Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
    ललित

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करMarch 19, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लघुकथा, टिनएज लव्ह, पहिलं प्रेम, पहिले प्रेम, लहान वयातील प्रेम, एकतर्फी प्रेम, अजाण वयातील प्रेम, आईचं पहिलं प्रेम, आईचं आणि दिनूचं प्रेम, प्रेमातील लिंगभेद, मुलाचं पहिलं प्रेम, आईचे मुलाला समजावणे, मुलाचे आईवर चिडणे, काय चुकलं,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मी नंदा… माझ्या मुलाने मला दिलेला धक्का तुम्हाला सांगणार आहे… याला धक्का म्हणू की, चटका कोण जाणे?

    मला दोन मुलगे… नवरा बँकेत नोकरीला. आम्ही दोघे एका तालुक्याच्या गावी राहतो. तसं आमचं घर सांगलीला, पण नोकरीनिमित्त या गावात आहोत. माझ्या मोठ्या मुलाचे, सचिनचे गेल्या वर्षी लग्न झाले. सचिन आणि त्याची बायको दोघेही बँकेत. नोकरीनिमित्त नगरला रहातात. धाकटा मुलगा राहुल इथेच बारावी झाला आणि इंजिनीरिगसाठी पुण्याला गेला. पुण्यात माझ्या नवऱ्याचा मित्र उमेश रहातो. माझा नवरा सुरेश आणि उमेश लहानपणापासूनचे मित्र. उमेश आणि त्याची पत्नी अनिता दोघेही बजाजमध्ये नोकरीला. त्यांना दोन मुली… अनघा आणि अर्चना. आमच्या मुलापेक्षा त्या थोडया लहान.

    राहुल पुण्यात गेला, तेव्हापासून तो उमेशकाकाकडे जाऊ लागला. अर्चना त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवायची. सुट्टीच्या दिवशी तो बऱ्याचवेळा अर्चनाकडे असायचा. राहुल आला की, उमेश त्याला आणि सर्वांनाच नाटक, सिनेमाला न्यायचा… हॉटेलमध्ये जेवायला न्यायचा.

    राहुल हा मातृभक्त. लहानपणापासून माझ्या मागेमागे असायचा. मी जाईन तेथे यायचा. मला सर्व मनातले सांगायचा. तो मला सोडून पुण्याला कसा राहील, याची मला काळजी वाटत होती. पण उमेश, अर्चना आणि त्यांच्या मुलींमुळे तो पुण्यात रमला. रोज रात्री तो मला फोन करतो. परीक्षेच्या काळात जास्त वेळा! कारण, मी पण त्याच्या काळजीत असते. गेली तीन वर्षे तो व्यवस्थित पास होत गेला… आणि हे शेवटचं वर्ष. या वर्षी तो इंजिनीअर होईल आणि पुढील शिक्षणास परदेशीं जाईल, असा माझा अंदाज होता.

    पण कॉलेजच्या शेवटच्या वर्षी राहुल फोनवर मनमोकळे बोलेना! खरंतर आईशी तासानतास बोलणारा राहुल एक-दोन मिनिटात बोलणं आटपू लागला. त्याच्या पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट आला, तेव्हा माझ्या लक्षात आलं,  काही तरी बिघडलंय. मी उमेशची बायको अर्चना हिला फोन लावला…

    “हॅल्लो अर्चना, अगं राहुल आलेला का रविवारी?”

    “नाही ग.. तो गेल्या महिन्यात आलाच नाही. मी तुला फोन लावणारच होते..काय झालंय कोण जाणे?मी त्याला फोन केलेला.. अनघाचे लग्न ठरतंय.. मुलगा पहायला यायचा होता.. तेंव्हा मी म्हंटल तू पण ये.. पण तो आला नाही आणि त्या दिवसापासून फोनही नाही.”

    “काय? अनघाचे लग्न ठरले? अग केंव्हा सांगणार आहेस मला?”

