नितीन अ. गोखले
पुण्यातील एका रुग्णालयात माझ्या वडिलांच्या बेडजवळ बसलो होतो. त्यांना स्ट्रोक आल्यावर त्यातून बाहेर येण्यासाठी ते संघर्ष करत होते. माझ्या नजरेसमोरच ते होते. पण त्यावेळी भावनांचा कल्लोळ मनात सुरू होता… एकीकडे असहाय्यतेची भावना आणि दुसरीकडे जुन्या आठवणी. वैद्यकीय उपचारांशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे मी हतबल होतो. अशा परीस्थितीत मनात जुन्या आठवणींचे हिंदोळे सुरूच होते. कारण, 81 वर्षीय दादा (कितीही आधुनिकपणा असला तरी त्यांना ‘डॅड’ म्हणू शकत नाही) आणि माझे आजोबा यांच्यात खूप साम्य भासत होते. हेच आठवणींचे हिंदोळे माझे दोन्ही आजोबा, म्हणजे वडिलांचे वडील आणि आईचे वडील, यांच्यापर्यंत पोहोचले आणि मी भूतकाळातच गेलो.
सुरुवातीला मला प्रश्न पडला की असे का? नंतर माझ्या लक्षात आले की, माझ्या वडिलांप्रमाणेच, या दोन्ही आजोबांनी, माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, अमिट छाप सोडली होती. त्यांनी कधीही उपदेश केला नाही तर, बोले तैसा चाले असेच त्यांचे वर्तन होते. आजकाल बरेच ज्येष्ठ नागरिक फिल्मी स्टाईलने वागतात, त्याप्रकारे त्यांनी कधीही त्यांचे प्रेम आणि आपुलकी दाखवली नाही. पण जेव्हा जेव्हा मी अडखळलो, तेव्हा मला पाठबळ देण्यासाठी, माझ्या चुका दुरुस्त करण्यासाठी मदतीचा हात त्यांचा पहिला असायचा.
1971च्या युद्धानंतर, शालेय शिक्षणात खंड पडू नये, यासाठी मला जळगाव येथील आजी-आजोबांकडे पाठवण्याशिवाय वडिलांसमोर पर्याय नव्हता. कारण, तेव्हा दादा आसामच्या नागाव जिल्ह्यातील मिसा येथे तैनात होते. छावणीतील एकमेव शाळा बंद करण्यात आली होती. त्यातच सैन्याच्या सर्व तुकड्या युद्धावर गेल्याने सुमारे 33 किमीवर असलेल्या नागावमधील शाळेत जाणे शक्य नव्हते. आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी तिथे अतिरिक्त शक्तीमान ट्रक नव्हते. हे ट्रक स्कूल बसच्या तुलनेत आकाराने दुप्पट होते.
जळगावमध्ये गेल्यावर एक नवीनच समस्या उद्भवली. आधी मिशनरींच्या शाळेत शिकल्यामुळे, मला अचानक अशा शाळेत जावे लागले, जिथे सर्व विषय मराठीतच शिकवले जात होते! वयाच्या 10व्या वर्षी या बदललेल्या वातावरणाशी तोंड देत होतो, त्यातच आई-वडिलांच्या अनुपस्थिती… अशा परिस्थितीत निःस्वार्थ प्रेम करणारी आजी हीच माझी प्रमुख आधार होती. त्यावेळी मी वारंवार अडचणीत येत असे. त्याला दोन कारणे होती… एक म्हणजे, सुरुवाती-सुरुवातीला शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जात होते आणि दुसरे म्हणजे, आजोबांना खूप घाबरत असे. त्यांच्यासाठी शिस्त म्हणजे सर्वकाही होते. सकाळी ठरलेल्या वेळीच उठायचे; न चुकता स्तोत्रं म्हणायची; ठरलेल्या वेळीच जेवायचे. ते कडक शिस्तीचे होते आणि वय वर्षे 10 असलेल्या मला ती शिस्त आवडत नसे.
