काही शुभ आणि परोपकारी कार्ये हाती घ्याल. इतरांच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या कामावर परिणाम होईल. प्रतिस्पर्धी तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध राहिले पाहिजे. जोडीदाराच्या प्रकृतीत अचानक बिघाड होऊ शकतो. जुनी देणी वेळेवर फेडा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल.
वृषभ – मुलांकडून चांगली आणि उत्साहवर्धक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची एखादी जुनी समस्या असेल तर आज त्यातून आराम मिळेल. पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. वाढत्या खर्चावर देखील नियंत्रण मिळवू शकाल.
मिथुन – नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तयारी कराल. मात्र मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कामाचा भार वाढवून तुम्हाला व्यग्र ठेवू शकतात. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही. व्यवसायात नव्या भागीदारीचे प्रस्ताव मिळतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
कर्क – कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत करा, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धनलाभ झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या करिअरबाबत घाईने किंवा भावनिक निर्णय घेणे टाळा. आज सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा यांत वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा.
सिंह – शासकीय कामात यश मिळेल. मात्र, गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. एखाद्या प्रोजेक्टमध्ये पैसे अडकू शकतात. आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अन्यथा शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आतापर्यंत प्रलंबित असणारी कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या अतिभारामुळे थकवा जाणवू शकतो. एखादा जुना मित्र बऱ्याच काळानंतर भेटू शकतो.
कन्या – सर्जनशील कामांमध्ये रस वाटेल. पूर्वी कोणाला पैसे उधार दिले असतील, तर आज ते परत मिळू शकतात. आपला राग आणि बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. कुटुंबातील कोणत्याही प्रकारच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराच्या पाठिंब्याची गरज लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
तुळ – आर्थिक कमाईसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळतील. एखाद्या छोट्या प्रवासाला जावे लागू शकते. काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रतिकूल हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. बहिणींकडून प्रेम आणि आशीर्वाद मिळतील.
वृश्चिक – उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे काही जुनी कर्जे फेडू शकाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. शिक्षण आणि अध्यापन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सुखद असेल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मात्र, तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार करा, दुर्लक्ष करू नका.
हेही वाचा – Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!
धनु – प्रलंबित न्यायालयीन खटला आज यशस्वी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला ताण जाणवेल. दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च करू शकता. नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील.
मकर – तुमच्या योजनांचा कामाच्या ठिकाणी फायदा होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. खर्च अचानक वाढू शकतो. कार्यालयीन काम लवकर संपवून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घरी परतण्याचा प्रयत्न कराल. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. जुने येणे अनपेक्षितपणे वसूल होईल.
कुंभ – मालमत्तेसंबंधीच्या सौद्यामध्ये फायदा होईल. तथापि, जमीन किंवा घराच्या व्यवहाराचा विचार करत असाल, तर सही करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. कोणत्याही गोष्टीला शांतपणे विचार न करता होकार देऊ नका. कुटुंबातील सदस्याच्या प्रकृतीतील बिघाडामुळे तुमची धावपळ होईल आणि थोडे चिंतेत असाल. खर्च वाढल्याने बजेट बिघडू शकते.
मीन – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सुखद असेल. एखादा दीर्घकाळ प्रलंबित असलेला करार निश्चित होऊ शकतो. व्यावसायिक योजनांचा आज फायदा होईल. संध्याकाळी तुम्हाला महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावातून दिलासा मिळेल आणि त्यांना स्पर्धांमध्ये यश मिळू शकते.


