Wednesday, April 30, 2025
Homeललितसफर... 83 वर्षांच्या आयुष्याची

सफर… 83 वर्षांच्या आयुष्याची

स्नेहल अ. गोखले

भूतकाळातील काही अनुभव लिहून ठेवण्याचा विचार मनात तरळला. ‘आठवणी दाटतात धुके जसे पसरावे’ अशी अवस्था झाली आणि असंख्य आठवणींची रीघच लागली. पण काय काय म्हणून लिहायचं? मागे वळून पाहताना, आयुष्याच्या पटाचे बालपण, तारुण्य आणि आताचे वार्धक्य.. असे तीन भाग केले.

आम्ही नारायण पेठेत श्री मोदी गणपतीपासून आत, भानुविलास आणि विजय टॉकीजच्या मधे, कॉमनवेल्थ कॉलनीत राहात होतो. शहरात असूनही नारळाची झाडे, नीरव शांतता, सात बंगले होते. आम्ही भाडेकरू होतो, पण शेजारी असणारी माणसे खूपच प्रेमळ आणि साधी होती. खास उल्लेख म्हणजे श्रुती मंगल कार्यालयाचे आपटे, गुप्ते, साळवेकर यांनी आमच्यावर खूप माया केली. कदाचित आई नसल्यामुळे अधिकच. मैत्रिणी आसपासच राहात असल्याने, झाडे खूप असल्यानं सूरपारंब्या, डबा ऐसपैस, लगोरी, लंगडी, ठिकरी असे अनेक आम्ही खेळत असू. मैत्रिणीचेच थिएटर (भानुविलास) असल्याने मराठी, हिंदी, इंग्लिश सिनेमे, नाटके असे खूप बघितले. घरात बसूनच सर्व संवाद, गाणी ऐकायला येत असल्याने सर्व पाठच होत असे.

आमच्या वेगवेगळ्या शाळा होत्या. मी अहिल्यादेवी स्कूल फॉर गर्ल्स या सर्वांगिण प्रगतीसाठी प्रसिद्ध अशा शाळेत होते. शाळेतून, खेळ, फोक डान्स, अभ्यास, गाणे असे सर्व तऱ्हेचे शिक्षण आमचे शिक्षक-शिक्षिका उत्तम तऱ्हेने शिकवत. त्यांचे मुलींकडे बारीक लक्ष असायचे. सुट्टीमधे टिळक टँकवर पोहणेही शिकवत असत. एकदा PT झाल्यावर थांबशील, असे चिपळूणकर सरांनी सांगितलं. मी तर घाबरलेच होते; पण मला उंच उडीसाठी निवडले होते. प्रॅक्टिस सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे, शाळांच्या स्पर्धेत मी पहिली आले. मला मिळालेल्या मार्कांमुळे सर्व स्पर्धांमध्ये मिळणारी ढाल शाळेला मिळाली आणि मला एक कप मिळाला. पेपरमध्ये नाव, शाळेच्या मासिकामध्ये फोटो असे सर्व झाले.

त्याच वर्षी मुंबईला होणाऱ्या स्टेट लेव्हलच्या स्पर्धेत मला पाठवले आणि तिथेपण मी पहिली आले. तेव्हा आतासारखे नंबरवारी उभे करून गळ्यात मेडल घातले… हे खूप छान वाटले. पण घरीदारी कोणी फार कौतुक वगैरे केले नाही. मी पण लहान असल्याने त्याचे काही वाटलं नाही. पण आता मात्र मी नातवंडाना मी दोन वेळा ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले आहे, हे अभिमानाने सांगते. विशेष म्हणजे, आमच्या मुख्याध्यापिका सिंधू सावरकर या अत्यंत शिस्तप्रिय, ध्येयवादी अशा होत्या. इतरही सर्व शिक्षकवर्ग शाळेसाठी झोकून देऊन काम करत. आमच्या घराजवळील गोखले हॉलमधील वाचनालयात सर्व विषयांवरील भरपूर पुस्तके लहानपणापासून वाचायला मिळाली. हिंदी, संस्कृतच्या परीक्षापण त्या-त्या वयात दिल्याने खूप फायदा झाला. शाळेतच तिसरी-चौथीमध्ये 12वा आणि 15वा असे गीतेचे अध्याय पाठ झाले. आजोबांचं रोजचं पठण ऐकून रामरक्षा, भीमरूपी वगैरे रोज म्हटले जायचे. अशा प्रकारे बालपण सरले.

