संगीता भिडे
पाणी म्हणजे जीवन, केवढा सार्थ आहे ना हा शब्द! पाण्याविना जीवन जगणे व्यर्थ आहे.
‘पाणी’ हा शब्द वाचताच डोळ्यासमोर उभं राहिलं ते माझं माहेरचं गाव – भुसावळ. अत्यंत कडक उन्हाळा आणि पाण्याचं दुर्भिक्ष. पोटापाण्याच्या व्यवसायामुळे वडिलांना भुसावळशिवाय पर्याय नव्हता. त्यात आम्ही पाठोपाठची तीन भावंडं. वास्तव्य आमचं एका चाळीत. चाळीच्या मागच्या भागात विहिरीत उन्हाळ्याखेरीज उदंड पाणी असायचं. पण ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी अवस्था त्या विहिरीच्या पाण्याची. सबब पिण्याच्या पाण्याचा शोध सुरू झाला. फर्लांग- दीड फर्लांग अंतरावर एक गोड्या पाण्याची विहीर आढळली. मग ‘घट डोईवर, घट कमरेवर’ अशा आईच्या पाण्याच्या खेपा दररोज सुरू झाल्या. आम्ही अजाण वयाची भावंड, आमची काहीच मदत नाही. पाण्याची साठवण अगदी छोट्या भांड्यांपासून मोठ्या कळशांपर्यंत केलेली असायची. पैशाची नाही एवढ्या काटकसरीने हे पाणी वापरायचो आम्ही. ‘काटकसर’ हा शब्द तेव्हापासूनच ज्ञात झाला आणि तो आजतागायत अंमलात आणला जातोय. आईने मात्र अपार कष्ट सोसले. साधारण 12-13 वर्षांनी घरात नळ आले. अहाहा! काय तो आनंद! मनमुराद आंघोळीचा आनंद काय वर्णावा!!
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
असं हे बहुगुणी, बहुपयोगी पाणी पंचमहाभूतांपैकी एक आहे, याचाही अनुभव साधारण 8-10 वर्षांनी अनुभवला. आमच्या घराजवळच ‘बलबलकाशी’ नावाचा एक ओढा होता, तेथे बरेचदा चाळकरी बायका बादल्या भरून कपडे धुवायला जात असत. तेवढाच भरपूर पाण्यात कपडे धुतल्याचा आनंद! या ओढ्याला कधीही पूर आल्याचं ऐकलं नव्हतं. एक पावसाळा असा उगवला की, पाण्यानं रौद्ररूप धारण केले. आम्ही सर्व नेमके गावाला गेलो होतो. घराला कुलूप! ओढ्याला आलेला पूर घराघरांत शिरला. जाण्यायेण्याची वाट बंद झाली. गावातच आत्या राहत असून त्यांना घरापर्यंत येता येणं केवळ अशक्य. पूर ओसरल्यावरही घराला कुलूप असल्यामुळे काहीच करता येईना. तातडीचा फोन आल्यामुळे आम्ही लगेचच परत आलो. सामानाची अपरिमित हानी झाली होती. अल्पकाळ हतबुद्ध होऊन बसलो. ‘पाण्यासाठी दशदिशा, का फिरविसी आम्हां दशदिशा’ असे म्हणणारे आम्ही, ‘का रे केलीस ऐसी दशा? घरात नाही पाणी दाणा’ असं म्हणायची आमच्यावर वेळ आली. पुन्हा एकदा घर आवरलं – सावरलं – अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करून. पण घराशी जुळलेलं नातं तोडून अन्यत्र नाही जावंसं वाटलं.
हेही वाचा – पुतळे असावेत की नसावेत?
असं हे पाणी ‘जमलं तर सूत, नाहीतर भूत’! सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे, हे विसरून कसं चालेल? प्रत्येकाशी मिळता स्वभाव म्हणजे ‘ पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाये वैसा…’ असं हे ‘पाण्यात पाहायला का शिकवतं कळत नाही. मग उगाचच परस्परात वितुष्ट! आणि मग परस्परांना ‘पाणी पाजण्याची’ (अद्दल घङविण्याची) भाषा सुरू होते. ‘पाणी जोखल्याखेरीज’ – पारखल्याखेरीज कोणाशीही मैत्र करू नये, हेही ऐकावं लागतंच. असे हे नानाविध पाण्याचेही स्वभावधर्म!
आतां ‘पाणी’ तला ‘णि’ ऱ्हस्व केला की, लगेच अर्थ बदल. पाणि = हात / हस्त. म्हणूनच ज्याच्या हातात चक्र तो ‘चक्रपाणि’ तर, शूलधारी तो शूलपाणि इत्यादी इत्यादी.
जन्म होतो तो ही गर्भजलातून बाहेर येऊन आणि मृत्यू होतो, तोही अखेरचे दोन थेंब गंगाजल पिऊन. थोडक्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत या ‘पाण्या’शी आपले अतूट नाते आहे. म्हणून म्हणते,
‘जलाय नमः नमः नमः’


