जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना आयुष्यात आनंदाचे महत्त्व पटवून देणे, मानसिक आरोग्य सुधारणे आणि जगभरात सकारात्मकता पसरवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. भूतान देशाच्या पुढाकाराने, संयुक्त राष्ट्र महासभेने 12 जुलै 2012 रोजी ठराव मंजूर करून 20 मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ म्हणून घोषित केला. 2013पासून हा दिवस साजरा केला जात आहे.
दरवर्षी या दिनाकरिता वेगळी वेगळी थीम असते. यावर्षी थीम होती – ‘Caring and Sharing’. ही थीम आपण कशी आचरणात आणायची ते बघूया –
आपल्या आसपास असणाऱ्यांची आणि ज्यांना गरज आहे अशांची नेहमी काळजी करणे, काळजी घेणे आणि आनंद पसरविणे. नेहमी सोशल मीडियावर सकारात्मक संदेश पाठवणे. लोकांची काळजी घेणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यांना सहकार्य करणे आणि आनंद सगळीकडे पसरवणे… आता हे सगळे करण्याकरिता सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर, आपण स्वतः आनंदी असणे आणि ते पण 24 x 7… हे फार महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!
आनंदी राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे आपल्या सगळ्यांचंच ब्रीदवाक्य असायला पाहिजे. आनंदी राहायला आवडत नाही, अशी व्यक्ती शोधून पण सापडणार नाही; आणि कायम आनंदी आहे, अशी व्यक्तीही शोधून सापडणार नाही. म्हणूनच म्हणतात, “आनंदी माणसाचा सदरा कुणाकडेच मिळू शकत नाही.” जेव्हा हा वाक्-प्रचार अस्तित्वात आला, त्यावेळी सगळ्याच स्त्रिया कायम आनंदी असाव्यात; आणि म्हणूनच हा वाक्-प्रचार फक्त ‘माणसाचा सदरा’, या शब्दांनी प्रचलित झाला असावा! जमाना बदलला, स्त्रियांनी शर्ट म्हणजे सदरा आणि पॅन्ट घालायला सुरुवात केली, आणि आता सरसकट सगळेच सदरा घालणारे, म्हणून हा वाक्-प्रचार आता सगळ्यांनाच लागू होतो आहे…
मन आनंदी ठेवण्याकरिता आनंद कुठून पकडून आणावा लागत नाही, आणि तो पकडून आणता पण येत नाही. आनंद हा सगळीकडे असतोच. आपण आपले ताणतणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा, प्रत्येक गोष्टीत “मी आणि माझे”, हे जर आपण दूर ठेऊ शकलो, तर आनंद आपोआपच प्रकट होतो. अंधार आणि उजेड यांच्या सारखेच हे नाते आहे. अंधार कुठून पकडून आणता येत नाही. उजेडाचा अभाव झाला, तर आपोआपच अंधार होतो.
कसे जगावे, कसे आनंदी राहावे, हे शिकण्याकरिता निसर्ग हा उत्तम गुरू आहे, असे म्हणतात. मोठे वृक्ष आनंदाने डोलत असतात आणि छोटे गवत पण तेवढ्याच आनंदाने डोलत असते. काही झाडांची फुले देवाला आवडतात, म्हणून ती तोडून देवाला वाहतात, म्हणून ही झाडे आनंदी असतात. काही झाडांची फुले देवाला वाहात नाहीत. आपली फुले कुणी तोडत नाहीत, म्हणून ही झाडे पण खूश असतात. काही झाडांना लाल फुले लागतात म्हणून ती खूश असतात, तर कुणाला पिवळी फुले लागतात, म्हणून ती खुश! एकमेकांशी तुलना नाही, एकमेकांविषयी मत्सर नाही, एकमेकांचे पाय ओढणे नाही. फक्त आनंद आणि आनंद…
नारळाचे झाड सरळ वर वर जाते. सूर्याची उन्हे अंगावर घेणे हाच त्याचा आनंद असतो. समजा बाजूला एखादा मोठा वृक्ष असेल आणि त्याच्या फांद्या नारळाच्या वर येत असतील तर झाड चक्क तिरपे होते आणि सूर्य प्रकाश घेण्याकरता जिथे वाट दिसेल तिकडे वळून पुन्हा सरळ वर जायला सुरुवात करते… आनंदी राहायचेच, असे जर आपण ठरवले, तर आसपासच्यांना न दुखावता, थोडे ॲडजेस्ट करत करत, आपण आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो, हेच नारळाकडून शिकायचे आहे. प्रत्येक झाडाकडून अशाच प्रॅक्टिकल टिप्स मिळू शकतात. म्हणूनच जाणकार सांगत असतात – निसर्गात रमा.
आपण बहुतेक जण आनंदी नसण्याचे आणखीन एक कारण म्हणजे, घरातल्यांनी किंवा इतर कुणी कसे रहावे, कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे बऱ्याच जणांना समजत नसते. आणि यामुळे घरामध्ये तसेच बाहेर, रोजच क्षुल्लक कारणांवरून अप्रिय परिस्थिती तयार होत असते. अप्रिय परिस्थिती आली, म्हणजे ताणतणाव सुरू होतात आणि आनंद गायब होतो. इतरांना बदलवण्यापेक्षा, स्वतःला थोडेसे बदलणे खूप सोपे असते. मी रस्त्याने चाललो आहे आणि डोळ्यांवर ऊन येते आहे. सूर्य लवकर हलणार नाही, हे आपल्याला माहीत असते, तरीपण आपण उन्हाला शिव्या मोजतो, ग्लोबल वॉर्मिंगच्या नावानी तणतण करतो आणि दुःखी होतो… त्यापेक्षा आपला मार्ग आपण थोडा बदलला किंवा डोळ्यांवर गॉगल घातला, तरी आपले रस्त्यावर चालणे सुकर होऊ शकते. माझा आनंद मीच शोधणार आहे… महत्त्वाचे म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत, हे समजणे आवश्यक आहे.
हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…
कायम आनंदी राहण्याकरिता आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे उत्तम तब्येत. अगदी साध्या साध्या गोष्टी, म्हणजे रोज न विसरता व्यायाम, थोडा प्राणायाम, घरचे जेवण (साधे असले तरी), छान जनसंपर्क आणि आपल्या हॉबिजबरोबर मैत्री… एवढंच सांभाळायचं!
“आनंदी राहणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!” असे जर आपण ठरवले आणि योग्य विचारसरणीने वाटचाल सुरू केली, तर आनंदी माणसाचा सदरा माझ्याकडे आहे, असे आपण खात्रीशीररीत्या म्हणू शकू… आणि आनंदी माणूस जिथे जिथे जातो तिथे तिथे आनंदी वातावरण निर्माण होते, हे आपण जाणतोच.
चला तर मंडळी, आपण सगळेच मस्त राहूया आणि मजेत राहूया आणि आनंदी राहूया.


