मागील लेखात आपण ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.
योगाभ्यासातील प्रार्थना
दैनंदिन योगाभ्यासात पुढील प्रार्थनांचा समावेश केला जातो :
- आरंभीची प्रार्थना
- अंतिम प्रार्थना
प्रार्थना म्हणण्यापूर्वी शरीर-मनाची तयारी आवश्यक आहे.
प्रार्थनेची पूर्वतयारी
पद्मासन, अर्धपद्मासन अथवा सहजासनात बसावे. हातांची ज्ञानमुद्रा अथवा ध्यानमुद्रा करावी. डोळे अलगद मिटून पाठीचा कणा ताठ ठेवावा. संथ श्वसन करावे.
आपण आता प्रार्थनेविषयी थोडक्यात माहिती घेऊयात.
आरंभीची प्रार्थना
योगाभ्यासातील आरंभ त्रिवार ओंकाराने केला जातो, हे आपण मागील लेखात पाहिले. त्रिवार ओंकार केल्यावर गुरुवंदना केली जाते.
गुरुवंदना
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
तस्मै श्री गुरवे नमः॥
अर्थ – गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्री गुरूंना मी त्रिवार नमन करतो.
अंतिम प्रार्थना
योगाभ्यासाची समाप्ती करताना अंतिम प्रार्थना म्हणतात. योगाभ्यासात सर्वसाधारणपणे गायत्री मंत्र, महामृत्युंजय प्रार्थना, ओंकार प्रार्थना, बलप्राप्तीसाठी प्रार्थना, विश्व कल्याण प्रार्थना, आत्मपरिचय प्रार्थना आणि तत्सम प्रार्थना म्हणतात. योग साधक आपल्या मनाने सप्ताहात दररोज म्हणावयास वेगळी प्रार्थना निवडू शकतात. उदाहरण म्हणून येथे ओंकार प्रार्थना देता येईल.
हेही वाचा – ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य
ओंकार प्रार्थना
ॐकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः॥
अर्थ – नित्यनेमाने ॐकार ध्यान केल्याने योग साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.
अंतिम प्रार्थनेनंतर एकादश ओंकार करतात.
प्रार्थनेचे मानसिक आरोग्य लाभ
साधकास प्रार्थनेतून पुढील मानसिक आरोग्य लाभ मिळतात :
- गुरुवंदन केल्याने मनातील गुरुप्रती असलेली श्रद्धा साधकास योगाभ्यासात खचितच उपयुक्त ठरते.
- प्रार्थनेमुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते.
- प्रार्थनेतून केलेल्या परमेश्वराच्या उपासनेतून मानसिक संतुलन आणि मनःशक्ती लाभते.
हेही वाचा – योगाभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
योग साधना करताना म्हणावयाच्या विविध प्रार्थना, त्यांचे अर्थ तसेच योगाभ्यासातून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
योगाभ्यासातील अशाच एका समाविष्ट विषयाच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सअॅप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