आता तेव्हाची अकरावी मॅट्रीक झाल्यावर लग्नाचे वारे सुरू झाले. वडिलांना माझी उंची आणि सावळा रंग यामुळे काळजी वाटत असावी; कारण मोठी बहीण छान गोरी होती, तिचे लग्न पटकन झाले. माझ्या लग्नाची गंमत आहे, बरं का! माझे सासरे तेव्हा येवला येथे SBIचे मॅनेजर होते, तिथेच वर मोठ्या हॉलमधे बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलाची बदली भारतात लांब-लांब ठिकाणी होते, चालेल ना? इतकेच सासऱ्यांनी विचारले; मी ‘हो’ म्हटले बाकी कोणी काहीच विचारले नाही. चार-पाच दिवसांनी लग्न ठरवायला येतो, असा निरोप आला. अरे बाप रे, पहिल्याच ठिकाणी लगेच असे काही होईल, असे वाटलेच नव्हते आणि ज्याच्याशी लग्न करायचे आहे, त्याची काय कमाल आहे, तीन भावंडे एका बाजूला उभी होती. त्यातला आपला होणारा नवरा कुठला, हे तर कळायला हवे ना? पण मुलगा CME मध्ये (College of Military Engineering) शिकला असून आर्मीत MESमध्ये (Military Engineering Services) आहे. निर्व्यसनी, सरळ मार्गी आहे म्हणून वडील खूश होते. त्यांनी सर्व चांगले आहे, असे सांगितले आणि आम्ही एकदम साखरपुड्यालाच भेटलो. 15 दिवसांतच लग्न झाले.

त्यावेळेस श्री. गोखले जामनगर येथे होते. पुढे खूप लांबचा प्रवास करत धाकट्या दीरांबरोबर जामनगरला गेले. छान टुमदार शहर आहे. उंटांच्या गाड्या, सबरी स्त्री-पुरुष, त्यांचा वेष वेगळा, खूप उंच असतात ते लोक. कँप एरिया तर खूपच छान असतो. आम्हाला छोटे-छोटे कॉटेजेस मिळाले होते. तेव्हा शेजारी तामिळ, तेलुगू, मल्याळम असे भारताच्या वेगळ्या प्रांतातील शेजारी असत. त्यामुळे खूप मजा येत असे. सगळ्यांचीच नवी-नवलाई होती. नंतर ह्यांची 1962च्या वॉरमुळे बॉर्डरवर बदली झाली. मी बाळंतपणासाठी पुण्याला गेले. नितीनचा जन्म 1962चाच आहे. नंतर उशिरा सर्व शांत झाल्यावर जवळ जवळ दीड-दोन वर्षांनी ह्यांनी नितीनला बघितले.

सासरे निवृत्त होऊन जळगाव येथे असल्याने आम्ही तिथेच होतो. 1965मध्ये आम्ही पुलगाव येथे बदलून गेलो. तेथेच 1967मध्ये अतुलचा जन्म. तिथे जरा शांततेत, मराठी लोक, काही कार्यक्रम असे सुरू होते. तिथे इनडोअर बॅडमिंटन कोर्ट होते. आम्ही दोघे, ह्यांचे ऑफिसर्स असें बॅडमिंटन खेळत असू. अशी अडीच वर्षं झाली नाहीत, तोच आमची अहमदाबाद येथे बदली झाली. तिथेच केदारचा जन्म झाला. आता आमचे पाच जणांचे कुटुंब झाले. मुले खूपच लहान असल्याने माझा वेळ कसा जायचा, हे समजायचेच नाही. मात्र, नितीनला दोन बसेस बदलून शाळेत जावे लागे. त्याला लहान वयातच फार लवकर मोठं व्हावं लागलं. पण तो अभ्यासात हुशार होता. त्याला गुजरातीसुद्धा छान यायला लागले. तिथेच त्याची तिसरी – चौथी झाली.

