सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुबगिजे । पिकासी निवाडु देखिजे । अधिकाधिक ॥55॥ पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । तें सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे ॥56॥ तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलौनि आम्ही ॥57॥ अगा बाळका लेवविजे लेणें । तयाप्रमाणें तें काय जाणे । तो सोहळा भोगणें । जननीयेसी दृष्टी ॥58॥ तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें असे ॥59॥ आतां असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥60॥ आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें । परि असो हें अंतःकरणें । अवधान दे ॥61॥ ऐकें ऐकें सुवर्म । वाक्य माझें परम । जें अक्षरें लेऊनि परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥62॥ तरी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरि गा जो मी येथें । तें विश्वचि हें ॥63॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥2॥
एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी ॥64॥ उदरींचा गर्भु जैसा । नेणे मायेची वयसा । देवांसि मी तैसा । चोजवेना ॥65॥ आणि जळचरां उदधीचें मान । मशकां नोलांडवे गगन । तैसें महर्षींचें ज्ञान । नेणे मातें ॥66॥ मी कवण केतुला । कवणाचा कैं जाहला । निरुती या करितां बोला । युगें गेलीं ॥67॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…
अर्थ
प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर, त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. ॥55॥ ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता, त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो, अर्जुना, ते सोने शुद्ध करावेसेच वाटते. ॥56॥ अर्जुना, त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकारांचे ओझे नाही. कारण आम्ही आपल्या स्वार्थासाठी बोलत आहोत. ॥57॥ अरे, मुलाला दागिने घालतात, पण ते मूल त्याप्रमाणे (दागिन्यांना) जाणते काय? दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगावयाचा असतो, ॥58॥ त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसजसे तुला समजेल, तसतसा आमचा आनंद दुप्पट होतो; अशी वस्तुस्थिती आहे. ॥59॥ आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही (म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही). ॥60॥ आम्हाला एवढ्याकरिता तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते. परंतु हे असू दे. तू मनापासून लक्ष दे. ॥61॥ तर ऐक मर्मज्ञ अर्जुना, आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे. ॥62॥ तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना? (जर जाणत नसलास तर सांगतो,) येथे जो मी तुझ्यापुढे उभा आहे, तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे. ॥63॥
देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही. कारण देव आणि महर्षी या सर्वांचे आदिकारण मी आहे. ॥2॥
या माझ्या स्वरूपी वेदांना बोलता येईना, मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना. सूर्य आणि चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्री शिवाय मावळले. (ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत.) ॥64॥ पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे (आपल्या) आईचे वय जाणत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही ॥65॥ आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणार्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही, (किंवा) चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठाल्या ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाही. ॥66॥ मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून आणि केव्हा उत्पन्न झालो आहे, या गोष्टींचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. ॥67॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे


