Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललित...असेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप

…असेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप

आराधना जोशी

साधारण पाच वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला तो मुंबईबाहेर थेट अहमदनगरला. अर्थात, ही गोष्ट मला मुलीकडूनच समजली होती. ‘आई, निधीला अहमदनगरला अ‍ॅडमिशन मिळाली. पुढच्या महिन्यात ती तिथे जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावी शाळेत येताना-जाताना आम्ही एकत्रच होतो. खरंतर, ती माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठी आहे. तिची, माझी इयत्ता वेगवेगळी असायची. ती एक वर्ष पुढे होती. पण तरी मोकळ्या वेळेत कसला धुडगूस घालायचो आम्ही. आता ती एकदम वेगळ्या गावात जाणार…’ मुलीची टकळी सुरू होती. आपली मैत्रीण आता पुढच्या शिक्षणासाठी वेगळ्या गावात आणि हॉस्टेलवर राहणार, हे माझ्या लेकीने सहजपणे स्वीकारलं होतं. इतकंच नाही तर, पुढच्या वर्षी आपणही शिक्षणासाठी लांब जाणार, हे वास्तव तिने अप्रत्यक्षपणे आम्हालाही बोलून दाखवलं होतं. अर्थात, यामागे तिचे काही ठाम विचार होते आणि आम्हालाही ते मनापासून पटले होते. एकीकडे, या सगळ्या घडामोडी घडत होत्या आणि अचानक आठवण झाली ती माझ्या नवऱ्याच्या एका मित्राची.

या मित्राने पहिल्यापासून मुंबईतच नोकरी केली होती. मात्र नंतर कंपनीने अचानक त्याची औरंगाबादला बदली केली आणि त्याच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं. मित्राची बायको आणि मुलगी त्याच्या या बदलीबाबत खूप सकारात्मक होत्या, पण त्याचे पालक मात्र सतत, ‘तू ही नोकरी सोड. दुसरी नोकरी बघ; पण मुंबई आणि मुख्य म्हणजे आमच्यापासून लांब जाऊ नकोस,’ असा सतत घोषा लावणारे होते. आपला पन्नाशीला आलेला मुलगा एकटा कसा राहणार, कुठे राहणार, काय जेवणार? याचीच चिंता त्या पालकांना होती. त्याची बदली होणं त्यांच्या पचनी पडत नव्हतं.

या दोन घटना लक्षात घेतल्या तर, पिढीनुसार विचारसरणी किती आणि कशी बदलत चालली आहे, ते सहज लक्षात येईल. आजच्या पिढीत ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ खूप सर्रास बघायला मिळते. नोकरी, शिक्षण किंवा इतर काही कारणांमुळे आपल्या घरच्यांपासून लांब दुसऱ्या गावात, राज्यात किंवा देशात राहणाऱ्यांची संख्या हल्ली वाढत आहे. खूप लहान वयातच स्वत:च्या करियरसाठी आपल्या पालकांना सोडून एकेकट्या राहणाऱ्या मुलांच्या (अर्थात, यात मुलीही आल्याच) मानसिकतेतही मोठे बदल होताना दिसत आहे. स्वत:च्या जबाबदारीवर आता सगळं निभावून न्यायचं आहे, ही भावना या कोवळ्या वयात त्यांना खूप काही शिकवून जाणारी असते.

आता आतापर्यंत आई-वडिलांच्या सुरक्षित, उबदार सावलीतून एकदम नव्या वातावरणात, परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करायचं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ ही संकल्पना खरंतर लग्नानंतर एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यासाठी वापरली जाते. पण पालकांपासून, कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्यांनाही तर याच प्रकारच्या भावनांचा सामना करावा लागतोच की! हे ‘लाँग डिस्टन्स’ दोन्ही बाजूच्या माणसांना खूप काही शिकवून जात असतं. मुळातच कोणत्याही नात्यात, कोणत्याही कारणांमुळे वेगवेगळं राहावं लागणं, हा प्रकार प्रचंड भयानक असतो. मात्र तरी आपण तो स्वीकारतो आणि चक्क त्याच्याशी Adjust ही होतो. अशावेळी कित्येक किलोमीटरचं हे अंतर नात्याच्या जडणघडणीत एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

