Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललित...आणि मी "डॉक्टर" झालो!

…आणि मी “डॉक्टर” झालो!

चंद्रशेखर माधव

एक काळ होता आम्हा दोन-तीन मित्रांना, दर शुक्रवारी रात्री शनिशिंगणापूरला जायचं… पहाटे दर्शन घ्यायचं आणि शनिवारी दिवसा पुण्यात परत यायचं, अशी एक सवय लागली होती. आमच्यातला एक मित्र शनिशिंगणापूरचा भक्त होता. खरंतर, त्याला दर्शन घ्यायचं असायचं, पण आमच्यासाठी ती एक प्रकारे सहलच असायची.

असंच एकदा शुक्रवारी शनिशिंगणापूरला निघालो शनिवारी पहाटे पोहोचलो. पार्किंगमध्ये असंख्य वेगवेगळे स्टॉल आहेत, जिथे सर्व पूजा साहित्य मिळतं. त्यापैकीच हॉटेल आणि स्टॉल एकच होतं, त्या ठिकाणी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. आमचा एक मित्र अगदी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे ओल्या वस्त्राने दर्शनाला जात असे. आम्ही तितकेसे भक्त नव्हतो कदाचित, त्यामुळे आम्ही मात्र लांबूनच कोरड्या आणि पूर्ण वस्त्रानिशी दर्शन घेत असू. आमचा मित्र जेव्हा सर्व तयारी करायला गेला, त्यावेळी आम्ही स्टॉलपाशी उभे राहून गप्पा मारत होतो.

अचानक लक्षात आलं की, साधारण दहा-पंधरा फुटांवर काहीतरी गडबड सुरू आहे. काय झालं आहे, ते बघायला गेलो. गर्दी बाजूला करून बघितलं तर, खाटेवर साधारणपणे 60 ते 65 वयाचा एक वृद्ध इसम, धोतर नेसलेला, जखमी अवस्थेत दिसला. त्याच्या पोटरीला बऱ्यापैकी मोठी जखम झालेली होती. म्हणजे ती जखम साधारण पाच ते सहा इंच लांब आणि अर्धा इंच तरी खोल होती. उपस्थित लोकांना नेमकं काय करावं, ते सुचत नव्हतं.

चहूबाजूचा अंदाज घेतल्यावर दोन-तीन मिनिटांत असं लक्षात आलं की, खेडेगावातून एसटीच्या बसमधून सर्व गावकरी, सगेसोयरे शनिशिंगणापूर, शिर्डी अशा दर्शनाला निघालेले आहेत. बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही तिथे उपस्थित होते. दोघांचंही वय तसं लहानच, म्हणजे 25- 26 वर्षं असावं. त्यामुळे तेही गांगरून गेले होते. वेळ सुमारे रात्री एक-दीडची होती. त्यामुळे जवळपास कुठे डॉक्टर वगैरे मिळण्याची काही शक्यता नव्हती. एकूण परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर मी पुढे झालो. माझ्या एका मित्राने पटकन गाडीतून प्रथमोपचार साहित्य आणलं. आमचं सगळं संभाषण ऐकल्यानंतर तिथे उपस्थित मंडळींना जरा धीर आला.

प्रथमोपचार साहित्य आल्यानंतर त्या वृद्धावर उपचार केले. रक्तस्त्राव थांबला. जखम साफ करून पट्टी वगैरे बांधली. त्यांना निदान एका पायाने काठीच्या आधाराने थोडंफार चालता येईल इथपर्यंत आम्ही परिस्थिती आटोक्यात आणली.

हे सर्व होत असताना अचानक कुठूनसा 8-10 वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा तिथे येऊन हजर झाला. गर्दी बाजूला करून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला “वरल्या बाजूला योक दवाखाना हाये. डॉक्टर तितंच रहात्याय. मी बघू का जाऊन हायेत का?” साहजिकच मी त्याला “पटकन जा आणि बघ डॉक्टर आहेत का.” असं सांगितलं. हे ऐकल्यावर त्याने सायकल काढली .टेकडीच्या दिशेने उंचावर एका मिणमिणता दिवा असलेल्या घराकडे बोट दाखवून म्हणाला “तीतं हाय आहे दवाखाना. मी बघून येतो.” आणि सायकल काढून त्या दिशेने रवाना सुद्धा झाला.

थोड्यावेळाने डॉक्टर आहेत, असं कळल्यानंतर ड्रायव्हर-कंडक्टरला त्यांना डॉक्टरकडे नेण्याचा सूचना करून आम्ही दोघे मित्र दर्शनाकरता रवाना झालो. दर्शन घेऊन सुमारे वीस-पंचवीस मिनिटांनी बाहेर आलो.

यावेळी मात्र जखमी वृद्ध, ड्रायव्हर-कंडक्टर आणि बसमधील इतर लोकांचा तिथे मागमूस दिसत नव्हता. आम्ही दोघांनी विचार केला इतकं सगळं करून झालेलं आहे तर, परत पुण्याकडे निघण्यापूर्वी नेमके उपचार व्यवस्थित झाले आहेत ना आणि डॉक्टरचं काय म्हणणं आहे, हे एकदा प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन बघून यावं; म्हणून आम्ही दवाखान्याच्या दिशेने निघालो.

जसे आम्ही दवाखान्यात पोहोचलो तसे दरवाजा उघडताक्षणीच कंडक्टर आणि इतर एक दोन जण “डॉक्टर आले, डॉक्टर आले” असं म्हणून माझ्या दिशेने धावले आणि त्यातल्या एकाने वाकून माझे पाय धरायचा प्रयत्न केला. मी त्याला तिथेच थांबवलं आणि म्हणालो “मी डॉक्टर नाहीये.”

तिथे डॉक्टर नव्हताच, पण एक कंपाऊंडर होता. त्याने सगळी जखम तपासून काही गोळ्या दिल्या होत्या. एव्हाना त्या वृद्धालाही जरा हुशारी आली होती.

आम्ही कंडक्टरला, प्रवासात त्यांना मागच्या सीटवर झोपवून पायाखाली उशी वगैरे देण्याच्या मोघम सूचना केल्या आणि उजाडता क्षणीच चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परत एकदा जखम दाखवून,  गरज असल्यास, टाके घालून घेण्याच्या सूचना केल्या आणि मी तिथून निघायची तयारी केली.

निघायच्या वेळेला एकूणच तिथे उपस्थित असलेल्या चार-पाच प्रवाशांच्या आणि त्या वृद्ध इसमाच्या पत्नीच्या डोळ्यांमध्ये अत्यंत करुण असे भाव मला दिसले. खेडेगावातले आणि वृद्ध लोक असल्यामुळे एकूणच आभार वगैरे मानावे इतपत त्यांचं धाडस होत नव्हतं बहुतेक. पण त्यांच्या डोळ्यातले भाव मात्र बरंच काही सांगून गेले.

एक नवीन अनुभव गाठीशी घेऊन मी तिथून निघालो.

या अनुभवादरम्यान, निदान ते एक-दोन क्षण का होईना, मला डॉक्टर झाल्याचा भास झाला हे मात्र खरं आहे….!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!