भाग – 1
माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून… पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पांसोबत देवळात जायचे होते. आमच्या घराच्या पानंदीजवळ आप्पाच दिसलें. काठीने आमच्या काळू आणि सैना या गाईना हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पहाताच आप्पा म्हणाले, “नंदा, धावतेस कशाला? कोण पाठी लागलंय?”
मी म्हटलं, “अहो आप्पा, तुमच्याबरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी!”
आप्पा हसून म्हणाले, “होय बाई, मला माहात होते पण गमतीने विचारलं.”
मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवले. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवले होते. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने मी गरम पातेल्यातील दूध माझ्या ग्लासात ओतले आणि फुंकर मारीत मारीत दूध पिऊन टाकले. मग खोलीत जाऊन फ्रॉक बदलला आणि आप्पांची वाट पाहात राहिले.
गोठ्यात आई काळूचे दूध काढत होती आणि आप्पा छोट्या वासराला पकडून होते. दोन तांबे भरून आईने दूध काढले आणि आप्पांनी वासराला लुचायला सोडले. दोन्ही हातात दुधाने भरलेले तांबे घेऊन आई मागील दाराने आत आली आणि मला पहाताच म्हणाली, “”दूध घेतलंस का? आणि रात्री घरी आल्यावर अभ्यास पुरा करायचा गुरुजींचा. सकाळी उशिरा उठतेस तू, सकाळसाठी ठेऊ नकोस. दादा आला का शाळेतून?”
मी म्हटलं, “नाही बहुतेक, आला तर मला दिसला असता.”
तेवढ्यात आप्पा त्यांच्या अंगात बंडी घालून आणि मोठी बॅटरी आणि काठी घेऊन लोट्यावर हजर झाले, मला पाहाताच म्हणाले,
“चला, नंदू बेटा… ते खोरणात पुस्तक असेल ते घे आणि चप्पल घाल, चला…”
एवढ्यात आई पदराला हात पुसत बाहेर आली आणि मला म्हणाली, “आप्पांचा हात सोडू नकोस… जाताना येताना! वाटेल फुर्शी, दिवडे येतात पायाखाली, बघून चाल…”
मी “हो… हो…” म्हटले. आप्पांचा हात पकडला आणि आम्ही अंगणातून बाहेर पडणार एवढ्यात दादा शाळेतून आला. मी आप्पांचा हात पकडून निघणार, एवढ्यात तो माझ्यावर खेकसला “नंदे, काय चाललंय तुझं? कसली फालतू नाटकं करता? गावातील फालतू माणसांमध्ये वावरते? निदान तू तरी…”
हेही वाचा – म्हाई… आर्थिक अडचणीत चेकचा दिलासा
मी त्याच्या बाजूने धावत बाहेर गेले आणि आप्पांच्या पुढे चालू लागले.
आप्पा – नंदे, तुझ्या दादाला आवडत नाही तू माझ्याबरोबर येतेस ते… मग तू कशाला येतेस? तू जा बरं घरी!
मी – आप्पा, मला आवडते नाटक… तुम्ही इतरांना नाटक शिकवता ते आवडतं, मला आता नाटक पाठ पण झाले आहे!
आप्पा – खरे की काय? आणि नाटकातल्या पार्ट्यांना पाठ होत नाही.
बोलत बोलत मी आणि आप्पा देवळाकडे पोहोचलो. तोपर्यंत गावातील इतर झिलगे आले होते. मी काही लोकांना ओळखत होते. कुंभारांचा नामू, मोन्या जळवी, संतू मडवल, कृष्णा जगताप आणि इतर काही… आप्पांनी माझ्याकडून पुस्तक मागून घेतले आणि आप्पा म्हणाले –
अंक दुसरा, प्रवेश पहिला… औरंगजेब आणि दिलेरखान… म्हणताच दिलेरखनाची भूमिका करणारा नामू कुंभार उभा राहिला, औरंगजेबाची भूमिका आप्पा स्वतः करत होते. आप्पानी नामूला दरबारात प्रवेश कसा करायचा, नजर कुठे ठेवायची… बादशहाला मुजरा कसा करायचा, हे दाखवले आणि नामूकडून तीन वेळा करून घेतले. मग आप्पा बादशहाच्या भूमिकेत बाकावर बसले आणि बादशहाचे सवांद म्हणू लागले…
माझ्या मनात आले, माझे आप्पा पहिली की दुसरी शिकलेले, गावात भिक्षुकी करणारे, कधी शिवाजी, कधी सोयराबाई, कधी दिलेरखान तर कधी औरंगजेब बादशहा कसे बनतात? त्यांच्या भूमिकेत कसे काय शिरतात? या गावाच्या पलीकडे ते फारसे जात नाहीत… गेले तर कधी-मधी रत्नागिरीपर्यंत.. मग एवढे नाटक बसवणे कसे काय जमते? याचा अर्थ माझे आप्प्पा खूप खूप हुशार असणार! मग माझा दादा आप्पांवर का चिडून असतो? तो त्याच्याशी एक शब्द पण बोलत नाही… जे काही आहे ते सारे आईकडे.
नाटकाची तालीम संपवून आम्ही घरी आलो. आई बिचारी आमची वाट पाहात होती. मग जेवणं करून झोपलो.
सकाळी मला जाग आली, तेंव्हा माझ्या लक्षात आले आप्पा सकाळीच भिक्षुकीला गेले असणार, त्याआधी त्यांनी गोठ्यात गाईचे शेण काढले असणार आणि शेण डोक्यावरून टोपलीतून बागेत पोफळींना टाकले असणार… मग आप्पा किती वाजता उठले असतील? रात्री उशिरा झोपतात आणि भल्या पहाटे उठतात आप्पा.
