Wednesday, February 18, 2026

banner 468x60

HomeललितBookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man's search for meaning

Bookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man’s search for meaning

डॉ. अस्मिता हवालदार

“बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये…” आपलं सर्वांचं आवडतं वाक्य. ‘आनंद’ सिनेमात कॅन्सरने मरणासन्न असलेला राजेश खन्ना हे वाक्य म्हणतो… आपल्याला कुठेतरी खोलवर पटलेलं असतं. पण बडी म्हणजे कशी? हा प्रश्न असतो. मृत्यू हातात हात घालून चालत असला तरी, त्याची भीती असतेच. जे जीवन आहे ते अर्थपूर्ण कसे जगायचे? किंवा त्याला अर्थ कसा प्राप्त करून द्यायचा, हाही मोठाच प्रश्न.

माणसाला अनंत काळापासून हा प्रश्न भेडसावत आहे – माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या अंगांनी झाला. जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणविद, दार्शनिक, तत्वज्ञानी आणि मानसोपचार तज्ज्ञ या सर्वांनी आपपल्या निष्ठेला, ज्ञानाला धरून उत्तर दिली आहेत. ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ अशा गाण्यांतून उमटलेला निराशेचा सूर तर ‘जीवनगाणे गातच रहावे’, ‘जिंदगी प्यार का गीत है…’ असे म्हणणारा जीवनावर प्रेम करणारा सूर…

या प्रश्नाचं उत्तर होलोकास्ट सर्व्हायवरकडून मिळालं तर… Mans search for meaning पुस्तकात लेखक व्हिक्टर फ्रेन्कल स्वानुभवातून या प्रश्नाचं उत्तर देतात. केवळ देत नाही सोदाहरण पटवून देतात… व्हिक्टरी फ्रेन्कल  यांच्या Mans search for meaning या पुस्तकाचे भाषांतर डॉ. विजया बापट यांनी केले आहे. या पुस्तकाच्या आजवर लाखो प्रती खपल्या आहेत. इंग्लिशमध्ये याच्या शंभर आवृत्ती निघाल्या आहेत. जगातल्या एकवीस भाषांतून याचे भाषांतर झाले आहे. त्यांनी जगभर 209 विद्यापीठांतून भाषणे दिली आहेत. लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे की, त्यांना जेव्हा विचारलं जातं की, अशा अभूतपूर्व यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ते सांगतात की, या पुस्तकाची विक्री माझे यश नसून जगातल्या दु:खाची अभिव्यक्ती आहे.

भगवद्गीतेचा कोर्स करताना प्राध्यापकांनी हे पुस्तक वाचायला सांगितलं होतं. भगवद्गीतेतले मानसशास्त्र आणि या पुस्तकातली लोगो थेरपी यांचे साम्य समजून घेण्यासाठी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे पुस्तक इंग्लिशमधून वाचले होते, नंतर भाषांतर वाचले. भाषांतर उत्कृष्ट झाले आहे. बोलीभाषेत लिहिलेले असल्याने समजायला सोपे जातेच, शिवाय लेखिकेने स्वतःच्या टिपा सुद्धा दिल्या आहेत.

व्हिक्टरी फ्रेन्कल यांचा जन्म ऑस्ट्रियामध्ये 26 मार्च 1905 रोजी झाला आणि मृत्यू 2 सप्टेम्बर 1997 रोजी झाला. ते न्युरोलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, तत्वज्ञानी लेखक होते. त्यांनी मानसशास्त्रातील लोगो थेरपी ही उपचार पद्धती शोधून काढली. लोगो थेरपी शब्दाचा अर्थ ‘अर्थ उपचार पद्धती’. ही अगदी संक्षिप्त स्वरुपात या पुस्तकात मांडली आहे. सिग्मंड फ्राईड आणि आल्फ्रेड अड्लर नंतर यांची ही पद्धती महत्त्वाची मानली जाते.

त्यांनी एकूण 39 पुस्तके लिहिली. Mans search for meaning हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांना 29 विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली. ‘द अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशन’ने  त्यांना ‘ऑस्कर फिस्टर पुरस्कार’ दिला.

 हे पुस्तक दोन भागांत आहे – पहिला भाग नाझी छळछावणीच्या अनुभवांचा आणि दुसरा लोगो थेरपीचा. पहिला भाग यात नसता तर दुसरा समजला नसता. लेखक व्हिएन्ना शहरात राहत असताना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू असल्यामुळे हिटलरने त्यांना पकडून छळछावणीत पाठवले. त्यांच्या आई-वडील, भाऊ आणि गर्भवती पत्नीला सुद्धा! तिथल्या अनुभवांचे बेचैन करणारे चित्रण यात आहे. आपण अनेक चित्रपटांतून उदा. Schindler’s list, The Pianist किंवा अनेक पुस्तकांतून नाझींच्या दुष्कृत्यांची वर्णने वाचली, पाहिली आहेत. या पुस्तकात लेखक त्याच्या परिस्थितीकडे, आसपासच्या माणसांकडे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहतो. त्याला अलिप्त, तटस्थ राहून कसा विचार करता आला? याचे आश्चर्य वाटत राहते; पण त्यांनी ही वेदना एक संधी आहे, असे समजून स्वीकारली. 1944 साली ते ऑशवित्झच्या दरवाजात उभे होते. त्यांचे सर्वस्व नाझींनी काढून घेतले होते. त्यांच्याकडे अंगावरच्या कपड्यांना सोडून काही नव्हते. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ असलेले व्हिक्टर तारांच्या कुंपणात बंदिस्त झाले होते. त्यांची ओळख उरली होती फक्त एक नंबर 119104. सगळे काही लुटले गेले होते. फक्त एक गोष्ट सोडून – जगण्याची इच्छा! ती आली कुठून? तीन वर्षं चार छळछावण्यांत राहूनही टिकून कशी राहिली? केवळ दृष्टिकोनामुळे!

त्यांनी माणसांचे दोन गट केले – परिस्थितीला सामोरे जाऊन टिकून राहिलेले आणि परिस्थितीपुढे हार मानलेले. छळछावणीत टिकून राहिलेले आणि मृत्यू पावलेले यांचे विश्लेषण त्यांनी केले आहे – माणसाची मन:स्थिती, त्याची आशा, निराशा, धैर्य, दुर्बलता आणि त्याची शारीरिक अवस्था, त्याची रोगप्रतिबंधक शक्ती यांचे नाते किती निकटचे आहे, हे ज्यांना माहिती आहे. त्यांनाच आशेचा दीप मालवणे हे शरीराला किती घातक असू शकते ते कळू शकेल.

हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा

भगवद्गीतेत अर्जुनविषाद योगात हेच सांगितले आहे. अर्जुनाची ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति अशी अवस्था झाली होती.

गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चै व परिदह्यते |

न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन:

असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याच्या मनाला उभारी दिली. थोडे कठोर शब्दही वापरले.

स्वत:च्या जीवनातील उद्दिष्ट शोधणे, ही माणसाच्या आयुष्यातील सर्वांत प्रबळ, प्राथमिक, जीवनयज्ञासाठी ठिणगी पुरविणारी प्रेरकशक्ती आहे, हा लोगो थेरपीचा सिद्धांत आहे. तत्त्वज्ञानी ‘नित्शे’ने म्हटले आहे की, ज्याला ‘कशासाठी’ जगायचे आहे, हे कळले तो ‘कसाही’ जगू शकतो!

लेखकाला त्या भयंकर परीस्थितीत त्याच्या जीवनाचा उद्देश सापडला होता. तो तिथे आला तेव्हा नाझींनी त्याने लिहिलेले मानसशास्त्रावरचे पुस्तक काढून घेतले, ते त्याला पुन्हा लिहायचे होते. मिळेल त्या कागदावर जेवढे आठवते तेवढे त्याने लिहून ठेवले. तसेच, आपल्या पत्नीबरोबर मनातल्या मनात सतत संवाद सुरू ठेवला. तिला भेटण्याची आस, हे सुद्धा जिवंत राहण्याचे एक कारण होते. त्यांनी, स्वत: मानसशास्त्रावर भाषणे देत आहे, असे स्वप्न पाहिले. इतर लोकांशी सतत संवाद ठेवला. त्यामुळे एकटेपणाची भावना कमी झाली. इथे मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ आठवले. अनन्वित अत्याचारांना झेलण्याचे सामर्थ्य भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, या उदात्त ध्येयाने दिले. त्या परिस्थितीत सुद्धा त्यांच्यातला कवी जागृत होता. त्यांनी भिंतीवर अजरामर काव्य लिहिले.

लेखक म्हणतो, माणसाचे दोनच वंश आहे सहृदय माणसे आणि निर्दयी माणसे. म्हणून त्याला छळछावणीतील अधिकाऱ्यांमध्ये देखील अधूनमधून माणुसकी न हरविलेल्या सहृदयी माणसांचे दर्शन व्हायचे.

नैराश्य, आक्रमक वृत्ती आणि मादक द्रव्याधीनता ही लक्षणे तरुण पिढीत दिसतात, कारण लोगो थेरपीच्या भाषेत अस्तित्वाबाबतच्या पोकळीतून (existential vaccum), जीवनातील अर्थहीनतेच्या भावनेतून ती निर्माण झाली आहेत. अस्तित्वाची पोकळी ही जगभरातली मोठी समस्या आहे. माझे जीवन उपयुक्त नाही, ही भावना माणसाला घेरते. सेवानिवृत्ती, वार्धक्यातील एकटेपणा, बेकारी ही आव्हाने पेलणाऱ्या लोकांत दिसते.

यावरचा उपाय सांगताना लेखकाने तीन मार्ग सांगितले आहेत – कृतिशील जीवन जगणे, आपल्या पलीकडील कुठल्यातरी उदात्त भावनांचा अनुभव घेणे किंवा दुसऱ्या व्यक्तीचा सहवास अनुभवणे, न टाळता येणाऱ्या दु:खाकडे पहायचा आपला दृष्टिकोन बदलणे. भगवद्गीतेत कर्मयोगात हेच सांगितले आहे. हतोवा प्राप्यसि स्वर्गं जित्वा वा भोग्यसे महिम…, असे सांगून अर्जुनाला प्रेरणा दिली. युद्ध करायचेच आहे कारण तो तुझा स्वधर्म आहे. त्याचे पालन करताना हारशील किंवा जिंकशील. हरलास तर मोक्ष मिळेल आणि जिंकलास तर राज्य मिळेल. म्हणून उठ, युद्ध कर. ‘तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः’ असे सांगून स्वधर्माची जाणीव करून दिली.

माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, तो त्याच्या कर्तृत्वामुळे. लेखकाने लिहिले आहे, आपल्याकडे असलेला शेवटचा ब्रेडचा तुकडा दुसर्‍याला देऊन स्वत: भुकेलेला राहिलेला माणूस माझ्या लक्षात राहिला आहे. एखाद्या कामाला आयुष्याचे ध्येय ठरवले तर, त्यासाठी आयुष्य पणाला लावण्यात इति कर्तव्यात आहे. असे ध्येय सापडणे, हीच परिपूर्णता आहे. यश, सत्ता किंवा आनंद यापेक्षा जीवन झोकून देऊ शकू असे ध्येय सापडायला हवे.

छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहान असतानाच फार मोठे ध्येय सापडले होते. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. याहून अर्थपूर्ण जीवन ते कोणते? ज्ञानेश्वर माऊली पसायदान मागताना म्हणतात –

दुरितांचे तिमिर जावो

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो

प्राणिजात

विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही प्रार्थना. त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने ‘जीवन ऐसे नाव’ आहे.

आपल्या आयुष्याला अर्थ नाही असे वाटत असेल तर, आसपासच्या इतर व्यक्तींमधले गुण ओळखून त्यांना उंची गाठायला प्रेरित करणे, मदत करणे हाही जीवनाचा अर्थ असू शकतो. एखाद्याला प्रेरणा देऊन आपले जीवन अर्थपूर्ण करता येते. जिजाबाईंनी शिवराय घडवले नसते तर, हिंदवी स्वराज्य निर्माण झालेच नसते.

लेखक प्रेमाची व्याख्या वेगळी करतो. त्यांच्या मते इतर व्यक्तींमधले खास गुण ओळखून त्यांचा उपयोग करून घेऊन यशस्वी होण्यासाठी मदत करणे हे प्रेम असते. आपण दुखद घटना, संकट टाळू शकत नाही. पण त्याचा त्रास करून घेणे, न घेणे हे आपल्या हातात असते. क्रिया आणि प्रतिक्रिया यामध्ये थोडी जागा असते, वेळ असतो. ती आपली असते. कितीही पारतंत्र्यात असलो, हतबल असलो तरी दृष्टीकोनाच्या निवडीचे स्वातंत्र्य आपल्याकडे असते. जे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा परिस्थिती बदलणार नसते तेव्हा स्वतःला बदलायचे असते. कवी मंगेश पाडगावकरांच्या किती छान ओळी आहेत –

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

तुम्हीच ठरवा.