    “अगं, तुला सांगणारच होते… खूप गडबड होती… उमेशची बहीण आहे ना मुंबईची, तिचा पुतण्या, श्रीराम दुबईला असतो. मोठा बिझिनेस आहे त्याच्या वडिलांचा तिथे, हा पण तिकडेच असतो. त्यांनी मागणी घातली अनघासाठी. खरंतर अनघा अजून शिकते आहे, पण चांगलं स्थळ आलं म्हणून उमेश तयार झाला आणि अनघाला पण श्रीराम आवडला.”

    “बरं झाल बाई… आता लग्न केव्हा?”

    “लग्न डिसेंबरमध्ये… पण साखरपुडा पुढील आठवड्यात आहे. उमेश फोन करणार सुरेशला… पण तू दोन दिवस आधी ये माझ्या मदतीला.”

    “हो येते. मला पण राहुलला भेटायचंय.”

    दुसऱ्या दिवशी उमेशने सुरेशला फोन केला आणि मला लवकर पाठवायला सांगितले. मी जायची तयारी केली आणि राहुलला मी पुण्याला येत असल्याचे कळविले आणि साखरपुडयासाठी तू पण आधी दोन दिवस अर्चनाच्या घरी ये, असे त्याला सांगितलं.

    हेही वाचा – प्रिय आज्जो… वडीलधाऱ्यांच्या प्रेमाला भुकेल्या रत्ना अन् विभा!

    “नाही गं आई… मी साखरपुड्यला पुण्यात नसणार. आम्ही मित्र आसामला चाललोय. मी तुला यावेळी भेटणार नाही.”

    माझ्या लक्षात आले, आईसाठी वेडा असलेला माझा मुलगा, ‘मी तुला भेटू शकणार नाही,’ असं म्हणतो?

    मी ठरवलं… त्याला न कळवता, एक दिवस आधीच जायचं आणि त्याच्या हॉस्टेलवर त्याला गाठायचं. मग मी दुसऱ्या दिवशी राहुलचा हॉस्टेलमधील मित्र समीर याला फोन लावला…

    “समीर, मी राहुलची आई बोलतेय…”

    “बोला काकी…”

    “तुमच्या ग्रुपची ट्रिप आसामला जाणाराय?”

    “नाही काकी… ट्रिप तर जानेवारीत!”

    “मला राहुल म्हणाला, तो पुढील आठवड्यात आसामला जातोय म्हणून?”

    “नाही नाही… त्याने गम्मत केली असेल? पण हल्ली तो गप्पगप्प असतो हे खरे.”

    “काय रे, काय झालंय? या सेमिस्टरमध्ये त्याला मार्क्स पण कमी मिळालेत…”

    “काकू, त्याला सांगू नका… पण मला वाटतं, तो इथे कुणाकडे तरी जायचा ना पुण्यात अधूनमधून, त्यांच्या मुलीचं लग्न ठरल्यापासून तो डिस्टर्ब झालाय…”

    “काय? म्हणजे अनघा? अनघाचं लग्न ठरल्याने तो विचलित झालाय!”

    “असं मला वाटतं…”

    “बरं… पण मी फोन केल्याचे त्याला सांगू नकोस.”

    “हो काकी. मी पण तुम्हाला हे सांगितल्याचे त्याला सांगू नका.”

    मी फोन ठेवला.. ओके… म्हणजे अनघा याला आवडत होती? अनघाचे लग्न ठरताच माझा राहुल विचलित झाला? म्हणजे, हे टिनएज प्रेम आहे तर? यातून याला बाहेर काढायला हवे… पण कसे? पुढील आठवड्यात मी पुण्यास जात आहे… त्यावेळी त्याच्याशी बोलायला हवे…

    मी पुण्यास आले अन् उमेश अर्चनाच्या घरी न जाता सरळ राहुलचे हॉस्टेल गाठलं. बाहेर रेक्टरला भेटले आणि राहुलला बाहेर बोलावले. राहुल बाहेर आला आणि मला पाहून आश्चर्यचकित झाला!

    “अगं तू अचानक! दोन दिवसांनी येणार होतीस ना?”