मी खोलीतून बाहेर आले एवढ्यात आतील खोलीतून आई आणि रवीदादा यांचे मोठमोठ्याने बोलणे ऐकू आले… मी कान टवकारले,
दादा – मला हे पसंत नाही, रोज नाटकें करतात… गावातल्या कसल्या कसल्या लोकांना जमवतात… तो कोण न्हावी, कुंभार, मडवल, हरिजन सुद्धा असतो म्हणतात नाटकात… सकाळी गावात भिक्षुकी करतात आणि रात्री नाटकाची तालीम, आणि नंदेला घेऊन जातात बरोबर, तू सांगत कसे नाहीस त्यांना?
आई – रवी, त्त्यांची आवड आहे ती. नाटक, भजन हा त्त्यांचा श्वास आहे. त्त्यांचे रोजचे काम ते व्यवस्थित करतात ना? रोज गावातील भिक्षुकीला जातात, शिवाय कुठे एकादशणी, सत्यनारायण असेल ती पण चुकवतत नाहीत. आपण दोन वेळ जेवतो, कपडे घालतो तो त्यांच्याचमुळे… शिवाय, गुरांना चरायला नेणे, गवतकाडी घालणे कोण करतं? तू करतोस काही?
रवी – पण खालच्या जातीच्या लोकांमध्ये वावरणे बरे काय? आपले मामा बघ… म्हणजे तुझे भाऊ. कसे अलिप्त राहतात गावापासून! तुझ्या भावाकडे असे वातावरण असताना, तू तुझ्या नवऱ्याला का सांगत नाहीस?
आई – लग्नाच्या आधी मी माहेरची होते, त्यावेळी ते संस्कार होते… लग्न करून या घरात आले, आता माहेरचे विसरले आणि या घराची झाले.
रवी – पण नंदेला तरी या लोकांत नेऊ नको म्हणावं.
आई – तिला आवडते नाटक, जाऊदे तिला… नाहीतरी या गावात कसली करमणूक आहे.. जाते आवडीने, जाऊदे.
दादा रागारागाने त्याच्या खोलीत गेल्याचे मी पाहिले. मी आईजवळ जाताच आई म्हणाली “नंदे, दोघांचे एक मिनिट पटत नाही… हा रवी बोलत पण नाही आप्पांशी. कसला राग घेऊन बसला आहे?”
“आईला किती सांगितले तरी, ती आप्पांचीच बाजू घेते, खरेतर, आपले मामा कसे वागतात, हे तिला माहीत आहे… गावचे मामा पण गावातील इतर समाजापासून अलिप्त असतांत, मुंबईचे मामा पण कामावर जाताना आपला डबा आणि पाण्याच्या बाटलीला कोणाला हात लावू देत नाहीत, एवढे सोवळे पाळतात आणि आप्पा सर्व जातीतील लोकांमध्ये मिसळतात. त्यांच्यासोबत जेवत पण असतील, भजनाच्या वेळी कुणाच्याही घरी चहा पितात… मला हे अजिबात आवडत नाही. सोबत नंदेला घेऊन जातात, हे पण पटलेले नाही. नंदेला काय… आपल्या आप्पांचा पुळका असतो,” असे रवीचे म्हणणे होते.
हेही वाचा – म्हाईच्या रुपाने मदतीला आली संजयची आई!
“मी दोन वेळा वाद घातला आप्पांशी, पण त्यांच्यात काही बदल नाही. या घरात रहाण्याचा पण मला कंटाळा आला आहे, पण आई म्हणजे माझा वीक पॉइंट आहे. तिच्यावर माझे फार प्रेम आहे. मी जन्मत: अशक्त होतो म्हणे, आईने निगुतीने मला मोठं केल, तिला वाईट वाटतं मी आप्पांशी बोलत नाही ते… पण त्यांनी आपले वागणं बदलावं.. मग मी बोलेन…” अशी त्याची भूमिका होती.
दादा मॅट्रिक झाला आणि मोठ्या मामाकडे शिक्षणासाठी मुंबईला गेला. दादा माझ्या मामाचा खूप लाडका. दोघांचे विचार सारखेच… आप्पांच्या विरुद्ध! म्हणून दोघेही आप्पांना दूषणं देत असतात… पण मी आप्पांच्या विचारांची! आप्पांची नाटके आवडीने पाहणारी… भजने ऐकणारी…
कॉलेजात असताना दादा चार दिवसांसाठी यायचा, आई आणि तो तासन् तास गप्पा मारायचे, पण तो आप्पांशी कधी बोलला नाही. दादा आला म्हणजे आप्पा खूश असायचे, त्याच्यासाठी शहाळी आणायचे, ओले काजू आणायचे, आंबे आणायचे… पण दादाला त्त्यांचे हे प्रेम कसे दिसायचे नाही कोण जाणे?
दादा ग्रॅज्युएट झाला आणि नोकरीला लागला. त्याने पत्र लिहून आईला कळविले. आईने आप्पांना सांगितले, तेव्हा त्यांना किती आनंद झाला. ते जेथे जेथे भिक्षुकीला जात तेथे त्या लोकांना आपल्या मुलाबद्दल सांगत. त्यांनी आमच्या वाडीत सर्व घरात पेढे वाटले, पण आईला आणि मला वाटतं की, दादाने हे आप्पांना सांगायला हवे होते… एकवेळ त्याने आम्हाला कळविले नसते तरी चालले असते!
क्रमश:


