आराधना जोशी
मुंबई आणि परिसरात राहणाऱ्यांना लोकल ट्रेन किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याची गरज नाही. सकाळ आणि संध्याकाळच्या लोकल या अनेकांचे एक कटुंबच बनले आहे. पण स्मार्टफोनने यात बिब्बा घातला आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वेगवेगळ्या कारणांनी मुंबईतल्या लोकल ट्रेनचा प्रवास मी करतेय. गेल्या काही वर्षांपासून त्यात नियमितता नसली तरी, पूर्णपणे खंडही पडलेला नाही. त्यामुळे लोकल प्रवास आणि त्यातले किस्से यांचा प्रचंड साठा माझ्याकडे जमलेला आहे. पण आजचा लेख यावर आधारलेला नाही. तो आहे मोबाइल फोन संस्कृतीवर. आता प्रश्न असा आहे की, लोकलचा आणि मोबाइल फोनचा काय संबंध? खूप लहानपणापासून लोकलमधून जो प्रवास मी केलेला आहे, त्यावेळी सोबत अर्थातच आई किंवा बाबा असायचे. मग गाडीत झोप येऊ नये म्हणून 2 ते 30 पाढे म्हणून घेण्याची पद्धत माझ्या बाबांनी सुरू केली. यात माझ्या पाढ्यांचा पाया पक्का झालाच, पण त्याचबरोबर रोज त्याच लोकलने प्रवास करणाऱ्या कितीतरी जणांशी ओळखही झाली (ट्रेनमध्ये सकाळी 6 वाजता पाढे म्हणणं त्यावेळी जरा चमत्कारिकच होतं), ती ओळख वाढत गेली आणि ती नंतर पक्कीही झाली.
शाळेनंतर प्रवास घडला, तो पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात जाताना. पण तेव्हाही वाचायला कायम एक पुस्तक असायचं आणि रोजच्या ओळखीच्या बायकांशी गप्पा मारायला तोंड. नंतर नोकरीच्या निमित्ताने अनेकदा रात्री शेवटची गाडी किंवा पहाटे पहिली गाडी पकडून घरी जाण्यासारखे प्रकार सुरू झाले. त्यावेळी गाडीतली गर्दी एकदम वेगळी असायची. बारमध्ये काम करणाऱ्या अनेकजणी त्यावेळी गाडीत असायच्या आणि त्यांच्या गप्पांमधून एक वेगळीच दुनिया माझ्यासमोर उघडत जायची. त्यावेळी मोबाइल फोन नव्हता. त्यामुळे गाडीत बसल्यावर गप्पा हा विरंगुळा असायचा. हल्ली मात्र गाडीत ज्याच्या- त्याच्या हातामध्ये स्मार्टफोन, प्रत्येकाच्या माना खाली आणि ईअरफोन लावलेले. गाडीतल्या इतरांशी फारसा संवाद नाहीच. झालाच तर, तुझ्याकडे कोणता नवीन सिनेमा आहे, गाणी आहेत आणि ती वेगवेगळ्या अॅप्सच्या मदतीने एकमेकांना देणं… बस् इतकंच!
हेही वाचा – प्रसिद्धी मिळविण्याचा शॉर्टकट
काही दिवसांपूर्वीच कामासाठी जाताना सिग्नलला अवघ्या मिनिटभरासाठी रिक्षा थांबली. शेजारीच बाईकवर एक तरुण मुलगा होता. त्या अवधीतही त्याने चटकन मोबाइलवर काही नोटिफिकेशन्स चेक केल्या. हे बघितल्यावर प्रश्न पडला इतकं काय महत्त्वाचं त्यात होतं? आपण कायम ऑनलाइन राहणं, हे एक व्यसन बनत चाललं आहे का? प्रश्न स्मार्टफोनच्या प्रेमात पडण्याचा किंवा त्याचं व्यसन लागण्याचा नाही. पालकांनी स्मार्टफोन वापरू न दिल्याने किशोरवयातील मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना सतत कानावर येतात. त्यामुळे स्मार्टफोनचं व्यसन किती धोकादायक बनू शकते, याची चर्चा होऊ लागली आहे. याचबरोबरीने स्मार्टफोन वापराच्या ‘एटिकेट्स’चा म्हणजेच शिष्टाचाराचा मुद्दा आहेच.
वाचून आश्चर्य वाटलं? हो, स्मार्टफोन वापरायचे शिष्टाचार आहेत! परदेशात या शिष्टाचारांच्या पालनासाठी वेगवेगळ्या मोहिमा सुरू आहेत आणि वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांपर्यंत अनेकांनी या शिष्टाचारांची गरज नमूद केली आहे. हे शिष्टाचार फार कठीण नाहीत. जिथे सूचना असेल तिथे मोबाइल ‘सायलेंट मोड’वर ठेवणं, बैठक, सभांमध्ये फोनचा वापर टाळणं, समोरची व्यक्ती बोलत असताना फोनमध्ये डोळे खुपसून न राहणं, फोनवर मोठ्या आवाजात न बोलणं, आपल्या मोबाइल कॅमेऱ्यातून काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी त्या फोटोंमध्ये असलेल्या इतरांची परवानगी घेणं असे अनेक ‘एटिकेट्स’ यात समाविष्ट आहेत आणि ते अमलात आणणं हे मानवाच्या सभ्यपणाचं प्रतीक आहेत. पण दुर्दैवाने याकडं कोणीच गांभीर्याने पाहात नाही. याउलट जिथे ‘मोबाइल वापरू नका’ अशी सूचना असते, तिथेच तो हटकून वापरणं शौर्याचे लक्षण समजलं जातं. सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर मोठ्या आवाजातील गाणी किंवा व्हिडीओंना मनाई आहे. पण अनेक महाभाग असे असतात की, ईअरफोन न वापरता, बेधडक रील्स किंवा शॉर्ट फिल्मस् पाहतात आणि सहप्रवाशांची गैरसोय करतात. विमानात बसल्यानंतर उड्डाण करण्यापूर्वी ‘सीटबेल्ट लावा आणि मोबाइल बंद करा’ अशी सूचना दिली जाते. त्यानंतरही अनेकांची बोटं मोबाइलवर फिरताना दिसतात आणि जेव्हा विमानाचं लँडिंग होतं तेव्हा, वैमानिकाची सूचना येण्याआधीच मोबाइल कानाला लागलेले दिसतात. एकूणच या शिष्टाचारांचा आपण ‘बॅण्ड’ वाजवला आहे.
