भाग – 21
आरूने राम आणि पवनचं बोलणं पुन्हा एकदा ऐकलं होतं… ज्या व्यक्तीमुळे तिची पूर्ण गावात बदनामी झाली, ज्या व्यक्तीमुळे तिला शिक्षण… तिचं स्वप्न… सगळं सगळं अर्ध्यावर सोडून द्यावं लागलं… अशा व्यक्तीसोबत ती आयुष्यभरासाठी जोडली जाणार होती!
ती जितकी अलड्ड होती, समजदारही तितकीच होती. वेळप्रसंगी भावनिक तर, राग आल्यावर कोणाचीच भिड ठेवत नव्हती… आणि आता तिला शिवचा खूप राग आला होता आणि त्याची झळ शिवला बसणार होती.
सगळे हॉलवर पोहचले होते… शिव आणि त्याची फॅमिली देखील पोहोचली होती… सिया आणि आरू त्यांना दिलेल्या रूममध्ये थांबल्या होत्या. हॉलमध्ये हळदीची तयारी सुरू होती… सगळे एकत्र जमले होते…
“मी काय म्हणते कलावती ताई आणि सरिता ताई, दोन्ही नवऱ्या मुलांना सोबतच हळद लावूया आणि मग सोबतच दोन्ही नवरींना…” – सुधा.
“आवं म्या पण त्योच विचार करत होते बघा! पण म्हणलं तुम्हाला पटतंय का नाही…” – कलावती.
“एवढा विचार करता काय आम्हाला पटण्याचा! वाटत तर नाही तसं? आमच्या नातवाचं लग्न कसं थाटात व्हायला पाहिजे होतं…” आजी फणकऱ्याने म्हणाल्या.
कलावतीला त्यांचं बोलणं ऐकून वाईट वाटलं… आणि त्या सुधा यांच्याकडे पाहू लागल्या. सरिता पण त्यांच्याजवळ आल्या… आजूबाजूचे पाहुणेही त्यांच्याकडे पाहायला लागले… कारण आजी खूप मोठ्याने म्हणाल्या होत्या.
बायका आपापसात कुजबुजू लागल्या…
“आई काय करताय? चांगल्या कार्यात का उगाच व्यत्यय आणता! थाटात काय, शिवने लग्नच केलं असतं की नाही, शंका होती… निदान तो लग्न तरी करतोय!” सुधा आजीला हळू आवाजात म्हणाल्या.
त्यावर आजीने रागात सुधा यांच्याकडे पहिलं आणि खुर्चीवर जाऊन बसल्या… “करा काय करायचंय ते!” असाच लूक दिला त्यांनी.
हेही वाचा – रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…
“अहो ताई, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे… त्या थोड्या नाराज आहेत. शिवच्या लग्नाची खूप हौस होती ना त्यांना म्हणून जरा…” सुधा यांनी चेहऱ्यावर हसू आणत, बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
“हं… व्हय…” कलावती.
“बरं, झालंय सगळं… बोलवायचं का मुलांना? हळद लावून घेऊ…” सरिता विषय बदलत म्हणाल्या.
“हो…” सुधा.
“समरSSS जा शिवला घेऊन ये हळद लावायचीय…” सुधा समरला आवाज देत म्हणाल्या.
शिवच्या लग्नासाठी फक्त घरचेच उपस्थित राहणार होते. लीला आजी आणि दिनकरराव विशेष खूश नव्हते या लग्नासाठी… त्यामुळे त्यांनी कोणालाच सांगायचं नाही, असं बजावलं होतं. भलेही शिव त्याच्या मर्जीचंच करायचा, पण काही गोष्टीत लीला आजीसमोर त्याचंही नाही चालायचं… आणि तसंही त्याला हे लग्न कोणत्याही परिस्थितीत व्यवस्थित पार पाडायचं होतं. म्हणून तर, त्याने रामच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या. त्यात आजीच्या अटींची पण भर पडली होती!
“हो, काकू लगेच जातो…” समर शिवला बोलवायला गेला.
“आकाश, सगळ्या डिटेल्स व्यवास्थित चेक कर आणि मिस्टर मेहरांसोबत दोन दिवसांनी मीटिंग फिक्स कर… आणि तिथलं काम झालं की, लगेच इकडे हॉलवर ये…” शिव फोनवर इन्स्ट्रक्शन देत होता.
“दोन-तीन दिवस ऑफिसला सुट्टी दे ना! लग्न एन्जॉय कर ना तू… आणि आम्हालाही करू दे…” समर आत येत म्हणाला.
“समर आगाऊपणा करायचा नाही… आणि जे डोक्यात शिजतंय ना ते डोक्यातच राहू द्यायचं… कळलं?” शिव त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. त्यावर समरने बारीक तोंड करून मान हलवली.
“समर, आपल्यासाठी दिदीचं लग्न महत्त्वाचं आहे की नाही? ते लोक गावाकडचे आहेत, त्यांच्याकडे असा संगीत वगैरे कार्यक्रम नाही केला जात… या गोष्टींमुळे उगाच दिदीला त्रास नको ना!” समरचा पडलेला चेहरा पाहून शिव त्याला समजावत म्हणाला.
