Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    March 30, 2026

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, March 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…
    ललित

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    शोभा भडकेBy शोभा भडकेMarch 30, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, आरूच्या बदनामीचे गुपित, रामची तगमग, रामचे चिडणे, शिवचे कारस्थान, राम आरूचे स्नेहबंध
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 20

    “आरं, आवर की पटापट… हळदीसाठी पोहोचायचं लवकर,” कलावती  रामला ओरडत होत्या.

    आज हळदीचा कार्यक्रम होता. आरू तयार होऊन बसली होती. हळद हॉलवर होणार होती. त्यामुळे सगळे तिकडे जाण्याच्या तयारीत होते. प्रत्येक जण काही ना काही कामात होता. काही सामान घ्यायचं होतं, काही घेतलं होतं.

    गावाकडचे बरेचसे पाहुणे हे उद्या डायरेक्ट लग्नालाच येणार होते. हळदीसाठी भावकीमधले काही मोजके लोक, जवळचे नातेवाईक, जसे मामा मावशी वगैरे… असे थोडेच पाहुणे आज हजर होते. एकतर, गावाकडचे लोक असं दोन-दोन दिवस काम टाकून येऊ शकत नव्हते आणि त्यात आत्याचं घर तसं लहानच होतं. तरी शेजाऱ्यांनी बरीच मदत केली होती.

    राम हळदीसाठी तयार व्हायचं सोडून अजूनही कामंच करत होता. म्हणून कलावती चिडल्या होत्या. तसं तर, हळदीसाठी नवरदेव नवरीच्या घरी जायची पद्धत होती, पण दोन, दोन लग्न असल्यामुळे दोन्ही जोडप्यांची हळद हॉलवरच करायची ठरलं होतं. त्यामुळे सगळे हॉलवरच पोहोचणार होते.

    “आई, एवढी काय घाई तुला? झालं माझं, दहा मिनिटं नाही लागणार मला तयार व्हायला. आलोच पाच मिनिटांत…” हातातलं काम संपवून राम आईला म्हणाला आणि आत निघून गेला .

    “हॅलो… हां पवन सगळ ठीक आहे ना? सगळी तयारी व्यवस्थित आहे ना?” राम फोनवर बोलतच रूममध्ये आला. तिथून पवनने काहीतरी उत्तर दिलं आणि मग रामने फोन ठेऊन दिला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला… थोड्याच वेळात तो बाथरूममधूनच चेंज करून बाहेर आला, तर समोर आरू उभी होती…

    पिवळ्या साडीत… अंगावर घातलेले ते पिवळे-गुलाबी कॉम्बिनेशन असलेले फुलांचे दागिने तिच्यावर खूपच शोभून दिसत होते… सैलसर घातलेली वेणी, त्यावर मोगऱ्याचा गजरा… चेहऱ्यावर नावालाच मेकप केला असेल…  हातावर लालचुटूक रंगलेली मेंदी… आणि त्यावर हिरवा चुडा… आज शिव त्याच भान विसरला नाही तर नवलच! पण सध्या राम मात्र तिला पाहून भावूक झाला होता…

    त्याची एवढीशी आरू… कालपर्यंत ‘दादा.. दादा…’ करून त्याच्या मागे फिरणारी… उद्या लग्न करून कायमची त्याला सोडून जाणार… या विचाराने त्याला गलबलून आलं. पुढे होऊन तिला घट्ट मिठी मारून खूप खूप रडावं असं वाटलं… पण सावरलं त्याने स्वतःला, आणि चेहरा निर्विकार ठेवत तो पुढे आला…

    हेही वाचा – रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    आरू पण त्याच्याकडे आशेने पाहात होती… की दादा आत्ता जवळ घेईल आणि म्हणेल, “गेला माझा राग!” त्याचा चेहरा पाहून मात्र आरू स्वतःचे अश्रू रोखू शकली नाही… तिनेच पुढे होऊन त्याला मिठी मारली… त्याला घट्ट बिलगुन रडत होती… त्याचे मात्र हात हवेतच राहिले… त्याने ना तिला जवळ घेतलं, ना दूर लोटलं. डोळ्यांत पाण्याची दाटी तर त्याच्याही झाली होती… पण महत् प्रयासाने ते तो अडवत होता… राग जो दाखवायचा होता! दुखावला होता तो…

    ०००

    रात्री सगळे निवांत झाले होते, बराच उशीर झाला होता… तयारीमुळे सगळे दमलेही होते आणि सकाळी लवकर उठायचं देखील होतं! शिवने मेहंदीवाली पाठवली होती, ती भावना आणि आरूच्या हातावर मेहंदी काढून गेली होती…