आजोबा कधी चिडले की, आजी आणि कधीकधी माझा धाकटा काका मला पाठीशी घालायचे. हा काका माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. नंतर, मी आजारी पडलो, टायफॉइड झाला होता. अनेक दिवस अंगात खूप ताप होता. माझी भूक कमी झाली होती. त्यातच आई जवळ असावी आणि तिच्या हातचे जेवायला मिळावं, अशी माझी खूप इच्छा होती…
त्यावेळी मी माझ्या आजोबांच्या मनाचा हळवा कोपराही पाहिला. ते रात्रंदिवस माझ्या उशाशीच बसून असायचे, तिथेच झोपायचे. माझी प्रकृती ठीक होईपर्यंत त्यांनी खूप काळजी घेतली. मी वेळेवर औषधे घेतो का, व्यवस्थित जेवतो का, यावर त्यांचे बारीक लक्ष होतं. माझी तब्येत सुधारू लागली, तेव्हा पौराणिक आणि ऐतिहासिक कथा तसेच आपल्या नोकरीतील काही किस्से सांगून माझे मन रमवायचे. (त्यावेळी ते इम्पीरियल बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले होते, जी नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून तिचे नामकरण झाले). आजारपणामुळे जवळपास महिनाभर घरी असल्याने आजोबांच्या या कथांमुळे रामायण, महाभारत आणि मराठ्यांच्या इतिहासातील बराचसा भाग मला समजला.
या काळात त्यांचे प्रेम आणि कर्तव्याची जाणीव कायम राहिली. ताप कमी झाल्यावर, त्यांच्या लक्षात आले की, जवळपास साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत मी चालत जाऊ शकत नाही. त्यावेळी आम्ही सर्वजण चालतच शाळेत जात होतो. म्हणून आजोबांनी एका बग्गीची व्यवस्था केली. टायफॉइडमधून बरे झाल्यानंतर महिनाभर मी बग्गीतून शाळेत ये-जा करत होतो आणि त्यावेळी राजेशाही थाट अनुभवत होतो. मी जणू काही राजकुमारच होतो. शाळेत माझा ‘भाव’ अचानक वाढला. माझ्यासोबतचे विद्यार्थी मला राजघराण्यातला असल्यासारखे वागवू लागले! आता जेव्हा मी या दोन वर्षांचा विचार करतो, तेव्हा तो काळ आयुष्यात किती महत्त्वाचा होता, हे मला जाणवते.
नव्याने झालेल्या मित्रांबरोबर मी खो-खो आणि कबड्डीपासून क्रिकेट आणि विटी-दांडूपर्यंत अनेक खेळ खेळलो. त्यांच्या घरीही जात होतो. माझे बहुतेक मित्र माझ्या परिसरातील आजोबांच्या मित्रांची नातवंडे होती. त्यामुळे ही सर्व मोठी मंडळी आमच्यावर ‘सामूहिक मालकी’ असल्यासारखे अधिकार दाखवत होती! म्हणूनच बरेचदा आम्ही त्यांच्या संध्याकाळच्या गेटटुगेदरला सामोरे जायचे टाळायचो. त्यांच्या समोर जाणे धोक्याचेच होते. कारण, प्रश्नांचा भडीमार करून आमच्या सामान्य ज्ञानाची अचानक चाचणी घेतली जायची!
एखाद्या दिवशी नशीब वाईट असेल तेव्हा, आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख वाचायला बसवायचे आणि एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले जायचे. आम्हाला तो शब्द माहीत नसेल किंवा समजला नसेल, तर आम्हाला लगेच इंग्रजी ते मराठी शब्दकोश आणण्यासाठी पिटाळले जायचे. नंतर तो शब्द शोधण्यास, त्याचा अर्थ समजून घेण्यास सांगितले जायचे. त्यानंतरच आमची खेळण्यासाठी सुटका व्हायची!
कॉम्प्युटरमधील स्पेलिंग ऑटो-करेक्टवर अवलंबून न राहता शब्दकोश वापरण्यावर मी भर का देतो, हे आता लक्षात आले.
दिवेलागणीच्या वेळेला, काहीही झाले तरी घरी परतायला लागायचे. संध्याकाळी शुभंकरोती-स्तोत्रं, त्यानंतर गणिताचे पाढे आणि काही संस्कृत श्लोक म्हणणे सक्तीचे होते! शाळेचा गृहपाठ करायचा. जेवणाची वेळ निश्चित होती तर, रात्री 9 वाजेपर्यंत झोपायला जायचे. पण अनेकदा झोपण्याऐवजी मी बाहेर येऊन काकासोबत बसायचो. कॉलेजमध्ये असलेला काका दर बुधवारी रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमाला ऐकत असे. हिंदी चित्रपट संगीताची गोडी मला तिथेच लागली असावी!
