Sunday, February 22, 2026

banner 468x60

Homeललितस्वभाव बदल… वयानुसार की, परिस्थितीनुसार?

स्वभाव बदल… वयानुसार की, परिस्थितीनुसार?

डॉ. विवेक वैद्य

ये हुकुमत, ये दौलत, ये शोहरत, हमेशा नहीं रहते… ये घर बदलते रहते हैं… आणि हे सर्व गमावल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्वभावात नक्कीच फरक पडतो. पण हे कायम असूनही काही व्यक्ती बदलतात, त्याचे कारण वय असावे का? की आणखी काही?  कारण अलीकडेच घडलेले दोन प्रसंग…


मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो, तेव्हा आम्हाला एक प्राध्यापक होते. खूप रागीट. वर्गात त्यांना थोडीही कुजबूज सहन व्हायची नाही. विद्यार्थ्यांना वाटेल ते बोलायचे. अगदी गाढव पण म्हणायचे. त्यामुळे साहजिकच ते विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय होते. पण तो काळ शिक्षकांना उलटून बोलण्याचा नव्हता. मुले पाठीमागून तक्रारी करायचे, पण सरांसमोर निमूट बसायचे.

शिक्षण संपल. गावी परत आलो. सर विस्मृतित गेले. बऱ्याच वर्षांनी परत त्याच गावाला नातेवाईकांच्या लग्नाला जाण्याचा योग आला. सरांचा तपास करण्याचा प्रश्नच नव्हता. मी वरातीत जात असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले सर दिसले. काळाने बरेच बदल केले तरी, मला लगेच ओळखायला आले. का कोण जाणे मी वरात सोडून त्यांच्यासमोर जाऊन उभा राहीलो. “सर ओळखले?”

मला नीट न्याहाळत सर म्हणाले, “कोण वैद्य का तू?”

“हो सर.” मी नमस्कार करण्यासाठी वाकणार तेवढ्यात मला थांबवत सर म्हणाले, “तुला वेळ आहे का थोडा? मी इथे जवळच राहतो. घरीच चल.”

हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

मी सरांच्या फ्लॅटवर गेलो. सर मनमोकळेपणाने बोलले. मुलीचे लग्न कधीच झाले… मुलगा परदेशी स्थायिक… इथे सर आणि त्यांच्या पत्नी. अधूनमधून सरांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध होत होते… चहा झाला. सरांनी माझ्या कुटुंबीयांची चौकशी केली. मीही मोकळा झालो. सरांना म्हणालो, “सर, तुम्ही खूप स्ट्रिक्ट होते कॉलेजात.”

सर यावर फारसे बोलले नाहीत, “ते तुमच्या भल्यासाठी.” एवढे बोलून त्यांनी विषय बदलला. लग्नाला वेळ होत असल्याने मी सरांचा निरोप घेत होतो. तेवढ्यात सरांनी एक सुंदर फॉरेनचं पेन माझ्या हातात दिले. म्हणाले, “तू लिहितो हे माहीत आहे. कामास येईल.” निघताना माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले, “आला की येत जा भेटायला…”

येताना माझ्या मनात सतत एकच विचार, सर एवढे बदलले कसे? वयाचा परिणाम? पैलतीर जवळ येऊ लागला म्हणून?  काही वेगळे अनुभव? का शेवटी कडवट वागण्याने माणसं तुटत जातात आणि प्रेमाने जवळ येतात, हे वैश्विक सत्य त्यांना पटलं होते? नेमके कारण काय होते देव जाणे!


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या चुलत आजोबांना हार्ट अटॅक आला. गावातल्या डॉक्टरांनी ताबडतोब शहरात हलवायचा सल्ला दिला. त्यावेळेस गावात एकमेव असलेल्या चारचाकीने शहरातील त्या प्रसिद्ध दवाखान्यात आलो. प्रशस्त बिल्डिंग, भक्कम सागाचे फर्निचर, स्वच्छता. असा दवाखाना आम्ही प्रथमच पाहात होतो. आजोबांवर ताबडतोब उपचार सुरू झाले. तेवढ्यात डॉक्टर आले. महागडा सफारी, दोन्ही हातात हिऱ्यांच्या अंगठ्या, हातात किमती रिस्टवॉच, पायात चकाकणारे चामडी बूट… आल्या आल्या त्यांनी पेशंटचा ताबा घेतला. भराभर सूचना दिल्या तब्बल एक तासाने त्यांनी आम्हाला केबिनमध्ये बोलावले. थोडक्यात आजार आणि त्याच्या complications ची कल्पना दिली. आमचा एक काका वारंवार प्रश्न विचारू लागला, तेव्हा भेदक नजरेने पाहात त्याला म्हणाले, “तुम्ही डॉक्टर आहात की मी?”

 आठवडाभरात आजोबा ठणठणीत होऊन घरी परतले. नंतरही बरेच दिवस चेकअपला जात राहिले. त्यानंतर आजोबा मोठ्या काकांकडे मुंबईला राहायला गेले. खूप वर्षे राहिले. वयाची पंच्याऐंशी पार झाल्यावर तब्येत साथ देईना. तिकडे अनेक मोठे डॉक्टर झाले. आराम पडेना. तेव्हा माझे हार्ट अटॅकमधून प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरला दाखवायचा धोशा त्यांनी लावला.गावी मी आणि बाबा.काकाने शेवटी गावी आणून सोडले.त्या डॉक्टरांकडे न्यायची जबाबदारी माझ्यावर आली. त्यांचा तपास केला. त्यांचा मुलगा आता तेच, पण अधिक सुसज्ज झालेले हॉस्पिटल सांभाळतो हे कळले. मात्र जुने डॉक्टर मागच्या बाजूला फक्त तपासणी करतात, हे समजले… तेही दिवसाला फक्त वीस पेशंट (सकाळी दहा अन् संध्याकाळी दहा)… सुदैवाने दहा दिवसांनंतरची म्हणजे अपेक्षेपेक्षा लवकरचीच appointment मिळाली.

हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

ठरलेल्या दिवशी आजोबांना घेऊन हॉस्पिटलला गेलो. मागच्या बाजूला एका बऱ्यापैकी जागेत डॉक्टरांची ओपीडी होती. मर्यादित पेशंट असल्याने अजिबात गर्दी नव्हती. थोड्याच वेळात नंबर लागला. मी आणि बाबा आजोबांना हाताला धरून आत घेऊन गेलो. डॉक्टरांचे किंचित पांढरे विरळ केस आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वगळता फारसा फरक पडला नव्हता. फरक पडला होता, तो पेहेरावात. साधा इन न केलेला शर्ट आणि पँट. हातात एक साधेसे घड्याळ. एकाही बोटात अंगठी नाही. पायात चक्क कोल्हापुरी चप्पल…

डॉक्टरांनी व्यवस्थित तपासले. मुंबईचे रिपोर्ट बघितले. बहुतेक तक्रारी या वयोमानामुळे आहे, हे आजोबांना शांतपणे समजावून दिले. तेवढ्यात आजोबांनी पंचवीस वर्षांपूर्वीची हार्ट अटॅकच्या वेळेस केलेल्या उपचारांची फाइल त्यांच्यासमोर ठेवली. आपली इतकी जुनी फाईल बघून डॉक्टरांना आश्चर्य वाटले. आजोबांनी त्यावेळेस कामावर असणाऱ्या सिस्टर आणि वॉर्डबॉयचा विषय काढला. डॉक्टरांचीही कळी खुलली. 10-15 मिनिटे जुन्या गप्पा झाल्या. बाहेर पेशंट ताटकळत असतील म्हणून मी आजोबांना म्हणालो “चला आजोबा, अजून पेशंट आहेत बाहेर!”

तेवढ्यात डॉक्टरच म्हणाले “असू द्या. खूप दिवसांनी जुन्या आठवणी निघाल्या. त्यांनी बेल वाजवली. मुलाला चहा आणायला पाठवाले. चहा घेता घेता पुन्हा आजोबांशी गप्पा मारल्या. निघताना आजोबांना म्हणाले… “काका, कधीही काही त्रास झाला तर विनासंकोच या. फक्त दहा पेशंटची अट तुमच्यासाठी नाही!” येताना माझ्या मनात एकच विचार… पंचवीस वर्षांपूर्वी आपण पाहिलेले डॉक्टर हेच होते का? स्वभावातील बदलाचे कारण फक्त वाढलेले वयचं आहे का की आणखी काही?


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!