    “हो रे बाबा… पण म्हटलं, दोन दिवसांनी तू आसामला जातोयस, म्हणून तुला पाहावंसं वाटलं… त्यामुळे दोन दिवस लवकर आले. चल, कपडे करून ये… आपण बाहेर जेवायला जाऊ.”

    “नको गं आई… मला कंटाळा आलाय…”

    “अरे चल, मला भूक लागलीय ना! चल… चल…”

    नाईलाजाने तो रूममध्ये गेला आणि कपडे करून आला.

    मी रिक्षा ठरवली आणि युनिव्हर्सिटीच्या पुढे एक गार्डन रेस्टॉरंटकडे रिक्षा नेण्यास सांगितली. आम्ही दोघे त्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये एका बाजूला बसलो. मी दोन लेमनची ऑर्डर दिली. मग त्याला जवळ घेतले आणि विचारले, “बाळा, गप्पगप्प का आहेस? आईला सांगणार नाहीस?”

    “काही नाही गं… तुला उगीच वाटतंय…”

    “आईपासून लपवतोस? अनघा आवडत होती काय?”

    राहुल दचकला… मग रडवेल्या सुरात बोलू लागला…

    “तुला कुणी सांगितलं? तसंच काही नाही…”

    “मग अर्चनाकाकूने अनघाच्या साखरपुड्यला बोलावलं, त्याला नाही का म्हणालास?”

    राहुल रडू लागला. मी त्याला जवळ घेऊन म्हणाले, “अनघाला प्रेमाचे बोललेलास काय?”

    “नाही.”

    “अरे वेड्या, मग तिला कसे समजणार तुझ्या मनातलं? हे एकतर्फी प्रेम झालं. असं एकतर्फी प्रेम असतं या वयात… किंवा याला टिनएज लव्ह म्हणतात… म्हणजे पुरेशी समज येण्याआधीच प्रेम! काहीवेळा ते योग्य ठरतं, पण मग काही वर्षांनी आपण असं प्रेम केल होतं, याचं आश्यर्य वाटतं किंवा हसू पण येत… आता तुझा दादा… सचिनने पण प्रेम केलेलं…”

    “काय सांगतेस? मला कसं माहीत नाही?”

    “तू शाळेत जात होतास त्या वेळी. म्हणून तुझ्या कानावर घातलं नाही. पण तो होता कॉलेजात आणि प्रेम करू लागला होता… पण ती होती परधर्मीय. तुझे आजोबां, मामा चिडले सचिनवर… मग त्याने तिचा नाद सोडला आणि अभ्यासावर लक्ष देऊ लागला. मग नोकरीं लागली आणि शर्मिलासारखी चांगली बायको मिळाली की नाही? असं असतं हे वय! आता तुझी आजी सांगायची तुझ्या बाबांची गंम्मत…”

    “बाबांची? बाबा पण या वयात प्रेमात पडले?” राहुलला हसू आवरेना.

    “तुझी आजी सांगायची…. तुझे बाबा ज्या चाळीत रहायचे, त्या चाळीतील एका मुलीवर यांचे प्रेम जमले…”

    “काय म्हणतेस?” राहुल खदखदून हसू लागला.

    “हो ना! पण त्या मुलीच्या बाबांनी तुझ्या आजी-आजोबांना बाबांनी त्या मुलीला लिहिलेली पत्रे दाखवली. तसे तुझ्या आजोबानी बाबांची व्यवस्थित चंपी केली. त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलीला गावी पाठवले… मग तुझे बाबा नोकरीला लागले आणि माझ्याबरोबर लग्न झालं, दोन मुलगे झाले… कळलं.. हे वयच असं असतं राहुल!”

    राहुल हळूहळू मूडमध्ये आला. बहुतेक तो अनघाला विसरण्याच्या मन:स्थितीत आला असावा. मी त्याला त्याच्या दादाचे, बाबांचे उदाहरण देऊन या परिस्थितून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. अचानक तो माझी चेष्टा करावी म्हणून मला म्हणाला…

    “आई, या वयात तू नाही प्रेमात पडलीस?”

