भाग – 1
“मग काय ठरलं तुझं? कोणत्या फँकल्टीला घेतोय अँडमिशन?” घरात आल्या आल्या राजेशने नीरजला विचारलं.
“अर्थातच, मेकॅनिकल!” नीरज विश्वासाने म्हणाला.
“मला खूप इंटरेस्ट आहे मशिन्समध्ये. त्या कशा बनतात, कशा चालतात हे जाणून घ्यायला मला आवडेल. शिवाय, मेकॅनिकल इंजिनीअर्सना पुण्यामुंबईतल्या फॅक्टरीत खूप डिमांड आहे, असं मी ऐकलंय.”
“तरी पण मला वाटतं, आपण ॲप्टिट्युड टेस्ट करून घेऊया, म्हणजे आपला निर्णय कन्फर्म होईल.”
“तशी गरज तर नाही म्हणा, पण तुम्ही म्हणताय तर करून घेऊया,” नीरज म्हणाला.
नीरजचा नुकताच सीईटी आणि जेईईचा रिझल्ट लागला होता. चांगले मार्क्स मिळाले होते. त्याअगोदर बारावीचा रिझल्ट लागला होता. त्यातही त्याला चांगले मार्क्स होते. नीरजला मुंबईतल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घ्यायची इच्छा होती. तिथल्या शिक्षणाला बाहेर चांगली मागणी असते, शिवाय मुंबईत शिकणारी मुलं स्मार्ट होतात, असं त्याचं म्हणणं होतं.
मुंबईत नीरजला एका नामांकित काँलेजमध्ये दीड लाख फी भरून विनासायास ॲडमिशन मिळाली. राजेशने स्वतः होस्टेल लाइफचा वाईट अनुभव घेतला असल्याने नीरजला होस्टेलमध्ये ठेवायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून मग कॉलेजपासून बारा किमीवरच्या अपार्टमेंटमध्ये कॉट बेसिसवर त्याला फ्लॅट घेऊन दिला. महिन्याला बारा हजार भाडं होतं. शिवाय, मेससाठी महिन्याला पाच हजार लागणार होते. पाच हजार वरचा खर्च… असे बावीस हजार महिन्याला पाठवावे लागणार होते. पैशांचा हा चुराडा राजेशला मनातून खटकत होता. अकोल्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली असती तर, हा सर्व खर्च वाचला असता. शिवाय, नीरज त्यांच्या डोळ्यांसमोर राहिला असता. त्याचा अभ्यास, त्याची प्रगती, अधोगती याचा आढावा घेता आला असता. पण नीरजचा मुंबईलाच ॲडमिशन घेण्याचा हट्ट होता. एकुलत्या एक मुलाचा हट्ट त्याला आणि जयूला मोडता आला नाही.
हेही वाचा – आलीया भोगासी… एकाकीपणातून बाहेर आले देशमुख सर
नीरजचं बस्तान बसवून राजेश घरी परतला. अकोल्याला घरी परतल्यावर त्याने जयूला सर्व माहिती दिली. मुलगा मार्गाला लागला, याचं तिलाही समाधान वाटलं. आपला मुलगा मुंबईच्या एका नामांकित काँलेजमध्ये शिकतोय, असं दोघंही अभिमानाने नातेवाईक आणि परीचितांना सांगू लागले.
नीरजचं आयुष्य सुरळीत चालू होतं. दर दोन-तीन दिवसाआड राजेश आणि जयू त्याला फोन करून हालहवाल विचारायचे. त्याच्या अभ्यासाबद्दल चौकशी करायचे. कॉलेजमध्ये युनिट टेस्ट झाली. त्यात नीरजला सगळ्याच विषयांत कमी मार्क्स मिळाले. जयू धास्तावली. राजेश संध्याकाळी घरी आल्यावर जयूने त्याबद्दल त्याला सांगितलं. राजेशने नीरजला फोन लावला…
” काय रे बेटा, कमी मार्क्स मिळालेत म्हणे तुला?”
“बाबा बहुतेक मुलांना कमीच आहेत. ही गोष्ट खरी आहे की, काही विषय खरोखर कठीण आहेत. बहुतेक मुलांना ते समजतच नाहियेत!”
राजेश स्वतः इंजिनीअरिंगचा डिप्लोमाधारक होता. पहिलं वर्ष आपल्यालाही जरा कठीणच गेलं होतं, हे त्याला आठवलं. पण त्याने चिकाटीने अभ्यास करून उत्तम मार्क्स मिळवले होते.