    भावना आणि आरु दोघी पलंगावर येऊन पडल्या… भावनाला लगेच झोप लागली. पण आरूला मेहंदीचा हात घेऊन काही झोपता येईना… अवघडून आल्यासारखं झालं होतं… तसं तर तिला मेहंदी काढण्याचा खुप शौक होता, तितकाच मेहंदी हातावर जास्त वेळ ठेवण्याचा कंटाळा देखील! हातभर मेंदी काढायची… तास- अर्धा तास त्यात घालवायचा आणि नंतर मग पाच मिनिटंही लागायची नाहीत, तिला हात धुऊन काढायला. पण आज आईने सक्त ताकीद दिली होती, “मेंदी आज्याबात पुसून काढायची न्हाय. सवस्नीचं लेनं हाय ते! लग्नाची शकुनाची मेंदी असत्या ती…” मग काय नाईलाज होता. पण आता तिला झोप येत नव्हती…

    तिने एकदोन वेळा भावनाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काही उठली नाही. मग आरू उठून बाहेर आली आणि गच्चीवर गेली… मोकळ्या हवेत आल्यावर तिला जरा बरं वाटलं… तिला सवय होती, असं रात्रीच्या वेळी गावाकडे अंगणात बाज टाकून पडायची आणि आकाशातले तारे मोजत बसायची…

    आताही ती वर आकाशकडे तोंड करून उभी होती… “अय्यो, आज किती चांदण्या पडल्यात! एक… दोन… तीन… चार… पाच…” ती मोठ्याने मोजत होती. “त्या बघ तिकडे… सात… आणि हिकडं आठ… नऊ… दहा…” मागून रामचा आवाज आला.

    त्यालाच पुढे कंटिन्यू करत आरू, “अकरा… बारा… तेरा…”

    “पंधरा.. सोळा.. सतरा…” असं म्हणत दोघं खळखळून हसले.

    “किती दिवसांनी आपण चांदण्या मोजत बसलोय!” आरू हसतच म्हणाली.

    “हम्म… आणि आता यानंतर कधी मोजत बसू काय माहीत!” राम दुःखी होत म्हणाला.

    “दादाsss” असं म्हणून आरू त्याच्या कुशीत शिरली.

    “लग्न होणार दोन दिवसांनी तुझं… तू कायमची मला सोडून जाणार… आरू लग्न झाल्यावर मुलीच्या अंगावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडतात गं! तुला जमेल ना? तुला त्रास होईल गं?” राम तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला.

    “जमेल ना, दादा त्यात काय एवढं! मी जमवून घेईन…” ती त्यालाच समजावून सांगत होती.

    “हो, आजपर्यंत तुला सकाळी लवकर उठणं झालं नाही. बाकीच्या कामांची तर बोंबच असते, आणि तू जमवून घेणार!” पवन खिशात हात घालत त्यांच्याजवळ येत म्हणाला.

    “ओ दाजी… तुम्ही सुरू होऊ नका हां आता! दादा बघ ना रे…” आरू बाजूला होत, पवन समोर बोट दाखवून त्याच्यावर चिडत म्हणाली.

    “नकटे… बघ अजूनही लहान मुलांसारखी चिडतेस आणि म्हणे मी जमवून घेईन!” पवन पुन्हा तिला चिडवत म्हणाला आणि तिचे केस ओढून रामच्या मागे जाऊन लपला.

    “दाजीsss. ओढलेस ना माझे केस? दादा बघ ना…” ती कळवळली  आणि रामला तक्रारीच्या सुरात म्हणाली.

    “पवन, काय करतोयस? का त्रास देतोय तिला?” राम त्याला खोटं खोटं रागवत म्हणाला.

    त्यावर पवन तोंड वेडवाकडं करत, भुवया उंचावत डोळ्यांनीच, “बघ दादा पण तुलाच चिडवत आहे,” असं दाखवत होता.

    “जा बाबा.. मी ना… मी बोलणारंच नाही तुमच्या दोघांसोबत! …आणि लग्न झाल्यावर येणार पण नाही तुमच्याकडे…” ती चिडून म्हणाली आणि काठड्याजवळ जाऊन उभी राहिली… समोर पाहात…

    तिने लग्न हा शब्द उच्चारला आणि रामला काहीतरी आठवलं… तसा तो गंभीर झाला… पवनच्या पण ते लक्षात आलं…

    “दादा, काय झालं?” त्याने काळजीने विचारलं.

    आरूने पण त्या दोघांकडे वळून पाहिलं… राम तिच्याकडे गंभीर नजरेने पाहात होता… त्याचा तो गंभीर चेहरा पाहून आरू पण त्याच्याजवळ येत काळजीने म्हणाली, “दादा… काय झाल?”

    ती जवळ आली तसं रामने तिचा हात अलगद हातात घेतला… मेहंदी एव्हाना सुकली होती… त्याने एक दीर्घ श्वास घेत तिच्या डोळ्यांत नजर रोखून पाहू लागला… त्याची ती तीक्ष्ण आणि रोखलेली नजर पाहून आरू गोंधळात पडली… कारण त्याच्या नजरेची भाषा तिला कळत होती…

    “आरू… या लग्नाला हो का म्हणालीस तू?” रामने तिच्यावर नजर रोखत विचारलं.

    “अं… दादा… हे काय आता मधेच विचारतोस? आणि तुला माहितीय गावात काय झालं… आई आणि भाऊंची बदनामी झाली माझ्यामुळे… ते सगळं…” बोलताना आरूच्या डोळ्यात पाणी आलं.

    “दादा, आता कशाला होऊन गेलेलं आता काढून तिला त्रास देतोयस? आपल्याला महितीय ना, हे लग्न का होतय ते!” पवन.

    “माहिती आहे. पण आरूच्या होकराचं हे कारण नाहीये पवन… जर काही चूक नसेल ना तर भांडून ओरडून, कालवा करून स्वतःचं म्हणणं सिद्ध करणारी आरू चुपचाप लग्नाला तयार झाली?” राम परत तिला रोखून बघत म्हणाला.

    “दादा, मला झोप आली. सकाळी लवकर उठायचंय, मी जाते…” ती नजर चोरत म्हणाली आणि जायाला लागली …

    “तुला माझी शपथ आहे आरू… मला खरं कारण हवंय…” राम तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात कडक आवाजात म्हणाला.

    आरूने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि मागे वळली… तिला कळून चुकलं होतं, आता दादा ऐकल्याशिवाय शांत बसणार नाही! खरं कारण सांगावंच लागेल…

    “द… दादा… दादा ते… ते मी ना… मी ना तुझं आणि पवन दाजीचं शेतात बोलणं ऐकलं होतं त्या दिवशी… जे आपल्या घरी अचानक येऊन लग्नाची मागणी घालून गेले, त्यांच्या बहिणीवर तू प्रेम करतोस आणि कुठल्या तरी कारणामुळे तुम्ही दोघे वेगळे झालात! तुझ्या डोळ्यात पाणी होतं… मला तुम्हा दोघांना एकत्र आणायचं होत म्हणून मी लग्नाला तयार झाले…” एका दमात तिने सगळं सांगितलं आणि हळूच डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तर तो अतिशय रागात तिच्याकडे पाहात होता… पवन पण आळीपळीने त्या दोघांकडे पाहात होता…

    “दादाsss” आरू त्याच्याजवळ जात हळूच म्हणाली.

    “दूर राहायचं माझ्यापासून… खूप मोठी झालीस तू! भावासाठी त्याग वगैरे करायला लागलीस…” तो रागात म्हणाला आणि ताडताड पावलं टाकत निघून गेला.

    ” दादा… दादा… दादा ऐक ना! असं नको ना बोलू.  दादा प्लीज दादा…” ती खाली बसून रडू लागली.

    पवनला पण वाईट वाटत होतं, “आरू… आरू रडू नकोस… तो आत्ता चिडला आहे म्हणून असं म्हणाला, पण सकाळपर्यंत त्याचा राग निघून जाईल… तुझ्यावर  जास्त वेळ नाराज नाही राहू शकत तो,” पवन तिला समजावत खांद्याला धरून उठवत म्हणाला.

    “दाजी तुम्ही… तुम्ही सांगा ना, मी काही चुकीचं नाही ना केलं? असं पण माझं लग्न कुठे तरी झालंच असत ना! भाऊंना किती राग आला होता, माझ्यामुळे त्यांची मान खाली गेली होती… मी…” ती रडत रडत पवनला सांगत होती.

    “हो.. हो… तुझी काही चूक नाही, शांत हो बरं तू…” तिला शांत करत तो म्हणाला. हलकेच त्याच्या मिठीत शिरली होती ती आणि तो तिला पाठीवर थोपटत होता… वाईट वाटत होत त्यालाही आणि त्या मुलाचा रागही येत होता, ज्याने हे सगळं घडवून आणलं होतं…

    ००००

    “आरू रामच्या मिठीत शिरून रडत होती… त्याने सुस्कारा सोडत तिला बाजूला केलं आणि थंडपणे म्हणाला, “तुझा मेकप खराब झालाय, भावना हिला घेऊन जा आणि लवकर आवरा…” तिथे भावना आली होती त्याने तिला सांगितले.

    “दादा…” आरू पुन्हा त्याच्याकडे आशेने पाहात म्हणाली.

    “जाss” तो एवढंच म्हणाला.

    “आरू चल ना, खरंच तुझं काजळ बघ पसरलं आहे चेहऱ्यावर… अजून उशीर झाला ना तर, मामी ओरडतील परत…”  भावना तिला घेऊन गेली.

    ती गेली तसं रामने रागात आपल्या हाताची मूठ भिंतीवर जोरात मारून घेतली.

    “दादाsss काय करतोयस?” राम परत हात भिंतीवर मारून घेत होता तर, पवनने  धावत येऊन त्याचा हात धरला.

    “वेड लागलय का दादा तुला? का असा वागतोयस? जे काही झालं त्यात तुझा दोष नाही, दोष कुणाचा असेल तर, त्या मुलाचा आहे आणि परिस्थितीचा…” पवन त्याला समजावत म्हणाला.

    हेही वाचा – रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली

    “नाही… मीच जबाबदार आहे, या सगळ्याला! माझी आरू… तिचं स्वप्न होतं रे शिकायचं… आयुष्य मोकळेपणाने जगायचं… तर हे लग्नाचं ओझं तिच्यावर लादलं जातंय! तेही फक्त माझ्यामुळे… काय करू मी सांग ना? माझं प्रेम मला मिळतंय म्हणून खूश होऊ की, माझ्या आरूसोबत जे काही झालं त्याला मी जबाबदार आहे, म्हणून दुःख करत बसू!” तो रागात म्हणाला.

    “दादा, आता काहीच करु नकोस, जे होतंय ते होऊ दे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, असं तूच सांगत असतो ना! मग दे ना काळावर सोडून सगळं… आणि आपली आरू ना लहान जरी असली, कमजोर नाही… बघच तू! तिला जर कळलं ना की, तिची बदनामी करणारा, ते फोटो व्हायरल करणारा तो शिवराज सरपोतदार आहे तर, त्याचे असे हाल करेन ना ती, बघच तू!!” पवन तावातावात म्हणाला.

    “नाही… नाही… पवन आरूला हे कधीच कळायला नको. तिला खूप धक्का बसेल आणि ती स्वतःलाच त्रास करून घेईल रे… शिवने जे केलं ना त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही. पण आरूच्या नजरेत तो वाईट नाही व्हायला पाहिजे… जन्मभरासाठी तिची गाठ बांधली जाणार आहे, त्याच्यासोबत!” राम एकटक शून्यात बघत म्हणाला.

    पण जे नको व्हायला पाहिजे, असं रामला वाटत होतं, ते तर होऊन गेलं होतं. रूमच्या बाहेर उभ्या आरूने पुन्हा एकदा त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं!

    क्रमशः

    Avatar photo
    शोभा भडके

    मूळ गाव कांबी, जिल्हा बीड. मूळ राहण्याचे ठिकाण बीड. मी लेखनाला सुरुवात करायच्या आधी फक्त एक वाचक होते. म्हणून प्रतिलिपी ॲपवर कथा वाचनच करत होते. तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं मी एखादी स्टोरी लिहू शकेन. पण वाचन करत करता मनात आलं आणि लिहू लागले. लिहिलेलं वाचकांना आवडत गेलं, तसं माझा लिहिण्याचा हुरूप वाढत गेला... आज लेखनामुळे आर्थिकदृष्ट्या पण स्वावलंबी झाले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

    Related Posts

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    March 28, 2026 ललित

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026 ललित

    आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण…

    March 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    या डोळ्यांची दोन पाखरे…

    By मधुर सुनील कुलकर्णीMarch 28, 2026

    भाग – 1 मी शिवाजीनगरच्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि 9.55ची लोणावळा लोकल प्लॅटफॉर्मवर आली. मी घाई…

    कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…

    March 28, 2026

    आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण…

    March 27, 2026

    त्याच्या आठवणींची खोल दरी…

    March 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मार्च 2026

    March 30, 2026

    राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 29 मार्च ते 04 एप्रिल 2026

    March 29, 2026

    Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…

    March 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 251
    • अवांतर 178
    • आरोग्य 94
    • पंचांग आणि भविष्य 367
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 188
    • मैत्रीण 17
    • ललित 518
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn