नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
मुलगी म्हटलं म्हणजे तिला स्वयंपाक बनवता आलाच पाहिजे. आजच्या काळात तर तो मुलांनाही बनवता आला पाहिजे! COVIDने हे अगदी सिद्ध केलं की, फक्त स्वयंपाकच नव्हे तर, घरातली सगळीच कामं फक्त मुलींनाच नव्हे तर मुलांनाही येणं खूप गरजेचं आहे. मी अगदी चौथीला असल्यापासून आईसोबत पोळ्या भाजायला बसायचे. थोडंस कणिक मळायचे. कधी तर पोळ्यासुद्धा लाटायचे. शिक्षण, नाटक, नाटकाचे दौरे, शूटिंग हे सुरू असतानाच, अधून मधून किचनमध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागायचं…
एकूणच बेसिक स्वयंपाक मला येत होता. लग्नानंतर छान नवनवीन प्रकारचा स्वयंपाक आणि तोही रूचकर आणि झटपट कसा बनवायचा ते सासूबाईंकडे शिकले. त्या म्हणजे अगदी हातगुणी, सुगरण! मसाल्याचं पाणी जरी उकळवून दिले तरी चविष्ट लागणार… बरं, स्वयंपाक फक्त चविष्टच नाही तर, झटपट देखील. बाईला कामाचा उरक असावा… पटापट किचनचे काम उरकून जरा आराम करावा, स्वतःला वेळ द्यावा, पुस्तकं वाचावी, टीव्ही पहावा… असे त्या नेहमी म्हणत. अशा एक्सपर्टच्या हाताखाली मी छान छान पदार्थ बनवायला शिकले.
हेही वाचा – मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!
खरंतर, आमच्या घरात अजून एक उत्तम आचारी होते, शेफ सुरेश सिंग! माझ्या नणंदेचे पती. मी आणि माझी मुले त्यांना ‘पप्पाऊ’ म्हणायचो… थ्री स्टार, फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार अगदी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मॅनेजमेन्टला होते. तिथलं किचन, मेनू सेट करायचे. एवढे मोठे हॉटेल व्यावसायिक पण मानलं, सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नव्हतं. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी एव्हरशाइन नगरमध्ये बॅडमिंटनची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. उत्तर प्रदेशचे राजापूत होते ते. उत्तम हातगुण. एखादा पदार्थ बिघडला ना, तरी सहज मॉडिफाय करण्याची हातोटी होती. तो अगदी नवीन पदार्थ बनायचा. त्यांच्याकडे मी बरेच पदार्थ बनवायला शिकले. त्यांचा उरक फार चांगला होता.
आता तर काय सोशल मीडियावर कितीतरी लोक आहेत, स्वयंपाक शिकवणारे… पण फास्ट, चविष्ट आणि समोरच्याला आवडेल असा, शिवाय गृहिणीला बनवताना आणि खाऊ घालताना आनंद मिळेल असा, स्वयंपाक फक्त पप्पाऊच बनव आणि शिकवू जाणे. आता पप्पाऊ नाहीत, पण त्यांनी शिकवलेला स्वयंपाक, उरक, तो आनंद मात्र माझ्याकडे निश्चित आहे… आणि मी ते सगळं वाटण्याचा प्रयत्न पण करत असते. ज्याला जमेल ते माझ्याकडून घेतातच… स्वयंपाक बनवणे यासारखी उत्तम कला आणि आनंद दुसरा नाहीच!
हेही वाचा – माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!