परत ह्यांची बदली आसाममध्ये झाली, मिसा येथे खूपच आतील भागात, म्हणजे आम्हाला हे ठिकाण नकाशात शोधावे लागले. हे सिव्हिल इंजिनिअर असल्याने क्वार्टर्स बांधण्यापूर्वी त्यांना साइटवर जावे लागे. त्यामुळे आमची वरात जळगाव येथे आली. पण त्यामुळे नितीनला परत मराठी शाळेत जावे लागले. तेव्हा तिथे इंग्लिश मीडियमच्या शाळाच नव्हत्या, एक वर्षाने आम्ही मिसा येथे गेलो. तिथे नावगाँग (22 मैलावर) येथे लॉयेला शाळेत आमच्या वनटन गाडीने अजून काही मुले जात असत. नितीनपण जाऊ लागला. तिथे आम्हाला सरकारने जागा देऊन ‘बादशाह’ बांधायला परवानगी दिली होती. बादशाह म्हणजे चटईला मातीचे लिंपण देऊन, वर चुना लावून, गवताचे छप्पर, चटईचीच दारे, छोट्या खिडक्या, पाया उंच करून चारी बाजूने ओसरी, अंगण, कंपाऊंड असे छान आत सर्व सोयी असलेले घर. मुलांसाठी झोकाही बांधला होता. रात्री अंगणात कोल्हे येत. जंगली हत्तींचे (20-22) कळप येत. त्यांचे मार्गावरील ठरलेले खूप मोठे झाड होते, त्याला ते अंग घासत असत. पौर्णिमेच्या रात्री पुढे मादी, मधे लहान पिल्ले आणि मागे परत मोठे हत्ती, असे दृश्य पाहायला मजा येत असे.

जवळच टी गार्डनही होते. तिथे आठवडी बाजार भरत असे. कोणला सांगितले तर, खरे वाटणार नाही इतक्या स्वस्त आणि ताज्या भाज्या असायच्या. तिथे गरीबी फार. एक रामा नावाचा 12-13 वर्षांचा मुलगा आमच्याकडे येत असे. तो मुलांशी खेळत असे आणि मला थोडीफार मदत करत असे.

मला जिथे जाऊ तेथील आनंद, खास करून निसर्ग आवडत असल्याने छान वाटायचे. अरे हो, ‘अहो’ आम्हाला तिथे ओपन एअरमध्ये आठवड्याला दोन सिनेमे दाखवायचे. त्याला टी गार्डनमधील कामगारपण येत. त्यांना तेवढाच आनंद मिळत असे. सर्व सुरळीत चालू असताना 1971ची लढाई सुरू झाली. मग काय शाळापण बंद. परत आमची रवानगी जळगावला. दमलात की नाही हे ऐकून? पुढे सर्व शांत झाल्यावर लोणावळा येथे INS शिवाजी येथे ह्यांची बदली झाली. तिथे सर्वच सुंदर होते. जवळ असल्याने सर्व नातेवाईक तेथे येऊन गेले. पण सर्व सुरळीत कुठे होते का? परत ह्यांची बदली अरुणाचलला, चायना बॉर्डरजवळ, लेखाबाली शीला पत्थर येथे झाली.

आता मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही देहूरोड येथे सेपरेटेड फॅमेली क्वार्टरमध्ये शिफ्ट झालो. मुलांना कधीच कुठलाही क्लास वगैरे नव्हता. नितीन तिथेच दहावी झाला. तो पुणे डिव्हिजनमध्ये इंग्लिश विषयात सर्वात जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी होता, पण हे आम्हाला उशिरा समजले.

चार वर्षं आम्ही तिथे होतो. माझे वडील पुण्याहून येत असत, त्यामुळे आम्हाला आधार होता. मधे एका सुट्टीत ह्यांच्याकडे (लेखाबाली) अरुणाचल येथे गेलो. रेल्वेने पाच दिवस लागत. पाच राज्यांतून आम्हाला जावे लागे. तेथे मेपासूनच पाऊस सुरू होतो आणि आम्हाला परत निघायचे होते. ब्रह्मपुत्रेचे अफाट पात्र पार करताना मोठ्या तराफ्यातून हत्ती, गुरेढोरे, माणसे… 1 टन, 3 टन असे सर्वांना घेऊन पलीकडे जावे लागते. सर्व भीतीदायकच असते. ते सर्व करून आम्ही लिलाबारी येथे विमान पकडायला आलो. तेव्हा डाकोटा विमाने असायची. प्रचंड आवाज यायचा. विजा – पाऊस यामुळे विमान खूप हलायचं. शेवटी पुढील प्रवासासाठी कलकत्ता येथे पोहोचलो. तेथून परत विमानाने व्हाया नागपूर-मुंबई असे गेलो.. असा आम्हाला अँडव्हेंचरस प्रवास वरचेवर करावा लागे.

