सतीश बर्वे
प्रिय आईस,
तू आज जिथे असशील तिथे देवबाप्पा नक्की पोहोचवेल माझं पत्र, याची खात्री आहे मला.
विरेंदरबरोबर सुरू केलेल्या संसाराला 40 वर्ष पूर्ण झाली. पहिल्या दिवसापासून मी गृहिणी म्हणूनच वावरले माझ्या सासरी. आज तुझी दोन्ही नातवंडे कॉलेजला आहेत. त्या दोघांचं आणि विरेंदरचे रोजचं टाइमटेबल पूर्ण करताना नाकीनऊ येतात माझ्या.
तुझी सतत आठवण येते मला आजकाल आणि जीवाची घालमेल होते. कळत नकळत किती वेळा तुझ्या अवतीभोवती असण्याचा फायदा आम्ही करून घेतला, याचा विचार केला की, डोळे भरून येतात माझे.
आई, तू देखील आमच्या लहानपणी घराची आवश्यकता म्हणून नोकरी करायचीस. पहाटे उठून स्वयंपाक करून ऑफिस गाठायचीस. मी आणि कौस्तुभ दादा शाळकरी मुले होतो. सकाळची शाळा म्हणून साडेपाच वाजल्यापासून आमच्या मागे लागायचीस उठण्यासाठी. कित्ती राग यायचा तुझा तेव्हा. पाच मिनिटेसुद्धा अधिकची झोपून द्यायची नाहीस तू.
संध्याकाळी लोकलच्या प्रवासात थकून भागून आल्यावर देखील पदर खोचून ओट्याशी उभी रहायचीस. शाळेचा अभ्यास पूर्ण करून घेणं… दुसऱ्या दिवशीचं दप्तर भरून ठेवायला मदत करणं… सकाळी घर सोडायच्या आधी आमचे डबे, वॉटरबॅग भरून ठेवणे… आजोबांची औषधं टेबलावर काढून ठेवणं… एक का काम होतं तुला. पण नाही सगळी कामं वेळेत पूर्ण करून तू घरून निघायचीस.
पुढे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आमची कॉलेज सुरू झाली तेव्हा, तुला थोडी उसंत मिळाली. पण अभ्यास एके अभ्यास न करता आम्हाला अवांतर गोष्टी देखील यायला पाहिजेत, याकडे तुझा कटाक्ष असायचा. तुझ्या आग्रहाने मी पोहायला शिकले, भरतनाट्यम शिकले. दादा पोहायच्या आणि कराटे क्लासेसला जायला लागला.
हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं
कुठून आणायचीस तू एवढी ऊर्जा आणि उत्साह! सर्व नातेवाइकांना आम्हा दोघांचा फार अभिमान वाटायचा आणि आमच्या यशाचं तोंडभरून कौतुक व्हायचं. तेव्हा खूप छान वाटायचं. पण त्या यशात तुझा सिंहांचा वाटा आहे, हे आम्ही सहजपणे विसरून जायचो… पण तुझ्या मनात काय होतं, त्याबद्दल तू कधी बोलली नाहीस आम्हाला.
आई तू पुढाकार घेतला म्हणून मी आणि दादा अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंदांमध्ये भरीव कामगिरी करू शकलो. पोहण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत मला विरेंदर भेटला आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. या नवीन नात्यावरून तु नाराज होतीस हे दिसत होते मला. आधी अभ्यास पूर्ण करून पदवीधर होणं आणि नंतरच बाकी गोष्टी करणं, या तुझ्या मतावर तू ठाम राहिलीस.
सुदैवाने, विरेंदरला तुझा विचार आवडला होता, पण मीच बंडखोरी केली. त्यावेळी पहिल्यांदा तू माझ्या आयुष्यात लुडबूड करत आहेस, असं मी तुला उघडपणे सांगितले आणि तू उन्मळून पडलीस. पदवी परीक्षा दिली आणि तुझ्या तसेच बाबांची परवानगी न घेता आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह करून मोकळे झालो. विरेंदरवरच्या प्रेमाच्या कैफात तुझा आजवरचा त्याग मी क्षणांत कशी विसरुन गेले, याचा विचार करून आज माझे डोळे भरून आले, आई.
आई, आज तुझ्या भूमिकेत मी आहे. घरात नोकर-चाकर आहेत. स्वयंपाकघरात सगळ्या कामाला विद्युत उपकरणे आहेत. पण तरीही विरेंदरचे आणि तुझ्या नातवंडांचे सगळं करताना मी थकून जाते.
हेही वाचा – Mother and son : आईची कहाणी
आज उशिराने का होईना, पण तू आई म्हणून कोण होतीस याची सर्वार्थाने ओळख पटली आहे मला. न दमणारी, न थकणारी अशी आमच्या हक्काची होतीस तू. ‘आई हे दे… ते दे… हे सापडत नाहीये… ते कुठे गेलं…’ तुझ्यामागे आमचा ससेमिरा कायम असायचा. तू आमच्या आळशीपणावर रागवायचीस जरूर पण सगळं शोधून आमच्या हाती तूच आणून द्यायचीस.
आई, तू म्हणजे आमच्यासाठी मायेचा आणि ममतेचा बेअरर चेक होतीस कायम. आमच्या आयुष्याच्या बॅंकेत दिवसातल्या चोवीस तासांत कितीतरी वेळा आम्ही तो चेक जमा केला असेल याची मोजणी होऊच शकत नाही. पण तो चेक वटण्याएवढी शक्ती आणि ताकद आहे का तुझ्याजवळ? हा विचार आम्ही कधीच केला नाही. तो चेक कायम वटत गेला आणि आमची आयुष्य बहरत गेली.
आई आज हे पत्र वाचून देखील तू नक्कीच म्हणशील याची खात्री आहे मला की, “चल वेडाबाई कुठली!” तू जरी शरीराने दुरावली असलीस तरी, मनाने मात्र तू माझ्या अवतीभोवती असणार याची खात्री आहे मला. तू तुझं आयुष्य निवडलंस. आनंद वाटला मला आणि तुझ्या बाबांना. पण तुझ्या नवीन प्रवासात तू तुझ्या मूळ स्टेशनला विसरलीस, याचं दुःख झालं जरूर! पण तुझ्या सुखी संसारासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायला मी विसरले नाही.”
आई माझ्या कुटुंबाची देखील मी मायेचा बेअरर चेक झाली आहे आजकाल. फक्त तो चेक वटण्याएवढी शक्ती आणि ताकद मला मिळेल यासाठी तुझा सतत आशीर्वाद हवा आहे मला, आई.
आई तो आशीर्वाद तू जिथे असशील तिथून देत राहशील, याची खात्री आहे मला.
तुझीच लाडूबाई
हेमा