Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeअवांतरविमान थांबविले आणि पल्लवीने थेट घराकडे धाव घेतली...

विमान थांबविले आणि पल्लवीने थेट घराकडे धाव घेतली…

मंदार अनंत पाटील

माझ्या आणि पल्लवीच्या मनात तसेच आयुष्यात कायमचा ठसा सोडून गेलेला आमचा लिओ. मी प्राणीप्रेमी असलो तरी मांजर पाळायचा योग कधीच आला नव्हता. पण पल्लवीच्या माहेरी मनू नावाची मांजर होती आणि तिच्या कितीतरी आठवणी पल्लवी नेहमी सांगायची. मी एकदा सहजच जेम्स बोवेन लिखित ‘A street cat named Bob’ नावाचे सुंदर पुस्तक वाचले आणि इतका भारावून गेलो की, सरळ जाऊन लिओला घेऊनच आलो.

लिओला घरी आणले तो दिवस आषाढी एकादशीचा होता आणि आमचा विठोबा आमच्या घरी अवतरला. जिंजर म्हणजे तपकिरी रंगाचे अतिशय लोभसवाणे रुप लाभलेला आणि हाताच्या ओंजळीत मावेल इतका छोटा होता लिओ. घरी आल्यावर अगदी सगळं घर पालथं घालून आपली खोली लगेच ओळखली. पहिले काही दिवस तो आणि आम्ही एकमेकांचा अंदाज घेत होतो. पल्लवीशी तर इतकी जवळीक झाली की, शेवटपर्यंत तो फक्त पल्लवीचाच राहिला.

पहिले काही दिवस लिओची उठबस करण्यात गेले. लिओ इतका छोटा होता की, हा कसा वाढेल, हीच मला काळजी लागली होती. पण पल्लवीचा अनुभव, चिकाटी आणि जिद्द यामुळे बघता बघता छोटासा लिओ खूपच सुदृढ झाला. लहान असताना एकदा लिओने काहीतरी अभक्ष्य भक्षण केले आणि रात्री पल्लवीच्या उशाशी येऊन बस्तान मांडले. जणूकाही पल्लवीच्या कानातच स्वत:ची व्यथा सांगितली आणि पल्लवीने मला जागे करून लगेचच वेटची अपोईंटमेंट घेतली. वेळेत उपचार करून लिओला घरी आणले. त्यानंतर लिओ आणि पल्लवीची एकमेकांबरोबर जी नाळ जुळली ती कायमचीच. एक आगळं-वेगळं नातं फुलू लागले होतं. लिओपण अगदी हक्काने पल्लवीकडून सगळे लाड पुरवून घ्यायचा आणि पल्लवीकरिता तर तो पोटच्या मुलाइतका प्रिय होता.

मी लिओचे आरोग्य आणि सगळ्या संगोपनाची जबाबदारी घेतली. कारण वेटकडे जायचे म्हटले की, तो जो धिंगाणा घालायचा की त्याला सांभाळणे पल्लवीच्या आवाक्याच्या बाहेर होते. लिओची जरब इतकी होती की, त्याला ओळखणारे वेट देखील नेहमी सहाय्यक घेऊनच लिओची ट्रिटमेंट करीत असे. कित्येक वेळा लिओच्या नखांचा आणि दातांचा प्रसादही खाल्ला होता.

लिओचे आमच्या दोघांवर इतके प्रेम होते की, आम्ही कामावर गेले असताना हा हीरो आमच्या खोलीच्या बाहेर नाही जायचा आणि आम्ही घरी आल्यावरच दिलेले जेवण जेवायचा. असेच सहा महिने गेले आणि आम्ही आमच्या नवीन घरात स्थलांतरीत झालो. पहिले काही दिवस लागले लिओला नवीन वातावरणात रुळायला; पण नवीन घर लिओला फारच आवडले, कारण त्याला उंचावर बसायला आणि बाहेरची टेहळणी करायला खूप आवडायचे. आम्ही कामावर गेल्यावर लिओचा तो आवडता छंदच होता.

खिडकीतून आम्ही येताना दिसलो की, की लगेच खालपर्यंत येऊन लडिवाळपणे भेटायचे, असा त्याचा शिरस्ताच होता. त्याचे ते असे स्वागत करणे अजूनही लक्षात आहे. आजही घरी येताना नजर खिडकीकडे जाते आणि तो दरवाजात आपली वाटच बघतो आहे, असाच भास होतो. लिओच्या असण्याची आम्हाला इतकी सवय झाली होती की, दोनच वेळा लिओला वेटकडे एडमिट करायला लागले होते. तेव्हा घर खायला उठले होते. पहिल्या वेळेस फक्त अर्धा दिवसात लिओ घरी आला होता, नसबंदी करून. त्यामुळे लिओची तब्येत खूपच सुधारली.

नंतरची सहा वर्षं खूपच छान गेली… सुंदर आठवणींचा ठेवाच आहे तो! अनेक आठवणींपैकी एक सुखद आठवण मी नक्कीच नमूद करेन. 2018 साली मी आणि पल्लवी माझ्या भाचीच्या लग्नाकरिता मुंबई ला प्रथमच एकत्र राहणार होतो. लिओला कुठे ठेवायचे हा प्रश्न सतावत होता. शेवटी माझी एक सहकारी कॅरोलिनाला विनंती केली की, तिने तीन आठवडे आमच्या घरी येऊन लिओ सोबत काही काळ राहावे. तिनेही संमती दर्शविली. आम्ही थोड्या जड मनाने विमानतळाकडे निघालो. आम्ही वारंवार फोन करून लिओची विचारपूस करत होतो. लिओ बराच अपसेट आहे हे जाणवत होते, पण कदाचित आमची सवय झाली आहे म्हणून असेल कदाचित, असे वाटून आम्ही फ्लाइटमध्ये स्थानापन्न झालो. विमानचे उड्डाण व्हायला सुमारे 15 मिनिटे असताना कॅरोलिनाचा फोन आला की, लिओ अजिबातच राहात नाही. इकडे पल्लवीचे हदय गलबलले आणि लिओला शांत करण्यासाठी तडक घरी जाण्याचा निर्णय घेतला.

एखाद्या हिंदी सिनेमात शोभेल असाच प्रसंग घडला. पल्लवीने विनंती करून विमान थांबविले आणि धावतच घरी आली. तिला परत आलेली बघून लिओने आपला रुद्रावतार सोडला आणि गरीब गाय झाला. ती अख्खी रात्र मायलेकांनी एकमेंकांच्या कुशीतच काढली… जिव्हाळा आणि निस्सीम प्रेम काय असते आणखीन?

असा हा आमचा लिओ आषाढी एकादशीला आपल्या घरी आला आणि कृष्ण जन्माष्टमीला अनंतात विलीन झाला… एक कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण करून… अजूनही त्याची आठवण आली की मन हळवं होते. तो इथे आहेच आणि आपल्यावर लक्ष ठेवून आहे, असंच सांगून मनाची समजूत घालतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!