“हरकत नाही बेटा. चिकाटीने अभ्यास कर. पहिलं वर्ष सर्वांनाच जड जातं…”
“अहो, त्याला विचारा. काही विषयांचे क्लासेस लावायचे असतील तर लावून घे,” जयू मधेच म्हणाली. नीरजने ते ऐकलं.
“हो बाबा. आमच्या वर्गातल्या ज्या मुलांनी क्लासेस लावले होते, त्यांना चांगले मार्क्स आहेत.”
“मग तुलाही लावायचे असतील तर, लावून घे,” राजेश म्हणाला.
“बरं चालेल. पण बाबा ते क्लासेस खूप दूरदूर आहेत. तिथं जाणार कसं? बाइकशिवाय तिथे जाणं शक्य नाही. बसेस आहेत, पण त्यांना खूप गर्दी असते. शिवाय, त्या बऱ्याच दूर सोडतात…”
“ठीक आहे, तू चौकशी करून ठेव. मी इथून बाइक पाठवत़ो.”
“बाबा पाठवाल तर चांगली रेसर बाइकच पाठवा. तुमच्याकडे आहे तशी साधी बाइक पाठवू नका…”
राजेशला नीरजची ही डिमांड अजिबात आवडली नाही. “तू शिकायला गेला आहेस की, मजा करायला?” असा प्रश्न विचारायचं त्याच्या ओठांवर आलं होतं. पण त्याने मनाला आवर घातला.
“बरं बघतो. तू अभ्यास मात्र नीट कर…” एवढं बोलून त्याने फोन ठेवला.
पंधरा दिवसांनी राजेशने सोसायटीचं कर्ज काढून नीरजने सुचवलेल्या ब्रँडची दीड लाखाची बाइक घेऊन मुंबईला पाठवून दिली. हे करताना खरंतर तो मनातून नाराजच होता. त्याला त्याचे दिवस आठवले. एक एक पैशाचा हिशोब ठेवून मोठ्या काटकसरीने त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. आपल्या शिक्षणाचा वडिलांवर जरासुद्धा भार पडू नये, याचा तो आटोकाट प्रयत्न करायचा. दुसरं म्हणजे, तो काही धनाढ्य नव्हता. त्याच्या महाराष्ट्र राज्य वीजमंडळातल्या नोकरीत त्याला काही लठ्ठ पगार मिळत नव्हता. आधीच नीरजला दरमहिन्याला बावीस हजार पाठवावे लागत होते. आता बाईकच्या कर्जाचे हप्ते आणि बाइकच्या पेट्रोलचा खर्च त्याच्या डोक्यावर बसला होता. नीरजच्या क्लासेसची फी वेगळीच होती…
पाच वर्षापूर्वी त्याने नवीन घर बांधलं होतं. त्याचे हफ्ते सुरू होतेच. पण नीरजला हे गणित समजत नव्हतं. सांगून फायदाही नव्हता. विशेष म्हणजे, जयूची त्याला साथ होती. आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलासाठी थोडा खर्च केला तर काय बिघडतं? त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे? असं तिचं म्हणणं होतं. यावरुन दोघांचे नेहमी वाद होत. “आपण कसं काटकसरीत शिक्षण पार पडलं,” याबद्दल राजेश सांगू लागला की, जयू म्हणायची, तो तुमचा काळ होता. आता तसं शक्य नाही. प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन येत असतो. आज आपली आर्थिक परीस्थिती बरी आहे, मग तुमच्यासारखं निरजने काटकसरीत शिक्षण का करावं? असाही तो काही उगीच पैसे उडवणारा मुलगा नाहीये… तिने असं म्हटलं की, राजेश चूप व्हायचा.
दिवाळीत नीरज घरी आला. आईला म्हणाला, “आई बाहेरचं खाऊन आम्ही खूप कंटाळलोय. आम्ही मुलांनी आता ठरवलंय की, घरीच सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करायचा. मेसचे पैसेही वाचतील आणि शुद्ध सात्विकही खायला मिळेल…”
जयूला आपला लेक काटकसर करतोय, हे पाहून त्याचं खूप कौतुक वाटलं. तिने मग त्याला भाज्या, वरणभात, पोळ्या कशा करायच्या ते शिकवलं. राजेशला मात्र नीरजने स्वयंपाक शिकण्याच्या भानगडीत न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं, असं वाटत होतं. त्याने तसं बोलूनही दाखवलं. तेव्हा जयू त्याला म्हणाली, “अहो, बाहेरगांवी राहून शिकणाऱ्या मुली सहसा स्वयंपाक घरीच करतात. मेस लावत नाहीत. मग या मुलांनी तसं केलं तर, बिघडलं कुठे? आणि तुम्हांला हवी तशी काटकसर तो करतोय तर करू द्या ना!”
राजेश चूप बसला. अभ्यासावर परिणाम होणार नसेल तर, राजेशलाही तशी काही हरकत नव्हती.
दिवाळीनंतर लगेचच नीरजची सेमिस्टरची परीक्षा झाली. पेपर्स चांगले गेलेत, असं त्याने आईवडिलांनी फोन केल्यावर सांगितलं. जयू आणि राजेश दोघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि ते त्याच्या रिझल्टची वाट पाहू लागले…
दुसरं सेमिस्टर सुरू झालं. जयू त्याला फोन केल्यावर त्याच्या जेवणाचे हालहवाल विचारायची. “मी आता खूप चांगला स्वयंपाक करतो. माझ्या मित्रांना माझ्या हातच्या भाज्या खूप आवडतात. युट्युबवर पाहून मी बऱ्याचदा नवनवीन पदार्थ बनवतो. तेही त्यांना खूप आवडतात…” असं तो आनंदाने सांगायचा. जयूला खूप बरं वाटायचं.
राजेश त्याला वारंवार रिझल्टबद्दल विचारायचा. त्यावर त्याचं, ‘अजून लागला नाही. लागला की कळवेन,’ हे उत्तर ठरलेलं होतं. एक दिवस नीरजने जयूला फोन करून रिझल्ट लागल्याचं सांगितलं. पाचपैकी चार विषयांत तो नापास झाला होता. जयूला धक्काच बसला. ही बातमी राजेशला कशी सांगावी, हेच तिला कळेनासं झालं. राजेश नीरजसोबत तिलाही दोष देणार होता. संध्याकाळी तो घरी आल्यावर तिने भीतभीत ही बातमी त्याला सांगितली. ती ऐकून राजेशही गंभीर झाला. एवढा हुशार मुलगा चक्क चार विषयांत नापास व्हावा, याचा त्यालाही जबरदस्त धक्का बसला. त्याने ताबडतोब नीरजला फोन लावला.
“बेटा असं कसं झालं? तू तर चांगला अभ्यास केला होतास ना?” त्याने विचारलं.
बाबा खूप मुलं फेल झालीयेत. आम्ही सर्वांनी रीचेकिंगचे फॉर्म भरलेत.”
माणसाचं एक असतं, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही वाईट झालंय, हे पाहून त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होते. राजेशचंही तेच झालं. बरेच जण नापास झालेत, याचा अर्थ विद्यापीठाच्या पेपर तपासण्यात गडबड झालीय, असं त्याला वाटून गेलं. धक्क्याची तीव्रता कमी झाली.
“तू धीर सोडू नकोस नीरज. तुझा अभ्यास नीट सुरू ठेव. रीचेकिंगचा रिझल्ट काहीही येऊ दे, फेल झालेल्या विषयांची तयारी सुरू ठेव. पुढच्या सेमिस्टरला तुला सगळे विषय क्लिअर करायचेत. कोणत्याही परिस्थितीत वर्ष वाया घालवू नकोस. त्याचे परिणाम फार वाईट होतात, बरं बेटा!”
“हो बाबा, मला कल्पना आहे त्याची. मी प्रयत्न करेन…”
राजेशने फोन ठेवला खरा, पण शंकाकुशंकांनी त्याचं मन भरून गेलं.
पंधरा दिवसांनी अचानक नीरज घरी आला. राजेश ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. जयू त्याचा डबा बनवत होती.
“अरे, अचानक कसा आलास? काही गडबड तर नाही?” राजेशने धास्तावून विचारलं.
“नाही बाबा. कॉलेजचं गॅदरिंग सुरू आहे. मला त्यात काही इंटरेस्ट नाही म्हणून मी घरी आलो. माझे काही मित्रही घरी गेलेत…”
“अरे पण, मग फोन तर करायचा. घ्यायला आलो असतो मी तुला स्टेशनवर…”
“मी काही आता लहान नाही राहिलो बाबा आणि मला तुम्हाला दोघांना सरप्राइज द्यायचं होतं.”
“ओके ओके… तुम्ही मायलेक गप्पा मारा. संध्याकाळी मी आलो की बोलू मग…”
“हो, चालेल.”
संध्याकाळी राजेश घरी परतला. फ्रेश होऊन चहा घेतल्यावर राजेशने नीरजला डायनिंग टेबलवर बोलावलं. नीरज थोडा अस्वस्थ वाटत होता.
” अरे, तुझा रीचेकिंगचा रिझल्ट लागला की नाही?” जयूने विचारलं.
नीरजने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला, “आईबाबा, मी तुमच्याशी खास बोलण्यासाठीच आज अचानक आलोय. मी एक निर्णय घेतलाय… मी इंजिनीअरिंग सोडतोय!”
“काय्यssss” दोघंही मोठ्याने ओरडले.
“हो आईबाबा. माझा रीचेकिंगचा रिझल्ट लागला. मी त्या चारही विषयांत फेल झालोय. आता हे चार विषय आणि पुढच्या सेमिस्टरचे पाच विषय अशा नऊ विषयांचा अभ्यास मला जमणार नाही. माझ्या लक्षात आलंय की, इंजिनीअरिंग माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेरचं आहे. म्हणून मी इंजिनीअरिंग सोडण्याचा निर्णय घेतलाय.”
मुलाचं बोलणं ऐकून जयू रडायलाच लागली. राजेश डोळे फाडून नीरजकडे बघत होता. आतापर्यंत त्याने नीरजसाठी खर्च केलेल्या पैशांचा हिशोब त्याच्या डोळ्याभोवती नाचू लागला. आतापर्यंत पाच लाखाच्या वर खर्च झाला होता आणि हाती शून्य लागलं होतं… जरा वेळाने तो सावरला. स्वतःच्या संतापावर नियंत्रण ठेवून तो म्हणाला,
“असा आततायी निर्णय घेऊ नकोस. नेटानं अभ्यास केलास तर, हेसुद्धा विषय निघू शकतात. माझ्या मित्राच्या मुलाचे तर पाचही विषय राहिले होते, पण त्याने ते पुढच्या सेमिस्टरला क्लिअर केले. पहिल्या वर्षी असे प्राँब्लेम्स् येतातच. एवढं काय घाबरून जायचं?”
“पण बाबा मला त्यात इंटरेस्टच उरला नाहीये. तुम्हाला माहीत नाही बाबा, मेकॅनिकलला सध्या कुठलीच व्हॅल्यू राहिली नाहिये. थ्रू-आऊट डिस्टिंक्शन मिळवून पास होणाऱ्या मुलांनाही नोकऱ्या नाहीत. तीन-तीन चार-चार वर्षापासून घरी बसलेत, नाहीतर पाच-पाच हजारांवर नोकऱ्या करताहेत. दरवर्षी लाखो इंजिनीअर्सचं प्रॉडक्शन होतंय. कुणाकुणाला नोकरी देणार? समजा, मी पास होत गेलो तरी, शेवटी माझ्या हातात काय येणार? तर फक्त डिग्रीचे कागद? ज्यांना कसलीही किंमत नाही!”
हेही वाचा – सायकल… अपराधीपणाच्या भावनेतून सुटका!
“अशी कशी किंमत नाही? जेव्हा सरकारी खात्यात जागा निघतात, तेव्हा हेच कागद कामास येतात ना? पुढे तुला जर एम.एस. करावसं वाटलं तर, हेच कागद उपयोगी पडणार आहेत. याच कागदावर तुम्ही किती उच्चशिक्षित आहात, हे कळतं. याच कागदांमुळे तुम्हांला समाजात इज्जत मिळते…” राजेश चिडून म्हणाला
” बाबा तुम्ही अजून हे जग पाहिलं नाहिये. या जगात काय-काय घडतं याची तुम्हाला कल्पना नाही…”
त्याच्या या बोलण्यावर राजेश स्तब्धच झाला. एक अठरा वर्षांचं पोरगं संपूर्ण देश फिरलेल्या पंचेचाळीस वर्षांच्या प्रौढ माणसाला म्हणत होतं की, तुम्ही जग बघितलेलं नाहिये!
“नीरज, तू तुझ्या बापाला म्हणतोय असं?” जयू ओरडून म्हणाली. नीरज वरमला.
क्रमश:


