Sunday, April 27, 2025
Homeललितअखेर आम्ही अमेरिकेला पोहोचलो!

अखेर आम्ही अमेरिकेला पोहोचलो!

दिप्ती चौधरी

सुरवातीस दोन दिवस आम्ही कॅटरीमध्ये घाबरून होतो, पण नंतर सरावलो. डॉ. इरफान सतत आई आणि बाबांच्या संपर्कात होतेच. त्यांनी प्रयत्नपूर्वक आम्हाला त्या वातावरणाची सवय करून दिली. नंतर आम्ही त्यांना लाड पण करू द्यायला लागलो. आमच्या चाटायच्या पाण्याच्या बाटल्यामधून आम्हांला पाणी प्यायला शिकवा, अशी विनंती आईने केली होती. तर, त्यांनी आम्हाला नळावर पाणी प्यायला शिकवले. मला काही ते आवडत नाही, पण दानूला मात्र ते भारी आवडलं! बाटल्या राहिल्या बाजूला आणि हे महाशय हेच शिकून गेले. पुढे अमेरिकेला गेल्यावर त्याने आईला सरळ स्पष्ट केले की, मी आता वाटीतून पाणी पिणार नाही… स्वयंपाघरातील नळावर महाशय रोज सत्याग्रहला बसायचे आणि आईच्या कामाचा बोजवारा उडवायचे… कारण आईने नळ जवळ आणून धरून ठेवायचा, मगच हा पाणी पिणार. शेवटी त्याला पाण्याचे कारंजे आणून दिले तेव्हा कुठे प्रश्न सुटला.

आमचं विमान पहाटे निघणार होते, पण रात्री अकरा वाजताच डॉ. इरफान यांच्याकडून आम्हाला घेऊन एजन्सीची टीम विमानतळावर पोहचली. त्याआधी बारा तास आम्हाला काही खायला दिले नाही. सर्व सोपस्कार आटपून आम्हाला एमिरेट्स विमान कंपनीच्या ताब्यात दिले, असा निरोप आईला पोहचला आणि तिच्या डोळ्यांतून गंगा-यमुना सुरू झाल्या! प्रवास दोन दिवसांचा होता. बंगलोरवरून दुबई. तिथे पोहोचल्यावर तिकडच्या प्राण्यांच्या विभागात आम्हाला पिंजऱ्यातून बाहेर काढून मोठ्या पिंजऱ्यात ठेवले. आमचा बांधून दिलेला खाऊ दिला, पाणी दिले, पिंजरे खराब झाले असतील तर धुतले. चोवीस तास निगराणीखाली ठेवून, तपासणी करून मग ह्यूस्टनसाठी पुढील विमानात बसवून दिले.

ह्यूस्टनला आम्हाला उतरवून घेऊन तिकडचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी एक एजंट तिथेही नेमली होती. ती सारी प्रक्रिया पार पाडून आम्हाला घरी आणून सोडणार होती. आम्ही येणार तर अजून एकदा हॉटेलमध्ये राहायचा आम्हाला त्रास नको म्हणून आठवड्याभरात घर ताब्यात घेऊन राहायला पण सुरुवात केली होती. आमचे काही नवे-जुने खेळ, वास असलेल्या चादरी, नवीन लिटर बॉक्स, feline spray, ओळखीचा खाऊ अशा जय्यत तयारीनिशी आई, दिदी आणि पप्पा आमची वाट पाहत होते. आम्ही उतरल्यावर, ताब्यात आल्याबरोबर एजंटने पहिले आमचे फोटो आईला पाठवून दिले! आणि जवळ आली की, फोन करते म्हणाली… या व्यवसायात असल्याने तिला अशा प्रवास करून येणाऱ्या प्राणी-पालकांच्या मनस्थितीची कल्पना असावी.

हेही वाचा – अश्रू भरल्या डोळ्यांनी आईने केले टाटा…

मी पोहचते आहे, असा एजंटचा फोन आल्याबरोबर सारे दार उघडून बाहेर धावले… एजंट हसत हसत बाहेर आली. तिच्या छोट्या कुत्र्याने भुंकून भुंकून गाडी डोक्यावर घेतली होती. आईने दारातूनच हाक मारली आणि धावत आली, पण ती पोहोचायच्या आतच तिचा आवाज ऐकून दानूने प्रतिसाद दिला… मी पोहचलो गं! त्याचा आवाज ऐकून तिचा जीव भांड्यात पडला की, आम्ही व्यवस्थित आहोत. आम्हाला घरात आणून पिंजरे उघडल्याबरोबर बाहेर लिटरबॉक्स ठेवलेच होते… तिथेच पहिले धावलो. प्रवासात आम्ही शी केलीच नव्हती… मोठ्या प्रवासानंतर माऊ शी आणि शू करते का, यावर विशेष लक्ष द्यावे. मी दुसऱ्या दिवशीही शू केली नाही आणि सगळ्यांना घाबरवून सोडले… आई डॉक्टर शोधायला बाहेर पडली आणि नशिबाने मी प्रश्न सोडवला. त्यामुळे थोडक्यात निभावले.

बंगलोरपेक्षा या घरात आम्ही पटकन रुळलो… अगदी एका दिवसात सारे घर फिरून सराईत झालो आणि बिनधास्त फिरायला लागलो. हो, आम्हाला घराशी जवळीक असते पण घरातील माणसांशी अधिक असते म्हणूनच आमचे कुटुंब आजूबाजूला दिसत असताना आम्ही आमचे नवीन घर लगेच आपलेसे केले. आम्हाला हे घर खूप आवडले. कारण इथून जमीन दिसत होती आणि या घरात पकडपकडी खेळायला मज्जा येत होती.

लवकरच इकडच्या डॉक्टरकडे नेऊन प्रवासाचा काही त्रास झाला आहे का, याची तपासणीही केली. डॉक्टर अनुभवी होते. आम्हाला बघून त्यांनी सांगितले की, “काहीच प्रश्न नाहीये. ही भारतीय मांजरे आहेत ना? किती देखणी आहेत… कधी भटकी होती असे वाटत सुद्धा नाही.” आईने लगेच भारताचा झेंडा उंचावला… “हो, सगळ्याच भारतीय माऊ देखण्या आणि सुदृढ असतात!” त्यांनी हसून होकार दिला!

हेही वाचा – …अन् आम्हीही आमची जबाबदारी उचलली

आईने सांगितले की, ती आमची ऋणी आहे, तिच्यासाठी आम्ही आमचे भटके, मोकळे आयुष्य सोडून घर स्वीकारले… यासाठी मात्र डॉक्टरांनी जोरदार नकार दिला… “बाहेर फिरणे ही कुत्र्याची गरज असते, माऊसाठी मात्र ती गरज नसून चैन आहे! सुरक्षित वातावरणात बाहेर जात असेल तर ठीक, नाहीतर धोकेच जास्त! माऊचं ऑपरेशन करून घ्या, भरपूर लाड करा आणि आवडीचे खायला द्या.. एक मस्त सोफ्यावरचा आळशी बटाटा तयार होतो! माझ्या घरी पण एक तयार केलाय मी!” ते हसत हसत म्हणाले.

पण तरीही मागच्या अंगणात आम्हाला थोडे सोडावे, असे आई आणि दिदी यांना वाटत होते. मागच्या अनुभवावरून घाबरतच दिदीने मला पट्टा घालून उचलून घेतले आणि मागचा दरवाजा उघडला…


क्रमश:

(पिदू या मांजराची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

Loading spinner
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!