Monday, February 23, 2026

banner 468x60

Homeललितकानाला खडा… माझा व्हॅलेंटाइन डे!

कानाला खडा… माझा व्हॅलेंटाइन डे!

सुधीर करंदीकर

सगळेच जण आपापल्या आवडींप्रमाणे व्हॅलेंटाइन डे हा दिवस साजरा करत असतात. माझा यावर्षी हा दिवस असा होता…

व्हॅलेंटाइन डेला सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात जवळची मैत्रिण, म्हणजे बायको, तिला ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’ केले. मी रोजच सकाळी कारण शोधून बायकोला शुभेच्छा देत असतो. अगदीच काही कारण नसेल तर, हॅपी सोमवार वगैरे… असे पण विश करतो. बायको खूश असेल तर दिवस छान जातो, हा माझा आजवरचा अनुभव!

सकाळचे खाणे आटोपले आणि  घराच्या बाहेरच्या बागेत झाडांना पाणी घालायला बायको बाहेर गेली. मी काहीतरी किरकोळ काम करत होतो. तेवढ्यात बायकोचा बाहेरुन आवाज आला,

“अहो, ग्लासभर गरम पाणी प्यायला देता का?” 

हेही वाचा – व्हॅलेंटाईन डे… प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस!

चला, बायकोला खूश करायला अजून एक चान्स मिळाला, असा विचार करून मी लगेच गॅसवर दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले. तेवढ्यात हॉलमधून मोबाइलची रिंग वाजली. धावत हॉलमध्ये गेलो. कॉलेज मैत्रीण छायाचा फोन होता…

मी : छायाजी नमस्ते, आज एकदम सकाळी सकाळी फोन! 

छाया : अरे, आज 14 फेब्रुवारी. हॅपी वैलेंटाइन डे…

मी : हॅपी व्हॅलेंटाईन डे.

शुभेच्छांची  देवाण-घेवाण झाली.  भरपूर जुन्या-नव्या गप्पा झाल्या. आता पुढचा फोन मी करायचा, असे ठरले. “बाय, हॅपी व्हॅलेंटाइन डे” करून फोन संपला. किती वेळ गेला, हे समजलेच नाही. फोन टेबलवर ठेवला आणि गॅसवर पाणी आहे, ही डोक्यात टयुब पेटली. धावत आत गेलो. गॅसवरचे दोन ग्लास पाणी आटून पाव कप पाणी झाले होते. तेवढ्यात बायकोचा बाहेरून आवाज आला,

“अहो, आज गरम पाणी मिळणार आहे कां?”

मी : सॉरी, पाणी गॅसवर लगेच ठेवलं होतं, पण माझ्या गोंधळात, गॅस ऑन करायलाच विसरलो होतो. आता लगेच देतो. असे म्हणून, मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदात पाणी गरम केले आणि खिडकीतून बाहेर बायकोला  ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’ म्हणत पाणी दिले. बायको पुन: खूश.

सकाळी 11च्या सुमाराला माझी फर्माईश म्हणून बायकोकडून मला गरमा-गरम चहा मिळाला. बायकोला म्हटलं, “चला, आज वॉशिंग मशीन मी लावतो.” आमच्या घरात वॉशिंग मशीन वरच्या मजल्यावर आहे. कपड्यांची बादली घेऊन वर गेलो. तेवढयात मित्राचा फोन आला. फोनवर बोलत-बोलत वर गच्चीत गेलो. ‘हॅपी व्हॅलेंटाइन डे’ची देवाण -घेवाण झाली. तीन-चार मिनिटांत फोन संपला. मशीनकडे गेलो. साबण पावडर टाकली. अ‍ॅक्टिव्ह सोक – वॉश – रिंझ – स्पिन अशी सायकल सिलेक्ट केली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रिंग वाजली की, आपण हातातले काम सोडून का पळतो, हे अजूनही मला समजत नाही. मशीनचे झाकण घाई-घाईत लावले आणि गच्चीमध्ये रेंज छान असते म्हणून फोन घेऊन गच्चीत गेलो. “व्हेरी व्हेरी  हॅपी व्हॅलेंटाइन डे” अशी तिकडून सुरुवात झाली. अननोन नंबर – लेडीज आवाज – कोण आहे, हे ओळखण्याकरिता तिकडून अनेक क्लू – जसे नावातली / आडनावातली अक्षरे वगैरे असे सुरू झाले. माझी ट्युब पेटत नव्हती. मी म्हटलं, “तुमचं लग्नाच्या आधीचं नाव आणि आडनाव यातली काही अक्षरं सांगा, लगेच ओळखतो.” तिकडून दोन-तीन अक्षरं आली आणि मी एकदम ओरडलो, अरे,  X X X,  तू!

हेही वाचा – फॅशनची हुडहुडी… वेळीच व्हा सावध!

“काय पत्ता आहे? कुठे होतीस?” अशा अनेक प्रश्नांची मी सरबत्तीच  सुरू केली. अहो -जाहो वरून अरे – तुरेवर केव्हा आलो आणि दोघेही भूतकाळात कधी गेलो, हे समजलेच नाही. आता कुठे भेटायचे, कसे भेटायचे हे ठरले. आता पुढचा फोन मी करायचा, असे पण ठरले. “बाय, हॅपी व्हॅलेंटाइन डे” करून फोन संपला. गच्चीचं दार लावलं आणि आत आलो. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला –

“अहो, मशीन झालेलं दिसतयं, ‘बीप – बीप’  आवाज येतोय…”

मशीनची सायकल नुकतीच संपली होती आणि ‘बीप – बीप’ आवाज येत होता. मेन स्विच बंद केला, झाकण उघडलं आणि गोंधळ लक्षात आला. सगळे कपडे बाहेर बादलीतच होते अन् मशीन मोकळीच होती! म्हणजे, मशीनमध्ये पाणी घेणे, साबणाचा फेस होणे, पाणी फेकणे, पुन: पाणी घेणे, असे सगळे सोपस्कार बिन कपड्यांचेच झाले होते. तेवढ्यात बायकोचा खालून आवाज आला –

बायको :  कपड्यांची बादली जिन्यात आणून ठेवा, मी वाळत घालीन.

मी : अग, जरा गोंधळ झाला. मशीन झाली आहे, पण मी मशीनमध्ये साबण टाकायला विसरलो होतो. आता साबण टाकून पुन: मशीन लावली आहे.

बायकोचा विश्वास बसला की नाही, हे कळायला मार्ग नव्हता! खाली आलो आणि बागेत गेलो. एक खडा घेऊन कानाला खडा लावला – की, पुढच्या  व्हॅलेंटाइन-डेला…

बायकोने गरम पाणी प्यायला मागितले तर पाणी गॅसवर गरम न करता, मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचे…

वॉशिंग मशीन लावायचे असेल तर, मशीनमध्ये आधी कपडे टाकायचे, मग पुढचे सोपस्कार करायचे…

कारण व्हॅलेंटाइन डे म्हणजे मैत्रिणींचे फोन हे येणारच…

सगळ्यांना पुढच्या व्हॅलेंटाइन डेकरिता शुभेच्छा…


मोबाइल – 9225631100

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!