नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा आलेय तुमच्या भेटीला!
वांद्रे येथे संध्याकाळी एक इव्हेंट होता. छान तयार होऊन निघाले होते. म्हटलं, चला कॅब बुक करुयात. पण बुकच होईना! त्यात ‘गुगळीण मावशी’ प्रवासाचा वेळही खूप दाखवत होती. मग उत्तम आणि जलद पर्याय निवडला. रिक्षा केली आणि कांदिवली स्टेशन गाठलं. लोकल ट्रेनमध्ये बसून वांद्र्याला गेले. ट्रेनमध्ये नेहमीचे एंटरटेन्मेन्ट… ‘अय्या तुम्ही’, ‘अमुक एका सीरियलमधलं तुमचं काम’, ‘तुमचा तो शो’, ‘तुमचं दिसणं’ आणि मग सेल्फी… यात वांद्रे कधी आलं ते कळलंच नाही.
स्टेशनवरून रिक्षा केली आणि इव्हेंटचं ठिकाण गाठलं. दोन-तीन तास छान गेले. ओळखीची खूप माणसं भेटली. रीफ्रेश झाले आणि घरी यायला निघाले. रस्ता मार्गे जायचं म्हणजे दोन तास सहज लागले असते. तुडूंब ट्रॅफिक… मग तोच पर्याय निवडला. रिक्षा केली आणि तडक वांद्रे स्टेशनला गेले. रात्र खूप झाली होती. 10 वाजून गेले होते. त्यामुळे गर्दी कमी झाली होती. मी तिकीट काढण्यासाठी तिकीट ऑफिस शोधत होते. जुनं ऑफिस पाडलं होतं. त्यामुळे शोधाशोध सुरू होती. मी चालत निघाले. मागून मोठमोठ्याने आवाज येत होते. ‘ओ मॅडम, मॅडमजी, मॅम…’ रस्त्यावर बऱ्याच बायका-मुली होत्या. त्यामुळे मी कशाला लक्ष देऊ?
हेही वाचा – प्रेमाचा, मायेचा झरा… सायरा अम्मा
मी शांतपणे चालतच होते. आता जरा जोरातच आवाज आला, ‘‘क्राइम पेट्रोल’ मॅडम…’ आणि मी जागेवरच थबकले. ही हाक माझ्यासाठीच असावी. मागे वळून पाहिलं… एक माणूस आणि त्याचे दोन बॉडीगार्ड माझ्या मागे उभे होते. त्या लोकांना पाहून मी आश्चर्यचकितच झाले. घामाघुम वगैरे सगळं काही झाले… समोर साक्षात सलमान खान! काय बोलावं सुचेना… डोळे दगा देतात का? असेही वाटलं.
तेवढ्यात तो सलमान बोलला, ‘नमस्कार मॅडमजी, मी भाईजानचा म्हणजे सलमान खानचा ड्युप्लिकेट! साऊथ आफ्रिकामध्ये शोज् करतो. भाईजानचा बर्थडे आहे म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला मुंबईत आलोय.’
एकसारखी दिसणारी सात माणसे जगात असतात, हे ऐकून होते. पण एवढं साम्य? फक्त त्याच्या आवाजामुळे कळलं की तो ओरिजनल नाही, ड्युप्लिकेट आहे!
आणि तो माझा फॅन आहे!!
मग काय स्टेशनवरच आमचे फोटो शूट झालं. त्याने वाकून मला नमस्कार केला आणि तो त्याच्या रस्त्याला गेला आणि मी माझ्या… रस्त्यात जेवढे काही लोक होते, ते माझ्याकडे बघत होते… मी कोणीतरी मोठी सेलिब्रिटी असल्यासारखे… रस्त्यात काही लोकांनीही माझ्याबरोबर सेल्फी घेतल्या. नंतर मी ट्रेनमध्ये बसून कांदिवलीच्या दिशेने प्रस्थान केले.
अशा रीतीने सलमान खानचा तो वाढदिवस पार पडला!! त्या बिचाऱ्याला या सगळ्याची कल्पनाच नसेल!!
हेही वाचा – अम्माकडचा तृप्त करणारा प्रसाद…