घरच्यांची किंमत, आईच्या हातच्या साध्या, पण चवदार जेवणाची आठवण याच ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मधून समजून येते. असं म्हणतात की, शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा जास्त महत्त्वाची असते. पण ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये तुमच्यावर प्रेम करणारी माणसं तुमच्याबरोबर नसतात, फोन कॉलवर उपलब्ध असली तरी, अनेकदा वेळेची गणितं जुळत नाहीत, व्हिडीओ कॉलवर कधीही बोलता येऊ शकतं असं वाटत असतानाच, कदाचित ‘होम सिकनेस’ येऊन रडू फुटतं. पण आपण ‘होम सिक’ झालोय हे आपल्या प्रियजनांना कळलं तर, कदाचित ते अस्वस्थ होतील, या जाणिवेतून आपल्या भावना लपवून ठेवायला अनेकदा इथूनच शिकतो. असंच खूप काही गोष्टी शिकाव्या लागतात, सांभाळाव्या लागतात, Adjust ही कराव्या लागतात. या रिलेशनशिपमध्ये साध्या-साध्या गोष्टी स्वत:लाच मॅनेज कराव्या लागतात, पण ते करत असताना त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर तर होत नाही ना, याचंही भान ठेवावं लागतं. त्यासाठी सतत अलर्ट रहावं लागतं. अनेकदा ही तारेवरची कसरत सांभाळता येत नाही, तोल जाऊन नातेसंबंध दुरावतात.

काही वर्षांपूर्वी राधिका आपटे या अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि लंडनला राहणाऱ्या तिच्या नवऱ्याच्या (बेनडेक्ट टेलर) ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’वर भाष्य केलं होतं. भारतात अभिनेत्री म्हणून करिअर करणारी राधिका दर महिन्याला लंडनला आपल्या नवऱ्याबरोबर राहायला जाण्यासाठी धडपडत असते. तिचा नवराही तिला भेटायला भारतात येऊन-जाऊन असतो. मात्र, हा सगळाच अनुभव त्या दोघांनाही अत्यंत खर्चिक आणि थकवणारा वाटतो. दोन महागड्या शहरांमध्ये असणारं दोघांचं वास्तव्य आणि दोन घरं, त्यांचा खर्च, शिवाय एकमेकांना भेटायला जाण्यासाठी तिकिटांचा होणारा खर्च यामुळे अनेकदा साध्या साध्या गोष्टी घेताना खूप विचार करावा लागतो, असं राधिका आपटेने त्या मुलाखतीत सांगितलं होतं.

अर्थात, हे असं नातं जपणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. अशा वेळी एकमेकांबद्दल संशय निर्माण होणं किंवा एकमेकांबद्दल वाटणारी ओढ कमी होणं, असेही प्रकार घडण्याची शक्यता असते. म्हणूनच ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ फारशी टिकत नाही असं मानलं जातं. ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ ही संकल्पना जरी हल्ली समाजात ऐकायला मिळत असली तरी, ती खूप आधीपासून जगभरात बघायला मिळत होती आणि अजूनही आहे ती सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या रूपाने.

इतर ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’मध्ये होणारा संवाद आणि सैनिकांचा त्यांच्या कुटुंबीयांशी होणारा संवाद यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. काय बोलायचं, कसं बोलायचं, कधी बोलायचं याबाबत सैन्य दलाचे नियम अत्यंत कडक असतात. पत्र लिहून पाठवतानाही अनेकदा मजकूर तपासून मग ती पत्र रवाना केली जातात. फोनवर बोलतानाही मोजून-मापून बोलावं लागतं. अशा परिस्थितीत आपल्या भावना तशाच्या तशा व्यक्त करणे शक्य होत नाही. यातूनच अनेकदा सैनिकांच्या कुटुंबीयांना नैराश्य, हुरहुर, एकटेपणाची वाढत जाणारी भावना अशांचा सामना करावा लागतो.

आपल्याकडे मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आरोग्य बिघडण्यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ हे एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच या अशा नातेसंबंधांबाबत समाजात पुरेशी जागरूकता निर्माण होणं, ही काळाची गरज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!