आता 1980 साली यांची बदली नारंगी कँप गौहाटी येथे झाली आणि मुलांचे पुढील शिक्षण सुरळीत सुरू झाले. 1982मध्ये हे निवृत्त झाले. आसाम कार्बन या कंपनीत पुढील नोकरी सुरू झाली. 11 वर्षे आम्ही (सगळ्यात जास्त) गौहाटी येथे राहिलो. कंपन्यामध्ये, बँकेत, रिफायनरीत मराठी लोक बदलून येत. त्यामुळे श्रीगणेश उत्सव, दिवाळी, सहली असे बरेच कार्यक्रम होत असत. नितीनचे पत्रकारिता करिअर तिथेच सुरू झाले. अतुलही 12वी होऊन हॉटेल मॅनेजमेंट करायला भुवनेश्वर, ओरिसा येथे गेला. पुढे, 1988मध्ये कलकत्याच्या श्री. जोशी यांच्या मुलीशी नितीनचे कलकत्ता महाराष्ट्र मंडळामध्ये लग्न झाले. ती मंडळी मूळ जळगाव येथीलच असल्याने सर्व ओळखत होते. योगायोग दुसरे काय? आता केदारपण मुंबईला शिकत असल्याने आम्ही पुण्याला शिफ्ट झाले. 1994मध्ये अतुल आणि केदारचे लग्न होऊन सर्वजण पांगले. आमचे पेन्शनर आयुष्य सुरू झाले. त्यानंतर अनेक स्थित्यंतरे झाली, एव्हाना नितीन दिल्लीकर, केदार पुण्याला, अतुलही अनेक ठिकाणे फिरून येथेच आला.

आता आमचीही वयं वाढून तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. ह्यांच्या कट्ट्यावरील सुद्धा अनेकजण गळायला लागले होते. त्यातच 12 फेब्रुवारी 2020 मध्ये ह्यांचे देहावसान झाले. स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंग. 60 वर्षे एकमेकांसोबत असलेले आम्ही दुरावलो. या प्रसंगाला सहा-सात दिवस झाले असता, आपले पंतप्रधान श्री. मोदीजींनी मला सांत्वनपर लिहिलेले पत्र मिळाले. त्याही स्थितीत आश्चर्याचा धक्काच बसला. अजूनही मला तो क्षण आठवतोय. डोळ्यांतून येणारे अश्रू आवरत नव्हते. गोखलेही आर्मीमॅन होते. मोदीजींच्या स्वाक्षरीचे हे पत्र म्हणजे त्यांचा बहुमानच आहे, असे मला वाटते. सगळेच अनपेक्षित होते. केवळ आमचा मुलगा पत्रकार आहे, त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच इतक्या तत्परतेने भारताचे पंतप्रधान पत्र पाठवतात, हे सर्व कल्पनेपलीकडचे आहे. असे पंतप्रधान आपल्याला लाभलेत हे आपले भाग्यच आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. मीसुद्धा त्यांना धन्यवादाचे पत्र पाठविले.

माझे आयुष्य आता एका वेगळ्या वळणावर आले आहे. ‘ईश्वरेच्छा बलीयसी’, हेच खरे! मी स्वत: अत्यंत तृप्त, समाधानी आहे. मुले, सुना, नातवंडे सर्वच दृष्ट लागण्यासारखेच आहेत. सर्व गोष्टीचा आनंद घेण्याच्या वृत्तीमुळे फार त्रास होत नाही. आणखी काय पाहिजे? देवाने न मागता दिले आहे, त्याबद्दल त्याची अत्यंत ऋणी आहे.

Thank you बाप्पा!

यानिमित्ताने मी 83 वर्षांच्या आयुष्याची पुन्हा एकदा सफर केली.

कृतज्ञ मी, कृतार्थ मी…

Loading spinner
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!