शिव दादाच्या लग्नात भावंडांना खूप मज्जा-मस्ती करायची होती… पण रामच्या घरच्यांचे आणि गावाकडील लोकांचे विचार पाहता, त्यांना संगीत वगैरे कार्यक्रम आवडणार नाही म्हणून शिवने असं काहीही करायला मनाई केली होती.
“हं… ठीक आहे… बरं चल खाली, काकूने बोलावलं आहे,” तो लगेच नॉर्मल झाला आणि शिवला काकूंचा निरोप सांगितला.
शिव हॉलमध्ये येतो. राम देखील आलेला असतो. दोघांची नजरा नजर होते. राम रागात नजर फिरवून घेतो. ते पाहून शिवच्या कपाळावर आठ्या पडतात… आणि परत त्याच्या मनात येतं, “यांना कळल का?… ओ गॉड, यांच्याशी बोलाव लागेल लग्नाच्या आधी…”
त्या दोघांना बोलावलं जातं. जिथे हळदीसाठी मंडप घातलेला असतो… शेजारी शेजारीच दोघांसाठी पाट ठेवलेले असतात… आणि बाजूलाच मधे एक पातळ पडदा लावून त्या बाजूला आरू आणि सियाला हळद लावली जाणार होती… या दोघांची झाल्यावर!
सुधा आणि कलावती पुढे येतात… शिव आणि राम पाटावर बसलेले असतात, त्यांच्यासमोर हळदीचं ताट… अगोदर मानाच्या पाच सुवासिनी त्या दोघांना हळद लावतात आणि ओवाळतात… नंतर तीच हळद बायका पलीकडे घेऊन गेल्या, जिथे आरू आणि सिया होत्या… शिव आणि रामच्या शेजारीच त्या दोघी होत्या, त्यामुळे त्या दोघींच्या हसण्याचा आवाज, बांगड्यांची किणकिण…
इकडे राम आणि शिवच्या मनाची चलबिचल वाढत होती… दोघांची नजर त्या पडद्यामधून अंधूक दिसणाऱ्या दोघींच्या आकृतींकडे जात होती… त्या क्षणांत दोघेही हरवून गेले होते! शेवटी, हे लग्न कोणत्याही परिस्थितीत पार पाडायचं होतं… प्रेम तर दोघांचंही होतं!
हळदीचा कार्यक्रम पूर्णपणे गावाकडच्या पद्धतीने सुरू होता… आधी दोघांना हळद लावण्यात आली… आता आरू आणि सियाला हळद लावायची होती…
आरूप्रमाणेच सिया पण तयार झाली होती… हळदीसाठी पूर्वीने बनवलेले खास दागिने तिने घातले होते… जरीची काठपदर असलेली साडी नेसली होती… जी कलावती यांनी घेतली होती… खुप सुंदर दिसत होती!
दुसऱ्यांदा हळद लागणार होती सियाला… पण त्यावेळी कोणत्याच गोष्टीत ती आनंदी नव्हती… आणि यावेळी तिला काय वाटतं तेच तिला कळत नव्हतं… ती खूश पण नव्हती, नाराज पण नव्हती… नेमकं काय वाटतंय हेच तिला कळत नव्हतं. नुसता गोंधळ होता भावनांचा! बस्स… जे होतंय ते होऊ द्यायचं, एवढंच तिने ठरवलं होतं.
तर आरू एकदम शांत होती. सगळ यंत्रवत सुरू होतं तिचं! काय होत तिच्या मनात?
हळदीचा कार्यक्रम छान पार पडला होता, पण या सगळ्यात कोणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता… राम नाराज असल्यामुळे आरू उदास होती. सियाच्या पहिल्या लग्नाच्या आठवणी अन् सोबत तिला मिळालेल्या जखमा पण ताज्या होत होत्या… शिव पण अस्वस्थ होता. सगळा कार्यक्रम झाल्यावर तो रामला भेटायला गेला होता आणि तेव्हाच त्याला रामच्या रागाचं कारण कळलं होतं! …आणि आरूच्या बाबतीत जे काही घडल ते आपणच केलं, हे शिवने कबूलही केल होतं… पण सोबत रामला हेही सांगितलं होतं की, “मी जे काही केलं ते माझ्या बहिणीसाठी केलं.. तिच्या सुखासाठी केलं… तिला तिचं प्रेम मिळावं म्हणून केलं!”
“मान्य की, मी चुकीचा वागलो, मी त्यावेळी इतर गोष्टींचा विचारच केला नाही! माझ्यामुळे आरूच्या डोळ्यात पाणी आलं… माझ्यामुळे तिला त्रास झाला… सगळं सगळं मला मान्य, पण मी शब्द देतो की, यापुढे तिच्या डोळ्यांत एक थेंबही येऊ देणार नाही. यापुढे तिची स्वप्नं माझी असतील… मला जाणीव आहे, ती अजून लहान आहे… आणि याचं भान मी ठेवीन! जोपर्यंत तिचं शिक्षण पूर्ण होणार नाही आणि ती स्वतः या नात्यात पुढे पाऊल टाकणार नाही, तोपर्यंत मी या नात्यात पुढे जाणार नाही! कुठलीही गोष्ट तिच्यावर लादणार नाही…” असं वचन शिवने दिलं होतं.
