भाग – 2
नंदा…
म्हणता म्हणता मी बारावी झाले आणि रत्नागिरीस डीएडची ॲडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले, तेव्हा माझ्या लक्षात आले, रत्नागिरीत सुद्धा आप्पांच्या किती ओळखी? अगदी एसटी स्टॅण्डवर सुद्धा लोक आप्पांशी बोलायला येत होती… आम्ही ज्या लॉजवर राहिलो एक रात्र, तेथे पण आप्पांना मोठं मान…! कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी पोहोचलो तेथील क्लार्क आप्पांना ओळखत होते, त्यांनी भरभर आमची कामे केली. नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने आप्पांनी माणसे जोडली होती.
आप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम जोरात होते, त्यांनी पंचक्रोशीतील धडपड्या तरुणांना एकत्र करून नाटके सुरू ठेवली… आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या दोन बाई पण नाटकात भाग घेऊ लागल्या आणि आप्पा बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन कालेलकरांची नाटके बसवू लागले. सावंतवाडी, वेगुर्ले, मालवण ते रत्नागिरीपर्यंत नाटके नेऊ लागले…
दादा नोकरीला लागला आणि मामाने त्याचे लग्न जमवले. त्याच्याच ऑफिसमधील मुलगी… दादाने पत्र लिहून आईला कळविले. आईला आणि मला लग्नाला बोलावले. आप्पांना दादाचे लग्न ठरत आहे, हे कळले तेव्हा,
हेही वाचा – जातीभेदापलीकडचे आप्पा अन् अलीकडचा रवीदादा!
आप्पा – आनंदाची बातमी आहे, जोशीच्या घरात नवीन सून येते आहे. तुम्हाला दोघींना बोलावले आहे, मी एसटीचे बुकिंग करून ठेवतो, तुम्ही दोघी जा लग्नाला, रवीला आणि तुझ्या भावाला पण आनंद होईल.
आई – पण त्याने आपल्या पित्याला बोलावलेले नाही, हे मला आवडले नाही. मी लग्नाला जायची नाही.
आप्पा – असे करू नका, त्याला वाईट वाटेल. माझी काळजी करू नका. तुम्ही दोघी जाच!
आई – मी नाही जाणार. येथूनच अक्षता टाकेन. नंदेला जाऊदे.
शेवटी आई लग्नाला गेली नाही आणि मी पण नाही.
माझ्या आप्पांना लग्नाला बोलावले नाही म्हणजे काय?
रवी दादा…
माझ्या लग्नाला आई, नंदा आली नाहीत. कदाचित आप्पांना लग्नाला बोलवले नाही, हे त्यांना खटकले असेल. पण आप्पांबद्दल माझ्या मनात अढी बसलीच आहे, ती कशी निघणार. शिवाय, ती मंडळी आली तर, मामाकडेच उतरणार अन् मामा आणि आप्पांचे बोलणे किती वर्षांपासून नाही. म्हणजे मामाची पण आप्पा लग्नाला येऊ नये, अशी इच्छा असणार.
लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मामांच्या आणि ऑफिसच्या कृपेनें मी जागा घेतली आणि आता तरी आईने माझे घर पहावे, असे मला वाटू लागले. मी तिला पत्र लिहिले, पण तिचे उत्तर आले नाही.
माझ्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले असतील, एक दिवस नंदेचा ऑफिसमध्ये फोन आला आणि मी सटपटलोच, “आईला अर्धांगवायूचा मोठा झटका आला असून आप्पांनी तिला रत्नागिरीत परकार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे.”
मी घाबरलो, आई म्हणजे माझा कलेजा होता! मी त्याच दिवशी रात्रीची रत्नागिरी एसटी पकडली आणि पहाटे रत्नागिरीत पोहोचलो. आईची परिस्थिती गंभीर होती… सलाइन्स लावलेली होती… तिचा फक्त एक डोळा उघडा होता आणि एक हात हलत होता. ती कुणालाच ओळखत नव्हती. आप्पा आणि नंदा बाजूलाच होती. मला पाहताच आप्पा रडू लागले, नंदा रडू लागली… माझ्याही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.
संध्याकाळी मी डॉक्टरांना भेटलो, त्यांचे म्हणणे – आता पेशन्टला घरी घेऊन जा. हॉस्पिटलमधील उपचार केले आहेत, यापुढे उपचार नाहीत. घरी नेऊन मालिश करा, व्यायाम करून घ्या.
त्याच दिवशी आम्ही आईला घरी आणले.
आईला घरी आणल्यापासून आप्पांनी आईचा चार्ज घेतला. रोज तेलाने मालिश करण्यापासून हात वरखाली करणे, पाय वर करणे, गरम पाण्याने शेकणे सुरू केले. शिवाय आम्हा सर्वांचे जेवण सुद्धा! आप्पांनी आईला हॉस्पिटलमधून घरी आणले, हे कळले मात्र, दुसऱ्या दिवशी पासून गावातील आणि आजूबाजूच्या गावांतील लोक भेटायला येऊ लागले. कित्येक लोक मदत करण्यासाठी आले. काही बायका रोज भांडी घासून दयायचा, जमिनीला शेण सरवून द्यायच्या… कोणी आईसाठी तेल आणली, डुकराचे तेल आणले.