परिस्थिती कशीही असो जगण्याला Yes म्हटलं कधी तर, अर्धी लढाई जिंकलेली असते.

एक सैनिक हिमालयात बर्फात जखमी होऊन पडला होता, त्याने जगण्याची आशा सोडून दिली होती. त्याला एक कागदाचा तुकडा सापडला. त्यावर पु.ल. देशपांडे यांचा खाद्यसंस्कृती लेख होता. तो वाचल्यावर त्याने ठरवलं… हे खाण्यासाठी तरी जगायचं!

हेही वाचा – कोसला… अस्वस्थ तरुणाईचा क्लोजअप

अशी एक प्रेरणा पुरेशी असते. ओ हेन्रीची The last leaf कथा आठवते? आजारी माणसाला खिडकीतून समोरच्या भिंतीतून उगवलेले एक झाड दिसत असते. त्याच्या मनाने घेतले असते की, त्याचे शेवटचे पान गळल्यावर मी मरणार…! त्याचा मित्र चित्रकलेत यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतो, पण यश हाती लागत नसते. त्याला हे जेव्हा समजते, तेव्हा रात्री शेवटचे पान गळल्यावर तो पानाचे चित्र तिथे काढतो. आजारी माणसाला पान दिसत राहते आणि हळूहळू त्याची तब्येत सुधारते. चित्रकाराच्या आयुष्यातले ते सर्वोत्कृष्ट चित्र असते कारण त्याने कोणाला तरी जीवनदान दिलेले असते.

वेदना सुद्धा ध्येय बनू शकते. वेदना हा शेवट नाही, सुरुवात असू शकते. आज मी जिवंत आहे, ते इतर कोणाला माझी गरज आहे म्हणून. काही उद्देश्य आहे, म्हणून आपले आयुष्य आहे, हा विचार ऊर्जा देणारा असतो. विमान अपघातात वाचलेली माणसे असेच समजतात की, त्यांना जीवन मिळाले आहे ते समाजासाठी. माणसाला परिस्थितीचा गुलाम बनायचे नसते तर, माणूस बनायचे असते, परिस्थितीवर स्वार व्हायचे असते.

लेखकाने एक प्रसंग लिहिला आहे. 1945 साली युद्ध संपले. सोविएत सैनिक जर्मनीत आले. लेखकाच्या छळछावणीत ते आल्यावर रेड क्रोसची गाडी आली. सगळे कैदी भराभर चढले आता त्यांची सुटका होणार होती. फक्त लेखक आणि आणखी एक माणूस उरला. त्यांना जागा मिळाली नाही. त्यांना वाटले की, जिवंत राहण्याची संधी गेली. पण थोड्या दिवसांनी समजले की, त्या गाडीतल्या लोकांना दुसरीकडे नेऊन जिवंत जाळले. लेखकाला तेव्हा जाणवले की, त्याच्या जीवनाचे खास उद्दिष्ट आहे.

सुखी होण्याचा सल्ला दिला जातो. पण लेखक म्हणतो, सुखाचा पाठपुरावा करता येत नाही. सुखी होण्यासाठी माणसाकडे कारण लागते. माणूस सुखी होण्यासाठी लागणाऱ्या कारणाच्या शोधत असतो. आयुष्याचा अर्थ समजला की, सुख मिळते आणि दुःखाशी सामना करण्याचे बळ मिळते.

पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा परिचय दिला आहे. त्याने किती मोठे कार्य केले आहे, हे समजते. त्याला विचारले की, तुमच्या जीवनाचा उद्देश काय? तेव्हा त्यांनी सांगितले, इतरांना जीवनाचा उद्देश समजून देणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे.

पुस्तक दुसऱ्यांदा वाचताना माझाही दृष्टीकोन बदलला होता. अधिक समजून उमजून वाचायचा प्रयत्न केला. सकस, सकारात्मक दृष्टीने अर्थपूर्ण जगण्यासाठी दृष्टीकोन देणारे हे पुस्तक वाचायला हवे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!