रामने पण त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्याच्या डोळ्यांत बहिणीसाठी तळमळ दिसत होती आणि आरूसोबत जे वागला त्याचं गिल्टही दिसत होतं… त्याहीपेक्षा शिवने तिचं स्वप्न पूर्ण करण्यात तिला साथ देणार, असं वचन दिलं… आणि रामसाठी यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असणार होत!
रामशी बोलून शिव बाहेर येत होता… तर त्याची नजर दारात उभ्या आरूवर गेली, जिच्या डोळ्यांत पाणी होतं… जे हेच सांगत होत, तिने राम आणि शिवचं सगळं बोलणं ऐकलं आहे! तिच्या डोळ्यांत त्याच्यासाठी नाराजी, दुःख, राग असे मिश्रित भाव होते… पाण्याच्या रूपात डोळ्यांतून वाहात होते. त्याने कपाळावर बोटे घासत तिच्या दिशेने पुढे पाऊल टाकलं, तोच ती मागे फिरून पळतच निघून गेली… अस्वस्थपणे केसांतून हात फिरवत तो तिच्या मागे गेला, पण तोपर्यंत ती रूममध्ये गेली होती आणि दार लावून घेतलं होतं.
त्याने सुस्कारा सोडत त्या बंद दरवाजाकडे पाहिलं आणि तिथून बाहेर जायला निघाला.
“शिवSSS शिवSSS अरे, कुठे जातोयेस? थांब ना यार, काय चाललंय तुझं?” आकाश शिवच्या मागे येत म्हणाला.
“सगळा गोंधळ झालाय यार आकाश…” शिव रेस्टलेस होत म्हणाला.
“ओके… जे काही झालं आसेल ते आपण रूममध्ये जाऊन डिस्कस करू… आजींनी सक्तपणे सांगितलंय, लग्न होईपर्यंत तुला कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही! आजीचा आत्ताच कॉल आला होता…” आकाश त्याला समजावत म्हणाला.
हळद लागल्यावर नवरदेव आणि नवरी यांना बाहेर कुठे जाऊ देत नसत. त्यांना दृष्ट लागू शकते, अशी एक धारणा होती आरूच्या गावाकडची! आणि त्याबाबतीत लीला आजीचं देखील मत जुळलं होतं. रीतीभाती सांभाळणारी लोक आहेत, या विचाराने त्या जराशा समाधानी पण झाल्या होत्या. हळद झाल्यावर आजी, दिनकरराव आणि सुधा घरी परतले होते. समर पण त्यांच्यासोबत घरी गेला होता. त्यातही दिनकरराव जास्त वेळ न थांबता लगेच निघून गेले होते, त्यामुळे त्या दोघींना सोडण्यासाठी समरला जावं लागलं.
बाकी शिव आणि सिया तसेच राम आणि त्याची फॅमिली तसेच इतर पाहुणे मंडळी इथेच हॉलवर थांबले होते. सियासोबत पूर्वी तर शिवसोबत आकाश होता. पण शिवने आकाशला इथे देखील ऑफिस उघडून बसवलं होतं आणि तो रामशी बोलायला बाहेर आला होता.
हेही वाचा – राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…
तोच आकाशला आजीचा कॉल आला होता… हे सांगायला की, शिवला आता बाहेर पडू देऊ नकोस… शेवटी आजी होत्या. त्यांचाही खूप जीव होता शिववर! नाराजी दाखवायची होती आणि मागे काळजी पण करायची होती! दाखवत नसल्या तरी त्याही खूश होत्याच. फक्त त्यांना शिवचं लग्न इतक्या गरीब घरातल्या मुलीसोबत नको होतं… आणि सियाला कसा का असेना, पण अविवाहित नवरदेव मिळतोय, म्हणून समाधान मानलं होतं. जुने विचार एवढ्या लवकर पाठ सोडणार नव्हतेच!
इकडे आरू रूममध्ये आल्यावर तिने दार लावून घेतलं होतं आणि दाराकडे पाठ करून ती खाली बसून रडत होती…
“आरू… आरू काय झालं? कुठे गेली होती तू? ए आरू बोल ना… का रडतेस तू?” भावना तिला असं रडताना पाहून घाबरून, काळजीने विचारत होती… काहीही न बोलता आरू नुसती रडत होती… भावनाला मिठी मारून ती किती तरी वेळ रडत होती…
भावनाने पण तिला रडू दिलं. कदाचित उद्या लग्न होईल आणि मग ती कायमची दुरावणार म्हणून तिला भरुन आल असावं… असा भावनाने समज करून घेतला. कारण ती किती भावनिक आहे, खास करून तिच्या दादाच्या बाबतीत हे तिला माहीत होतं.
क्रमशः


