मंदार अनंत पाटील
आज ‘लंडन आय’ आणि मत्स्यालय बघायचे नियोजित केले होते. थेम्स नदीच्या काठावर उभारलेले जायंट व्हिल आणि लगतच असलेली वेस्टमिन्स्टर ऐबी, लंडनमधील प्रसिद्ध असे घड्याळ आणि लागूनच असलेले मत्स्यालय असा सगळा जामानिमा आहे. देश-विदेशातून हजारो लोक इथे कायम गर्दी करतात. वेळेनुसारच आम्ही पोहोचलो आणि रांगेत साधारण 15 मिनिटे उभे राहिल्यावर लगेचच प्रवेश मिळाला. ‘लंडन आय’ साधारण हळूहळू वर जाते, त्यामुळे सभोवतालचा परिसर सावकाश बघता आला आणि अनेक प्रेक्षणीय गोष्टी दिसल्या.
यथावकाश ‘लंडन आय’ची फेरी संपली आणि मग एक छोटासा लंच ब्रेक घेऊन लंडन एक्वेरियमकडे प्रस्थान केले. मानवनिर्मित पण अतिशय उत्तम आणि सुखसोयींनी अद्यावत हे मत्स्यालय. आत शिरतानाच देवमासा जातीचे मासे असलेला टँक होता… त्यावरून चालत जाताना वाटणारी भीती आणि धीरगंभीर वातावरण… एका वेगळ्याच जगात गेल्याचा भास होत होता. हळूहळू अनेक दालनात फिरताना विविध जातीचे मासे आणि त्यांची माहिती वाचायला-पाहायला मिळत होती. आणखी थोडे पुढे गेल्यावर शार्क जातीचा मासा आणि बरोबर एक मोठे कासव असा एक टँक दिसला. या जातीचा मासा असा मत्स्यालयात सहसा दिसत नाही; पण टँकची ठेवण आणि आतले वातावरण समुद्रात असते तसेच होते. एक धीरगंभीर लाटांचे संगीत वातावरणाची गंभीरता वाढवत होते. तिथे काही फोटो आणि व्हिडीओ काढून एका टनेलमधून पेंग्विनच्या दालनात गेलो. तिथे तर साक्षात अंटार्टिकाची निर्मिती केल्याचा भास होत होता. आतले तापमान तितकेच नियंत्रित केले होते. एक काळजी घेणारी मुलगी त्या पेंग्विनना एक-एक करून मासे देत होती आणि तेही हुशार मुलांप्रमाणे आपापल्या संधीची वाट बघत उभे होते. तिथे थोडावेळ रेंगाळून काढता पाय घेतला. रमतगमत मग गिफ्ट शॅापमध्ये आलो. तेथे काही स्मरणिका विकत घेऊन घरी परत आलो. एक ‘टुरिस्ट आकर्षणा’ला भेट दिल्याचे समाधान होते.
आईला नानाविध ब्रिटिश पदार्थ खायला घालायचा पल्लवीने सपाटाच लावला होता. विविध प्रकारचे चीज, चायनीज फूड अर्थात शाकाहारी, क्रोसान आणी ओरिएंटल फूडची चवपण चाखायला मिळाली आणि काही काही पदार्थांना पसंतीची दाद मिळाली.
श्रावण महिन्याच्या धामधूमीत आज लंडन ब्रीजची सहल नक्की केली होती. आईकरिता लंडन ब्रीजच नव्हे तर, ग्लास वॅाकचे सरप्राइज अरेंज केले होते. ग्लास वॅाक म्हणजे लंडन ब्रीजच्या 40 किलोमीटर वरती काचेचा पूल बांधला आहे. त्यावरून चालताना खाली लंडन ब्रीज बघता येतो. आई तर पहिल्या वेळेला ग्लास ब्रीजवर चालायलाच तयार होईना! तिला समजावताना माझी तारांबळ उडाली आणि हसूही आवरेना! तिथे लहान-सहान मुले अगदी निरागसपणे बागडत होती आणि उंचीवरून खाली माणसे आणि वाहाने अगदी मुंगीप्रमाणे भासत होती. तिथेच लंडन ब्रीजची बांधणी आणि इंजिनियरिंग यावर विशेष माहितीपट दाखवत होते. बरीच उपयुक्त माहिती आणि लंडन ब्रीजचे मेकॅनिझमसुद्धा बघायला मिळाले. हा लंडन ब्रीज म्हणजे मानवनिर्मित एक अचंबित करणारा प्रचंड आणि अद्भुत असा अविष्कार आहे. इंग्लंडमधील आणखी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बघणे पार पडले. परत येताना आईला सॉफ्टी आईस्क्रीम खाऊ घातले आणि शेवट गोड झाला.
क्रमश: