Tuesday, February 24, 2026

banner 468x60

Homeललितआसपास वावरणारे… मुखवटे आणि चेहरे

आसपास वावरणारे… मुखवटे आणि चेहरे

पराग गोडबोले

एकदा ऑफिसमधून निघायला बराच उशीर झाला होता. लोकलचा प्रवास नकोसा वाटत होता म्हणून कॅब केली. आशिष डाXXरे असं नाव आलं… मराठी नाव. छान वाटलं. गाडी आली, बसलो, निघालो… छान गाडी होती, नवी वाटत होती. मान मागे टेकून थोडा सैलावलो. न झोपणाऱ्या, न थकणाऱ्या मुंबईला मागं टाकत आम्ही मुक्त मार्ग म्हणजे फ्री वेला लागलो वडाळ्याजवळ… आता गाडी सुसाट निघाली. मी पण थोडा ताजातवाना झाला होतो.

तेवढ्यात आशिषचा फोन वाजला… “मुंबईत आहे, बारा वाजतील घरी यायला. आल्यावर जेवेन. तू झोप, नको जागी राहूस माझ्यासाठी” म्हणून त्याने फोन बंद केला.

“बायको का?”

“नाही आई. रोज 10 वाजले की फोन सुरू होतात.”

मी म्हणालो त्याला, “अरे, सगळ्या आया सारख्याच. पिलाच्या काळजीनं व्याकुळ होणाऱ्या. तुझी आई काही वेगळी नाही…” हसला मनापासून. पटलं त्याला तंतोतंत.

हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…

“आज सकाळी सात वाजता घरून निघालो. ठाण्याचं भाडं, मग विमानतळ, परत कल्याण, मुलुंड तिथून वरळी आणि आता शेवटचं तुमचं भाडं… माझी स्वतःची गाडी आहे, स्वतःसाठी कष्ट करतो.”

दुसऱ्यासाठी कष्ट करणाऱ्या मला हे वाक्य मान खाली घालायला लावून गेलं. गाडीचं कर्ज लवकर फेडायचं आहे. सगळी माहिती अगदी धबधब्या सारखी वाहत होती… गडी रंगात आला होता.

मला म्हणाला, “दुपारचं मुलुंडचं भाडं भारी होतं. यांना माणसं नाही, भाडी लक्षात राहतात. मी विचारलं, काय भारी होतं?”

हेही वाचा – निर्णय… योग्य की अयोग्य?

तो सांगू लागला… “चार वाजता निघालो खडकपाड्याहून, एक मद्रासी भाडं होतं. कपाळावर ‘डेकोरेशन’ केलं होतं फुल्ल… निघाल्यावर थोड्याच वेळात मला म्हणाले, ‘जरा गाडी बाजूला घे. मी गाडी थांबवली. काका उतरून दिसेनासे झाले. दहा मिनिटे त्यांचा पत्ता नव्हता… आले घाईघाईने आणि सिगरेटचा तसेच दारूचा भपकारा आला. मला राग आला होता, पण शांत राहिलो… मद्रासी काका ‘टल्ली’ होऊन आले होते. निघालो आणि मुलुंडला आलो. मॅपवर एका शाळेचा पत्ता होता. गाडी आल्यावर खूप लोक त्यांचं स्वागत करायला आले, हार घातला त्यांना आणि आत घेऊन गेले… मी थांबलो होतो. कोणीतरी माणूस आला आणि माझे पैसे देऊन गेला… मी करंगळी वर करून याची  सोय आहे का विचारलं. त्यांनी मला दिशा दाखवली. गाडी उभी करून मोकळा करून आलो स्वतःला आणि परत येताना ते मद्रासी डेकोरेशन वाले काका समोर आले. मला आत बघून जरा चमकले. घाईघाईत मला बाजूला घेऊन गेले आणि कुजबुजत म्हणाले, “बोलना नहीं किसी को, चुपचाप बाहर निकल जाओ… मी म्हणालो, मेरे को क्या करने का? मैं जा रहा हूँ… आणि निघालो तिकडून.”

त्याने मला विचारात पाडलं. भारतीय राजकारणातले प्रसिद्ध मुखवटे आणि चेहेरे ठाऊक होते. आज हे ऐकलं आणि खऱ्या आयुष्यातले, माणसांचे मुखवटे आणि चेहेरे दिसले. खायचे आणि दाखवायचे दात खरंच एवढे वेगळे असतात? आज हा प्रसंग मला विचलित करून गेला खूप! खरंच, त्या शाळेतले सगळे लोक ‘का रे भुललासी वरलिया रंगा’ असे होते का? धवल मुखवट्यामागचा विद्रुप चेहेरा त्यांना दिसलाच नव्हता? असे कित्येक मुखवटे आपल्या अवतीभवती वावरत असतील सदोदित… आपण ओळखायला चुकतोय का त्यांना? खरंच विचारात टाकणारी ही गोष्ट आहे.

…आणि हो, ‘कपाळावरचं डेकोरेशन’ आणि ‘टल्ली’ हे शब्द माझ्या संग्रहात मोलाची भर घालून गेले…


मोबाइल – 9323277620

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!