Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeअवांतरआयुष्य... अगदी सरळ रेषेत!

आयुष्य… अगदी सरळ रेषेत!

सुनील शिरवाडकर

दारावर टकटक झालं म्हणून मी दार उघडलं. समोर लॉण्ड्रीवाला उभा होता. हातात दोन तीन पिशव्या… त्यात इस्त्री केलेले कपडे.

मी हिला हाक मारली, “अगं, लॉण्ड्रीवाला आलाय… काही कपडे द्यायचे आहे का?”

हिने आतून कपड्यांचा गठ्ठा आणला, तो धोब्याला दिला. इस्त्री केलेले कपडे ताब्यात घेतले आणि मोजले… त्याचं काय बिल झालं ते ट्रान्स्फर केले. मी दरवाजा बंद केला आणि आत आलो.

सहजच विचार मनात आला. हा माणूस धोब्याचा व्यवसाय करतो. लॉण्ड्री वगैरे शब्द आत्ताचे. मूळ शब्द धोबीच! तर, हा धोब्याचा धंदा किती जुना आहे ना! अगदी रामायणात पण धोब्याचा उल्लेख आहे. गुरुचरित्रात पण आहे! कपडे धुण्याचा हा व्यवसाय खूप जुना… पण त्याकाळी इस्त्री करत असतील?

जुन्या लोकांकडून ऐकलेलं, अमुक अमुक हे त्यांची फार गरीबी होती.. इस्त्रीला पण पैसे नसायचे. तांब्यात पेटलेले निखारे घालून इस्त्री करायचे वगैरे… मी तर इस्त्रीचे कपडे वापरायला सुरुवात केली ती कॉलेजला जायला लागल्यावर. शाळेत असताना फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शर्ट, चड्डीवरून इस्त्री फिरवली जायची. मग कॉलेजला जायला लागल्यावर मीच माझी शर्ट, पँट इस्त्री करायला लागलो.

कपडे लॉण्ड्रीत टाकण्याची वेळ कधीतरीच यायची. लग्न कार्य वगैरे असलं तर! एबीसी लॉण्ड्रीत कपडे टाकायला जायचो. तिथला माणूस प्रत्येक कपडा उलगडून बारकाईने बघायचा. कुठे फाटला आहे का? कुठे काही डाग आहे का? असला तर त्याचे वेगळे पैसे होतील का? कुठे रफू करायचं का?… सगळं बघून मग पावती करणार.

हेही वाचा – तरंगिणी… संसारात राहून संन्यस्त जीवन

मग चार दिवसांनी पावती घेऊन जायचं… ती पावती घेऊन तो आत जायचा… हॅंगरला सतराशे साठ कपडे लटकवलेले, त्यातून तो नेमकेपणाने आपले कपडे घेऊन यायचा. मोठ्ठा ब्राऊन पेपर काऊंटरवर अंथरायचा… त्यावर कपड्यांचा गठ्ठा… मग कुठुन तरी दोऱ्याचं टोक पकडायचा आणि व्यवस्थितपणे तो गठ्ठा बांधायचा. एखादं लहान मुलं हातात घेऊन आपण सांभाळून घेऊन जातो… तसं ते कपडे मी घरी घेऊन जायचो.

आमचे दादा, म्हणजे वडील कपड्यांच्या बाबतीत फार काटेकोर. पॉपलीनच्या कापडाचा शर्ट, त्याच कापडाचा पायजमा… आणि गांधी टोपी. त्यांचे कपडे इस्त्रीसाठी नेहमी लॉण्ड्रीतच असायचे. टोपी खादीची. ती खादी पण ठरलेली. चांदवडकर लेनमध्ये खादी भांडार आहे, तिथे ते जायचे. त्यांना कुठल्या प्रकाराची खादी हवी असते, ते तेथील माणसांना माहीत होतं. कधी ती स्टॉकमध्ये नसायची, मग चार दिवसांनी ते परत जायचे.

खादीचं ते पांढरं कापड घरी आणलं की, एक रात्र पाण्यात ठेवायचं. सकाळी दोरीवर वाळत टाकायचं… मग त्याच्या टोप्या शिवायच्या. त्यांचा शिंपी ठरलेला होता, असंच घरात शिवणकाम करणारा होता तो!

आता टोपीत कसले आले माप? पण नाही… दादांना ते पटायचं नाही. पहिले सॅम्पल म्हणून तो एक टोपी शिवायचा… दादांना आणून दाखवायचा‌… दादा ती घालून बघायचे… ‌इंचपट्टीने लांबी, रुंदी, उंची बघायचे. पुढे असणारं टोक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे! त्याला दिवाल म्हणत. ती दिवाल अगदी त्यांना हवी तशी लागायची. थोडेफार फेरफार करून मग ते फायनल करायचे.

दुसऱ्या दिवशी टोप्या शिवून तो शिंपी यायचा. दादा एकदम डझनभर टोप्या शिवायचे. त्याची धुलाई, इस्त्री घरीच. त्यांचं टोप्यांना इस्त्री करणं बघत रहावं असं!

पांढऱ्या शुभ्र टोप्या ते घेऊन बसायचे… सगळ्या डझनभर… त्याला पाणी मारून ठेवायचे. टोपीला तीन घड्या असतात… मग एक एक स्टेप… त्या ओलसर टोपीवरून इस्त्री दाबून फिरवली की, अशी वाफ यायची! त्याचा एक वेगळाच वास असायचा. मग एक एक घडी… शेवटी पूर्ण दाब देऊन इस्त्री फिरवायचे. खास करून पुढच्या टोकावर… ते टोक खूप महत्त्वाचं.

हेही वाचा – गोलू आणि गोदाकाठची रथयात्रा

अशा डझनभर टोप्या इस्त्री झाल्या की, त्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कपाटात ठेवायचे. दर दोन दिवसांनी संपूर्ण ड्रेस बदलायचे. सकाळी देवपूजा झाली की, ते देवदर्शन करण्यासाठी, ‌भाजी आणण्यासाठी बाहेर पडायचे. पांढरा शुभ्र पायजमा… शर्ट आणि टोपी. ती टोपी डोक्यावर ठेवायचे. कपाळावर गंधाचा लाल टिळा… आरशासमोर उभे रहायचे… टोपीची पुढची बाजू… त्यांच्या भाषेत ‘दिवाल’… एकदम सरळ हवी! अगदी नाकाच्या सरळ रेषेत.. .एकदा मान डावीकडे फिरवायचे… ‌‌एकदा उजवीकडे.. त्यांच्या दृष्टीने ती केवळ कडक इस्त्री केलेली टोपी नव्हती तर, तो एक शिरपेच होता!

त्या काळातील पिढीचं जगणं असंच होतं ना, स्वच्छ… कुठेही डाग नसलेलं… इस्त्री केल्यासारखं प्लेन… आणि डोक्यावरच्या टोपीसारखं सरळ… एका रेषेत असलेलं…!

मोबाइल – 9423968308

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!