    मी चपापले. चटकन मी सोळा-सतरा वर्षांची झाले… कोल्हापूरमधील वांगीबोळ आठवला! बोळाच्या कोपऱ्यावर राहणारा दिनू आठवला… मस्त बासरी वाजवणारा दिनू… मला तो आवडायचा. त्यालाही मी आवडायचे… तो मला चिठ्या पाठवायचा…

    हेही वाचा – रत्नाच्या प्रिय आज्जोंनी घेतला महत्त्वाचा निर्णय…

    “मी पण अशीच होते रे सोळा वर्षांची… ते वयच वेडं असतं… आमच्या बोळात रहाणारा दिनू आवडायला लागला होता… बासरी वाजवायचा, चिठ्या पाठवायचा मला. एकदा त्याने मला कामत हॉटेलात कॉफी प्यायला बोलावलं…” मी माझ्या तंद्रीत बोलत होते…

    “बंद कर… बंद कर… बंद कर, तुझे तोंड..”

    राहुल किंचाळत होता… मी चटकन त्याच्याकडे पाहिलं. तो रागाने थरथरत होता…

    “अरे काय झाल बाळा?” मी आजूबाजूला पाहात म्हणाले.

    “आई तू… तू… प्रेम करतेस दुसऱ्या पुरुषावर?”

    “अरे ते त्या वयात… टिनएज… मग तुझ्या बाबांबरोबर लग्न…”

    राहुल होता कुठे? काही न बोलताच रागारागाने बाहेर पडला देखील!

    मीही उभी राहिले, काऊंटरवर बिल दिले आणि धावत बाहेर आले… मी आजूबाजूला, रस्त्यावर पाहिले… राहुल कुठेच नव्हता… मी मोबाईल लावला… रिंग होत होती, पण तो उचलत नव्हता!

    रस्त्याच्या बाजूला एक बेंच होता… मी त्यावर मटकन बसले आणि विचार करू लागले, काय झाले राहुलचे? मी त्याला त्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी या हॉटेलात घेऊन आले… या वयात असं प्रेम होतं… पण त्यातून बाहेर पडायचे असते… म्हणून त्याच्या मोठ्या भावाचे आणि त्याच्या वडिलांचे उदाहरण दिले… त्यावेळी तो एन्जॉय करत होता… हसत होता… मला वाटतं होते, तो या फेजमधून बाहेर पडतोय. मी त्याला माझं पण उदाहरण देत होते आणि… ओहो… म्हणजे त्याला आईने त्या काळात केलेले प्रेम आवडले नाही?!”

    ते त्या वेड्या वयातील प्रेम… त्या वेड्या वयासारखे वेडे… भावाने आणि वडिलांनी केलेले, त्या वयातील प्रेम त्याला चालते… पण आईने करायचे नाही! का बुवा? दादा, बाबा हे पुरुष म्हणून त्यानी काही केले चालते.. पण स्त्रीने नाही करायचं! स्त्री काही माणूस नाही? पुरुषाच्या हातून जशा चुका होतात तशा स्त्रीच्या हातून पण होणारच!

    माझा मुलगा येईल परत… तो कुठे जाईल? पण मी स्त्री म्हणून त्याने केलेली कृती मला विचार करायला लावते आहे. विचार करता करता मी वरील कथा लिहितेय…

    वाचकहो, माझं काय चुकलं? मी माझ्या मुलाला ओळखायला चुकले की संपूर्ण पुरुषजात एका आईने कधीकाळी केलेल्या अजाण वयातील प्रेमाला धिक्कारते? जी सवलत पुरुषाला आहे ती स्त्रीला का नाही?

    वाचक हो.. तुमची मते या कथेच्या लेखकाला खाली असलेल्या कमेंटमध्ये जरूर कळवा!


    मोबाइल – 9307521152 / 9422381299


     

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत.

    Related Posts

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026 ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    By स्नेहा सुतारMarch 19, 2026

    भाग – 6 अगरबत्तीचा मंद सुवास आणि सोबतच आईच्या पावलांचा आवाज… एकदम तिला प्रसन्न वाटलं.…

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?

    March 19, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 501
    • वास्तू आणि वेध 354
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn