Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितमुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट

मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट

सुहास गोखले

(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)


माझ्या दोन फेसबुक लेकी घरी भेटायला आल्या होत्या. गप्पा मारताना त्यांनी नेहमीच्या तारुण्यसुलभ लहरीप्रमाणे, मला “काका, चला ना सेल्फी काढुया!” असा फतवा काढला. नेहमीप्रमाणे सेल्फी घेताना दोघींनी पाऊटस करून फटाफट सेल्फी घेतले. मलाही पाऊट करण्याचा आग्रह झाला.

आपण सगळे नेहमीच बघतो की, मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा आल्यापासून हा सेल्फीचा ट्रेंड आला आणि तो अद्यापही तेवढाच जोरात आहे. त्यातही सेल्फी घेताना मुलं ‘हाय-फाइव्ह’ देतील किंवा ‘यो!!!’ म्हणून बोटांची विवक्षित घडी करतात… मात्र मुली हमखास ओठांचा पाऊट म्हणजेच चंबू करतात. तेवढ्यावर न थांबता त्या सोबतच्या म्हाताऱ्या मंडळींनाही पाऊट करण्याचा हट्ट धरतात. तो हट्ट एवढा गोड असतो की, आपण विचित्र दिसत आहोत हे माहिती असूनही म्हातारे त्याला हमखास बळी पडतात.

मी मात्र पाऊट कधीच करत नाही, त्यातले पहिले कारण माझा पॅरलिसीस आणि दुसरे काहीसे वेदनादायक कारण आहे 1999मधला एक प्रसंग.

मी धारावी पोलीस स्टेशनला नाइट शिफ्ट संपण्याच्या प्रतीक्षेत चहाचे घोट घेत होतो, तेवढ्यात फोन खणखणला, “साहेब! जोगळेकर नाल्यापाशी एक नवजात अर्भक पडलेले आहे.” धारावीसारख्या अशियातल्या मोठ्या झोपडपट्टीत, असे कॉल फारसे धक्कादायक नव्हते. मी एका शिपायाला घेऊन स्पॉटवर पोहोचलो. एका गोणपाटात गुंडाळलेले अर्भक दिसले… गोणपाट दूर सरकवले आणि लक्षात आले की, ते बाळ Umbilical cord (नाळ) आणि Placenta सकट होते. रक्ताच्या वासावर आलेल्या मुंग्या बाळाला चावत होत्या, त्यामुळे ते बाळ क्षीणपणे हातपाय हालवत होते. ती एक मुलगी होती. ती जिवंत आहे, हे बघताच मी त्या रक्ताने माखलेल्या कपड्यासकट तिला उचलले.

हेही वाचा – …आणि पोलीस दलात जाण्याचा निश्चय केला!

माझ्या शरीराच्या उबेमुळे असावे, पण तिने पापण्या किलकिल्या केल्या, सुंदर निळे डोळे दिसले आणि तिने अचानक ओठाचा चंबू केला.

मी शिपायाला ओरडून सांगितले की, ‘धाव आणि मेन रस्त्यावर टॅक्सी थांबव, मी येतोय हिला घेऊन…’ आम्ही दोघेही जिवाच्या अकांताने धावलो आणि टॅक्सीने सायन रुग्णालयात पोहोचलो. रक्ताचे डाग पडलेल्या माझ्या युनिफॉर्मकडे पाहात नर्सने मुलीला ताब्यात घेतले आणि साफसफाई करून चावणाऱ्या मुंग्या काढायला, डॉक्टरांना सहाय्य करायला सुरुवात केली. आता तिला औषध मलमपट्टी करून Incubator मध्ये ठेवावे लागेल, काही औषधे बाहेरुन मागवावी लागतील, असे सांगितल्याने मी शिपायाला तेथे थांबवले. माझे पाकीट त्याच्याकडे दिले आणि लागतील तेवढे पैसे खर्च झाले तरी मुलीला वाचवायचेच आहे, असे सांगितले आणि पेपरवर्कसाठी पोलीस स्टेशनला परतलो.

त्यादिवशी घरी गेल्यावर मी तिच्याबद्दल बोललो आणि बरी झाल्यावर आपल्या कुटुंबाची ती सदस्य असेल, असे सर्व कुटुंबानेच ठरवले.

तिसऱ्या दिवशी दुर्दैवाने अँटबाइट्समुळे ती नवजात परी गेली. मात्र तिचा माझ्या कुशीतला तो पाऊटरुपी ‘फ्लाइंग किस’ मी 26 वर्षांनीही विसरू शकलेलो नाही.

त्यामुळेच मी म्हणतो की मुलींचा पाऊट करण्याकडे नैसर्गिक कल असतो.

हेही वाचा – राजवैभवी मोर… तख्त-ए-ताऊस

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!