एवढी माणसे आमच्या घरी कशी काय येतात, हा मला प्रश्न पडत होता. गावचे सरपंच, पोलीस पाटील अगदी जिल्ह्याचे आमदार पण येऊन चौकशी करून गेले! सारेजण येऊन आप्पांना भेटत होते. ‘काही लागलं तर कळवा,’ असे सांगत होते.
मी नंदेला विचारलं, “नंदे, एवढी माणसे चौकशीला, मदतीला कशी काय येत आहेत?”
नंदी म्हणाली, “दादा, हे आप्पांमुळे! आप्पा सर्व समाजात मिसळतात, कोण कुठल्या जातीचा हे पाहात नाहीत. त्याना घेऊन भजन करतात, कोणालाही पेटी, तबला विनामोबदला शिकवतात. गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन नाटके बसवतात, त्यामुळे ही लोक आप्पांच्या मदतीसाठी धावून आलीत.”
मला शरम वाटली. मी असे काहीच केले नाही, अशी माणसे जोडली नाहीत…
रत्नागिरीच्या डॉक्टरांनी एक दिवसाड एक इंजेक्शन लिहून दिले होते. या खेडेगावात कोण इंजेक्शन देणार? असा मला प्रश्न पडला. आप्पांनी 10 किलोमीटरवरील डॉक्टरांना निरोप पाठविला मात्र, ते डॉक्टर घरी येऊन इंजेक्शन देऊ लागले… आईचे ब्लडप्रेशर पाहू लागले. आप्पांनी एवढी माणसे जोडली होती, हे खरे!
आईच्या आजारपणामुळे आप्पा सर्वच आघाड्यांवर लढत होते. पहाटे उठून गोठ्यात जाणे, शेण काढणे, दूध काढणे मग आईची स्वछता… कपडे बदलणे.. आंघोळ घालणे.. आमच्यासाठी चहा, नाश्ता करणे… मग गावात भिक्षुकीला जाणे. नंदी मदतीला होती थोडीफार, पण तिला पण कॉलेजला जायची घाई होती. मग माझ्या आईची काळजी कोण घेणार?
माझी रजा पण संपत आलेली, नंदी रतनगिरीला जायची. मग घर आणि अंथरुणाला खिळलेल्या आईकडे लक्ष द्यायला कोण? एकटे आप्पा, आणि त्यानी गोळा केलेली माणसं! आणि मी आप्पांना दोष दयायचो? गेल्या कित्येक वर्षांत त्याच्याशी भाषण केलेले नाही! माझ्या लग्नात त्यांना बोलावले नाही? त्यांना सून दाखवली नाही अजून? नवीन घर घेतलं मुंबईत, तर बघायला या म्हटले नाही? किती चुकीचा वागलो मी. आई आणि नंदू सारखी सांगायची, ‘आप्पांशी निदान दोन शब्द बोल…’ ते पण केलं नाही मी!
माझा जायचा दिवस आला. दुपारी जेवून निघणार होतो मी. आप्पांनी वरण, भात, मेतकूट तयार ठेवले होते. आप्पांनी आईला सूप भरविले आणि नंदीने ताटे घेतली. मी कसाबसा दोन घास घशाखाली घातले. मी उठलो हे पाहून आप्पा आणि नंदी पण ताटावरून उठली. मी आईकडे जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरविला, माझ्या पाठीच आप्पा आणि नंदी उभी होती…
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
घशात कढ येत होते, डोळ्यांत अश्रू जमा होत होते. काही कळायच्या आत मी आप्पांच्या गळ्यात पडलो, “क्षमा करा आप्पा, तुमच्या कोकराला क्षमा करा, तुम्हाला ओळखलं नाही मी आप्पा…”
आप्पा मला थोपटत होते.
“असूदे, असूदे बाळा… अरे, बाप मुलावर कधी रागवेल काय? बाप मुलावर फक्त प्रेम करतो, तो रागवेल कसा?”
“आप्पा, माझ्यासारखा मुलगा असता तर कुठलाही बाप रागावला असताच. पण तुम्ही खरंच महान आहात. तुम्ही गावातील लोकांना जमवून भजने करता, नाटकें करता, जातीपतीचा विचार करत नाहीत म्हणून मी दोष देत होतो, पण तुम्ही समाजात मिसळून किती माणसे जमवलीत, हे आईच्या या आजारपणात समजले. आपण समाजात मिसळलो तर समाज तुमच्या मदतीला धावतो, हे मला समजलं… क्षमा करा आप्पा, क्षमा करा.”
आप्पा रडत रडत मला थोपटत होते, शेजारी नंदी पण मला मिठी मारून रडत होती… मी बाहेर पडताना आईकडे पाहिलं, आई पण हसत होती असा मला भास होत होता…