या अशा स्मार्टफोनच्या वापराबाबत नियमन करणारे किंवा त्याच्या अवाजवी वापरावर निर्बंध आणणारे कायदे अजून तरी कोणत्याही देशात बनलेले नाहीत. फ्रान्स सरकारनं शाळांमध्ये स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापराला पूर्णपणे मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. त्या देशात 12 ते 17 वर्षं वयोगटातील 90 टक्के मुलामुलींकडे मोबाइल आहेत. वर्गात बसलेले विद्यार्थी जर स्मार्टफोनमध्येच डोके खुपसून बसणार असतील तर, शिक्षकांनी शिकवायचं कोणाला? या समस्येतून तो कायदा निर्माण झाला. पण त्याविरोधातही निषेधाचे सूर उमटलेच. अमेरिकेतही सार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापरताना पाळायची नियमावली बनविण्यात आली आहे. मोबाइलधारकांनी काय करावं आणि काय करू नये, याबद्दल त्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
भारतासह सर्वच देशांत वाहन चालवताना मोबाइल वापरावर बंदी आहे. भारतात ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास दंड आकारला जातो. शिवाय, चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबितही केला जाऊ शकतो, असा नियम आहे. अलीकडच्या काळात पोलिसांनी काही प्रकरणांत दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. काही वेळा तर कायद्याचे रक्षक असलेले पोलीसच हा नियम मोडताना दिसतात. वाहन चालवताना मोबाइल वापरणं किती धोक्याचं ठरू शकते, हे नव्यानं सांगायची गरज नाही.
चित्रपट, नाटकाचे शोज सुरू असतानाच अनेकदा मोबाइलची चित्रविचित्र आवाजातली रिंग खणखणीत आवाजात वाजते. त्यामुळे इतर प्रेक्षकांसाठी निर्माण झालेला व्यत्यय कमी की काय, म्हणून फोन उचलून मोठमोठ्या आवाजात बोलणारेही महाभाग असतात. मध्यंतरी नाटकाचा प्रयोग सुरू असताना सतत वाजणाऱ्या मोबाइलमुळे कलाकारांनी प्रयोगच थांबवल्याचे प्रकारही घडले होते. ऑफिसच्या मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन सुरू असताना मोबाइलशी चाळा करणे म्हणजे विरंगुळाच समजलं जातं.
ही झाली सार्वजनिक उदाहरणं. पण घरातही कोणी आपल्याशी बोलत असताना मोबाइलकडे बघतच त्या व्यक्तीशी संवाद साधला जातो. जेवत असताना अर्ध लक्ष टीव्हीकडे तर अर्ध लक्ष मोबाइलच्या स्क्रीनवर, हेही ‘मॅनर्स’ नसल्याचंच लक्षण आहे.
महाविद्यालयातही एक लेक्चर संपून दुसरं लेक्चर सुरू होईपर्यंतच्या दोन मिनिटांच्या काळात खिशातून मोबाइल काढून मेसेज वाचले जातात, त्यांना रिप्लाय केले जातात. लेक्चर्स संपल्यानंतर हे विद्यार्थी याच स्मार्टफोनवर गेम खेळत किंवा एखादा चित्रपट बघत रस्त्यातून चालायला लागले की, आजूबाजूचं भान विसरतात. आपण कुठे आहोत, का आहोत, याचाही त्यांना विसर पडतो, असा शिक्षक म्हणून माझा पूर्वीपासूनचा अनुभव होता. आताही त्यात फार बदल झाला नसेलच याची खात्री आहे. आपला मुलगा किती साधा सरळ आहे, हे मुलीकडच्यांना पटवून देताना अनेकदा सांगितलं जायचं की, ‘मुलगा कोणाच्या अध्यात नाही की मध्यात. मान खाली घालून जातो, मान खाली घालून येतो. कोणा मुलीकडे मान वळवून तर जाऊ द्या, पण नजर उचलूनही बघत नाही.’ हल्लीचे पालकही हीच वाक्य म्हणतात, पण वेगळ्या संदर्भात. ‘मोबाईलमध्ये घातलेली नजर वर उचलून बघायलाच आमच्या मुलांना जमत नाही,’ असं हल्ली म्हटलं जातं. एक विनोद म्हणून जाऊ दे; पण खरंच आपल्याशी समोरची व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीनं वागते तेव्हा आपल्याला या शिष्टाचाराचे महत्त्व कळतं. त्याऐवजी सर्वांनीच हे ‘एटिकेट्स’ अमलात आणले तर, अपघात आणि अपमान दोन्हीही टाळता येतील.