Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeशैक्षणिकशाळांमध्ये पाहिजे माहिती संकलन प्रकल्प

शाळांमध्ये पाहिजे माहिती संकलन प्रकल्प

डॉ. किशोर महाबळ

माहिती संकलन हा ज्ञानप्राप्तीमधील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्याही विषयाचे अध्ययन उत्तम होण्यासाठी त्या विषयाबद्दल माहिती मिळविणे अतिशय गरजेचे असते. याच माहितीचे नंतर वर्गीकरण, विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. याच असंख्य निष्कर्षांमधून त्या विषयाचा विकास होत जातो. माहिती जेवढी अचूक तेवढी ती उपयुक्त ठरते. म्हणून, अचूक माहिती गोळा करणे अत्यावश्यक ठरते. माहिती कशी गोळा करायची, ती कशी नोंदवायची, याचे शास्त्र विकसित झाले आहे. माहिती संकलन शास्त्राचे काही प्राथमिक धडे शालेय स्तरावरच सर्व विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात.

कोणत्याही विषयाची अचूक माहिती ही त्या विषयाचे विविध भाग-उपविभाग समजून घेण्यास उपयुक्त ठरते. माहिती जितकी जास्त मिळेल आणि अचूकतेने नोंदविली जाईल, तितकी ती विषय समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. माहिती ही आपल्याला वस्तुस्थितीचे दर्शन घडविते, तसेच वस्तुस्थितीच्या कोणत्या पैलूबद्दल आपल्याजवळ माहिती नाही, हेही सुचविते. त्यामुळे नव्या संशोधनाला चालना मिळते. एका विषयाची माहिती ही अन्य विषयांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे विविध विषयांशी संबंधित माहिती संकलित करण्याचे कार्य संशोधन संस्था सातत्याने करीत असतात आणि त्यासाठी लक्षावधी रुपये खर्च केले जातात.

हेही वाचा – सर्व विद्यार्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करू द्या!

विकसित देशात शालेय स्तरावरच माहिती संकलित करणे शिकविले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर माहिती संकलित करण्यासाठी प्रोत्साहीत केले जाते. कोणत्याही विषयाचे विविध पैलू, विविध भाग, उपविभाग समजून घेण्यास माहिती जितकी जास्त मिळेल आणि अचूकतेने नोंदविली जाईल, तितकी ती उपयुक्त ठरते. विषय समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती संकलित करण्याची सवय असली पाहिजे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते.

आजकाल वर्तमानपत्रे सर्वत्र आणि स्वस्तात उपलब्ध होतात. खूप दिवसांची वर्तमानपत्रे रद्दीच्या भावात मिळू शकतात. वर्तमानपत्रात असंख्य विषयांवर माहिती, वृत्त, लेख प्रकाशित होत असतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींची माहिती प्रकाशित होत असते. विद्यार्थ्यांना या वर्तमानपत्रातून त्यांच्या आवडीच्या विषयांच्या बातम्या, लेख, चित्रे गोळा करण्यास सांगता येऊ शकते. गोळा केलेली ही कात्रणे तारखेनुसार विभागून एका वहीत चिकटवायला सांगता येईल. यातून माहिती संकलन कसे करायचे, हे विद्यार्थी शिकू शकतो.

प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या शैक्षणिक दर्जानुसार माहिती संकलनाचा प्रकल्प देता येऊ शकतो. हवामानासंबंधीची माहिती हा विषय घेतला तर, त्यातच तीन-चार विषय मिळू शकतात. तापमान, पर्जन्यमान, उन्हाळ्यातील चढते तापमान, पावसाळ्यात रोज पडणारा पाऊस, थंडीत घसरत चाललेले तापमान असे असंख्य छोटे-मोठे विषय रोजच्या वर्तमानपत्रात नोंदविले जातात. संगीतकार, क्रीडापटू, वेगवेगळ्या स्पर्धांमधील स्पर्धक, वैज्ञानिक, इतिहासातील घटना, महापुरूष अशा कोणत्याही विषयावर माहिती संकलन करता येते. विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यायचे. संकलित माहितीचा संग्रह असलेली वही तयार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, असा प्रयत्न करावा लागेल.

हेही वाचा – सर्व शिक्षकांची बौद्धिक प्रगती

प्रत्येक विद्यार्थ्याने माहिती संकलन करावे, असा उद्देश ठेवावा लागेल. या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना असंख्य गोष्टी शिकता येतील. आपल्या विषयासंबंधी माहिती वर्तमानपत्रात कुठे आली आहे, हे शोधावे लागेल. त्यासाठी वर्तमानपत्राची सर्व पाने बघितल्याशिवाय पर्यायच नसेल. विषयासंबंधित बातम्या, लेख यांची कात्रणे काढून ती तारखेनुसार लावावी लागतील. निवडलेल्या विषयाची माहिती शोधून सुसूत्रपणे संकलन करणे, माहितीचे स्रोत शोधणे, या माहिती संकलनातील मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकता येतील.

शाळेतील प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने विविध विषयांवर अशी माहिती संकलन केली तर, माहितीचा मोठा खजिना तयार होऊ शकेल. या विविध विषयांवरील माहिती संकलन असलेल्या संग्रहांचे शाळेत प्रदर्शनही आयोजित करता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परस्परांचे हे संकलन बघता येईल. यामुळे असंख्य विषयांचा त्यांना परिचय होऊ शकेल. विविध विषयांबद्दलची उत्सुकता वाढण्यास आणि मुख्यत: संशोधनाची सवय विकसित होण्यासाठीही हे सारे फायदेशीर ठरेल.

(‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण!’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!