म्हणून त्या दोन वर्षांत माझ्या कोवळ्या मनाने भगवद्गीतेचे काही अध्याय, बिनाका गीतमालामधील गाणी आणि क्रिकेटची थोडी माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला! आणि हो, मराठीतच गणितं सोडवायला शिकलो… जी मी अजूनही मनातल्या मनात करत असतो!
1974च्या सुरुवातीला आजोबांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं मला अजूनही आठवते. ते त्यातून कधीच बरे झाले नाहीत. व्यक्तिमत्वाचा दरारा असलेले माझे आजोबा असहाय्य वाटू लागले…. माझ्या डोळ्यासमोर एका झटक्यात हे सर्व झाले. मी अधिकच गोंधळलो. पण मागे वळून पाहताना, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्या मनावर कायम कोरला गेला आहे, याची जाणीव होते. इतका तो अमिट आहे.
त्या आजोबांचा साधेपणा…
त्यानंतर साधारण सहा वर्षांनी माझ्या आईच्या वडिलांचा (त्या आजोबांचा) माझ्या त्यावेळच्या आयुष्यावर असाच मोठा प्रभाव पडला. तेव्हा पुण्यात शिक्षण घेत होतो, हॉस्टेलवर राहात होतो. आठवड्याच्या शेवटी घरी जाऊन आजोबांना भेटणं, असा शिरस्ताच होता. हे आजोबा म्हणजे, एक साधी सरळ व्यक्ती होती. ते शेतकरी, दूधवाला, व्यापारी अशा अनेक भूमिकांमध्ये मी त्यांना बघितलं. फारसे आर्थिक यश न लाभलेल्या सत्तरीतील या आजोबांनी आयुष्यभर संघर्ष केला. तर, मला त्यांच्यासारखी आशावादी व्यक्ती अजून भेटलेली नाही.
जेव्हा मी या आजोबांच्या संपर्कात आलो, तेव्हा मी तारुण्याच्या उंबरठ्यावर होतो. त्यामुळे बहुतांश गोष्टीबद्दल माझी गोंधळलेले मनस्थिती असायची. माझ्या त्या आजोबांनी याच टप्प्यावर माझ्यात मोठा बदल घडवला. त्यांनी मला वाईटातही चांगले कसे शोधायचे, ते शिकवले.
आयुष्य जसे असेल तसे स्वीकारतो, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा जाणीवपूर्वक लक्षात ठेवतो की, हा गुण त्या आजोबांकडूनच घेतला आहे! आयुष्यातील अडचणींमुळे ते कधीही निराश-हताश झालेले दिसले नाहीत. त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. माझी आई जेमतेम दोन वर्षांची असतानाच तिचे मातृछत्र हरपले. पण माझ्या आजोबांनी तीन मुलांना एकट्याने वाढवले. पत्नी नसल्याने ते एकाकी पडले होते. परिणामी, ते आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकले नाहीत.
माझी आई तर सांगतेच आणि मीही ते पाहिले आहे की, आजोबांच्या स्वभावात कधीही कटूता दिसली नही. वयाच्या सत्तरीत असतानाही त्यांच्यात दुर्दम्य आशावाद होता. 1980च्या सुरुवातीला, माझ्या कॉलेज जीवनात, जेव्हा प्रत्येक लहानशी गोष्ट आणि कोणताही धक्का माझ्यासाठी खूप मोठा वाटत असे, तेव्हा आजोबा मला फक्त भाजी मंडईत किंवा शेजारच्या गॅरेजमध्ये घेऊन जायचे. सर्वसामान्य लोक कसे जगतात, आव्हानांचा सामना कसा करतात, हे दाखवून मला प्रोत्साहन द्यायचे. इतक्या वर्षांनंतर जाणवते, यातून मी काय शिकलो? तर, आर्थिक परिस्थिती चांगली नसताना तसेच तुमच्यापेक्षा तुलनेत राहणीमान कमी स्तराचे असलेल्या लोकांचे जगणे पाहा आणि लक्षात ठेवा, तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्ही किमान एक चांगले जीवन जगत आहात!
आज दोन्ही आजोबा आता हयात नाहीत. त्या वाढत्या वयात त्यांचा माझ्यावर किती प्रभाव पडला, हे त्यावेळी जाणवले नाही. त्यांच्याबद्दलच्या या आठवणी जाहीरपणे मांडणे, त्यांना आवडले नसते, याची जाणीव आहे.