दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 3 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 24 मे 2025
वार : शनिवार
तिथि : द्वादशी 19:20
नक्षत्र : रेवती 13:48
योग : आयुष्मान 15:08
करण : कौलव 08:58
सूर्य : वृषभ
चंद्र : मीन 13.48
सूर्योदय : 06:01
सूर्यास्त : 19:09
पक्ष : कृष्ण पक्ष
मास : वैशाख
ऋतू : वसंत
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
शनिप्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
जागतिक कीर्तिचे जादूगार रघुवीर भोपळे
जागतिक कीर्तिचे जादूगार रघुवीर भोपळे यांचा जन्म 24 मे 1924 रोजी चाकणजवळील आंबेठाण येथे झाला. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रघुवीर पुण्यामध्ये आले. त्यावेळी ते अनाथ विद्यार्थीगृहामध्ये राहिले. माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्यात त्यांनी राणा या राजस्थानी कलाकाराला जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची कला आत्मसात केली. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना परदेश दौर्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी विविध 27 देशांचा प्रवास केला आणि आयुष्यभरात त्यांनी 7 हजार 23 प्रयोग केले. त्यातही वर्षभरात 200 हाऊसफुल प्रयोग करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जादू हा तंत्रमंत्र नसून ती हातचलाखी आहे, याबाबत त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांनी आपले सगळे आयुष्य जादू कलेच्या संवर्धनासाठीच समर्पित केले होते. 20 ऑगस्ट 1984 रोजी त्यांचे निधन झाले.
हेमचंद्र बंदोपाध्याय
बंगाली भावकवी हेमचंद्र बंदोपाध्याय यांचा 17 एप्रिल 1818 रोजी गुलिटा राजवल्लभघाट (जि. हुगली) या गावी जन्म झाला. कायद्याचे पदवीधर असलेल्या हेमचंद्र बंदोपाध्याय यांनी विद्यार्थिदशेतच कविता करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या कवितांवर अठराव्या शतकातील कवी भारतचंद्र तसेच इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवींचा प्रभाव होता. आपल्या मित्राच्या आत्महत्येवर त्यांनी ‘चितातरंगिणी’ कविता लिहिली आणि त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘वीरबाहू’ या त्यांच्या काव्यातून जाज्वल्य देशभक्ती, भाषाप्रभूत्व आणि छंदावरील पकड दिसते. ‘कवितावली’ हाही त्यांचा एक गाजलेला कवितासंग्रह आहे. राष्ट्रप्रेम, धर्मनिष्ठा, संवेदनशीलता व कुशाग्र बुद्धिमत्ता यांचे संचित लाभलेले हेमचंद्र बंदोपाध्याय यांचे 24 मे 1903 रोजी निधन झाले.
जागतिक राष्ट्रकुल दिन
दरवर्षी 24 मे रोजी राष्ट्रकुल दिन साजरा केला जातो. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्म 24 मे 1819 रोजी झाला होता. सुरुवातीला (1902पासून) हा दिवस एम्पायर डे म्हणून साजरा करण्यात येत होता. 1916नंतर हा दिन राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा केला जातो. काही देशांमध्ये राष्ट्रकुल दिन दरवर्षी 13 मार्च रोजी साजरा केला जातो. तथापि, भारत आणि इतर काही देश 24 मे रोजी तो साजरा करतात.