दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 30 जानेवारी 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 10 माघ शके 1947; तिथि : द्वादशी 11:09; नक्षत्र : आर्द्रा 27:27
- योग : वैधृति 16:58; करण : कौलव 21:47
- सूर्य : मकर; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:29
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – नवीन सकारात्मक बदलांसाठी तयार रहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील. रागावर नियंत्रण ठेवा, वादविवाद टाळा. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज परिवारातील सदस्यांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल.
वृषभ – कौटुंबिक जीवनात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. कलात्मक क्षमतेमुळे अनेकांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. कामाचा जास्त ताण घेणे टाळा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. सर्वाधिक गरज असेल तेव्हा मित्र मदतीला धावून येणार नाहीत.
मिथुन – सामाजिक कार्यातील तुमची आवड वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत आनंददायी क्षणांचा आनंद घेता येईल. यामुळे तुमच्यातील नाते मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल.
कर्क – व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या नवीन संधी येतील. जीवनातील आव्हानांवरही मात करू शकाल. कारकिर्दीत तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरी एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. एकूण दिवस आनंददायी जाणार आहे.
सिंह – मित्रासोबत किंवा भावंडांसोबत सुरू असलेले आर्थिक वाद आज सोडवू शकाल. त्याचवेळी जवळच्या एखाद्या मित्राला आर्थिक मदत करावी लागेल. करिअरशी स़बंधित निर्णय सुज्ञपणे घ्या. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधा. राग नियंत्रित करणे आवश्यक ठरेल. जोडीदाराच्या भावना दुखवू नका, त्यांच्या आनंदाची काळजी घ्या.
कन्या – नातेसंबंधांमधील प्रेम आणि आपुलकी वाढेल. संवादातून नातेसंबंधांमधील समस्या सोडवा. प्रेमात असलेल्या जातकांच्या जीवनात नवीन रोमांचक वळणे येतील. तुमच्या भावना जोडीदारासमोर मोकळेपणाने व्यक्त करा. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. आज बचतीवर भर द्याल.
तुळ – नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. कारकिर्दीत तुम्हाला मोठे यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार रहा. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. तथापि, शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच, कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील.
हेही वाचा – जीव लावणारा संभाजी अन् नवसाची कंदुरी…
वृश्चिक – व्यवसायातून नफा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील. नोकरदार जातकांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करता येईल. निकटच्या सहकाऱ्यांशी मतभेद झाल्याने दिवस तणावपूर्ण जाईल. भौतिक सुखसोयींनी भरलेले जीवन जगण्याची संधी मिळेल.
धनु – ऑफिसचे वेळापत्रक खूप बिझी असेल. तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या येतील. क्लायंटच्या असंतोषामुळे तुम्हाला काही कामे पुन्हा करावी लागू शकतील. ताणतणाव टाळा. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवा, यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कुटुंब किंवा मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
मकर – कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुमची ज्ञानलालसा पाहून नवीन मित्र जोडले जातील. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे, अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. नवीन बदलांसाठी तयार रहा. आव्हानांमुळे मानसिक ताण घेण्यापेक्षा उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या.
कुंभ – आज कामावर लक्ष केंद्रित करा. ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा. नवीन कामे स्वीकारण्यास तयार रहा, यामुळे करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद नांदेल. आज आनंदी क्षण अनुभवायला मिळतील.
मीन – मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. अज्ञात भीती तुम्हाला त्रास देईल. अशावेळी दैनंदिन दिनचर्येतून थोडीशी विश्रांती घ्या. ज्यावर आपले नियंत्रण नाही अशा गोष्टींबद्दल जास्त विचार करू नका. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. आज खर्च जास्त होईल.
दिनविशेष
नाटककार पद्मश्री सतीश आळेकर
टीम अवांतर
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सतीश आळेकर यांचा जन्म नवी दिल्ली येथे 30 जानेवारी 1949 रोजी झाला. मात्र, त्यांचे बालपण आणि नंतर शिक्षण पुणे येथे झाले. शालेय जीवनात “शांतता! कोर्ट चालू आहे’चा एक प्रयोग त्यांनी पाहिला आणि ते भारावून गेले. 1972 साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्सी झाले. त्याआधी फर्ग्युसनमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात बबन प्रभू यांच्या “दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या विनोदी नाटकात त्यांनी दिनू ही भूमिका साकारून रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. मात्र, त्यांची दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून खरी कारकीर्द सुरू झाली ती विजय तेंडुलकर यांच्या “ओळख’, “काळोख’ या नाटकांपासून.
हेही वाचा – तेरे बिना जिया जाए ना…!
पुढे भालबा केळकर यांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये आळेकरांचा प्रवेश झाला आणि डॉ. जब्बार पटेल यांच्या “घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. “मेमरी’ ही त्यांची पहिली एकांकिका. थिएटर ॲकॅडमी या संस्थेच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. “मिकी आणि मेमसाब’, “महापूर’, “महानिर्वाण’, “बेगम बर्वे’, शनिवार-रविवार’, ‘दुसरा सामना’ आणि ‘एक दिवस मठाकडे’ ही त्यांनी लिहिलेली नाटके थिएटर ॲकॅडमीतर्फे रंगमंचावर सादर झाली. वास्तववादाच्या चौकटीतून बाहेर पडून ‘ब्लॅक ह्यूमर’ आणि ‘अॅबसर्डिटी’ने रंगलेल्या त्यांच्या नाटकांनी मध्यमवर्गीयांचे जगणे रंगमंचावर उभे केले. आळेकरांच्या या नाटकांचे इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यांचे ‘महानिर्वाण’ हे नाटक भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील एक मानदंड मानले जाते. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथही लिहिले गेले.
अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी यासारख्या अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते. नाटकांप्रमाणेच ‘जैत रे जैत’, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. याशिवाय आळेकर यांनी चिंटू, चिंटू-2, व्हेंटिलेटर, भाई, भाई-2, मी शिवाजी पार्क, अय्या, चि. व चि. सौ. कां., राजवाडे अँड सन्स, स्माइल प्लिज, हाय वे, देऊळ बंद, जाऊद्या ना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
1975 साली महापूर नाटकासाठी उत्कृष्ट नाट्य संहितेसाठीचा राज्य नाट्य पुरस्कार, 1974 साली महानिर्वाण नाटकासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे राम गणेश गडकरी पुरस्कार, 1994 मध्ये राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाट्य अकादमीने नाट्यलेखनासाठी (मराठी) त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले. 1999 साली नाट्यदर्पण जीवन गौरव पुरस्कार, जानेवारी 2012 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


