Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतरव्यवहार तर एक पैशाचाही नाही, तरी बँकेचा ससेमिरा

व्यवहार तर एक पैशाचाही नाही, तरी बँकेचा ससेमिरा

जी. भालचंद्र

जवळपास सर्वांचाच बँकांशी संबंध येतो. कितीही ऑनलाइन व्यवहार झाले तरी, कुठे ना कुठेतरी बँक कर्मचाऱ्यांशी डोकं लावावंच लागतं. बँकांमधील काही अनागोंदी कारभाराशी संबंधित ‘बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामती’ या सदरातील माझा तिसरा अनुभव आता कथन करीत आहे.

हा अनुभव अशा बँकेबद्दल आहे की, ज्या बँकेबरोबर माझा कोणत्याही प्रकारच्या बँकिंग व्यवहाराशी संबंध आलेला नाही. तरीपण बँकेच्या व्यवहारात (?) मी भरडून निघालो होतो.

पंधरा वर्षांपूर्वी मी माझ्या घरी बीएसएनएलच्या टेलिफोनचं कनेक्शन घेतलं होतं. पण महिन्यातील 20 ते 22 दिवस टेलिफोन ‘आऊट ऑफ ऑर्डर’ रहात असल्यामुळे ऑगस्ट 2021मध्ये तो टेलिफोन मी बीएसएनएलला परत केला. नंतर घरात टेलिफोन कनेक्शन असावे म्हणून मी एका मोबाइल कंपनीचं प्रीपेड टेलिफोन कनेक्शन घेतले आणि त्या दिवसापासूनच माझे हाल सुरू झाले.

मला जो मोबाइल नंबर मिळाला होता (95xxxxxx62) तो नंबर 2016मध्ये कोणी रजनीश जंगम (नाव बदललेले आहे) नावाची व्यक्ती वापरत होती. त्या व्यक्तीने एका खासगी क्षेत्रातील “पहिल्या” बँकेकडून कर्ज घेताना हा नंबर बँकेकडे दिला होता. नंतर त्याने हा मोबाइल नंबर सरेंडर केला. त्या व्यक्तीने आपल्या कर्जाचे हप्ते चुकवण्यास सुरुवात केली होती म्हणून बँकेकडून, त्यांच्या कॉल सेंटरमधून आणि बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून मला वारंवार एसएमएस आणि टेलिफोन कॉल येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक एसएमएसमध्ये एक मोबाइल नंबर देऊन, त्याद्वारे बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे मी त्या अधिकाऱ्यांशी दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधत होतो आणि त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना देत होतो की, मोबाइल नंबर आता माझ्या नावावर आहे आणि तुम्हाला हवी असलेली व्यक्ती हा मोबाइल नंबर आता वापरत नाही.

जवळजवळ सात ते आठ अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले तरी एकही अधिकारी याबाबत योग्य ती कारवाई करू शकत नव्हता. फक्त मला एस आर/  केस नंबर देण्यात येत होता. बँकेच्या एका अधिकाऱ्याला मी विचारले की, तुम्ही मोबाइलवर एवढे माझ्यामागे लागले आहात, तर तुमचे रिकव्हरी एजंट त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचा थांगपत्ता का लावत नाही? तेव्हा मला उत्तर मिळाले की, त्या व्यक्तीचा कुठेही पत्ता लागत नाही. म्हणून आम्ही मोबाइल नंबरवरच त्या व्यक्तीचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण या त्यांच्या प्रयत्नात माझी डोकेदुखी वाढत होती.

म्हणून बँकेच्या कंप्लेंट ईमेल ऍड्रेसवर ई-मेल केल्यानंतर डिसेंबर 2021मध्ये उत्तरादाखल कस्टमर सर्व्हिस टीमच्या एका एक्झिक्युटिव्हकडून एक ईमेल आला (SR No.10xxxxx63). त्यात त्याने मला कळवले होते की, तो मोबाइल नंबर बँकेच्या रेकॉर्डमधून डिलीट करण्यात आला आहे. तेव्हा मला थोडेसे हायसे वाटले.

परंतु, येरे माझ्या मागल्याच… जून 2024पासून मला परत ई-मेल आणि टेलिफोन कॉल्स यायला सुरुवात झाली आणि त्यात मी न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास सांगण्यात येत होते. प्रत्येकवेळी त्यांना एकंदर परिस्थितीची कल्पना देऊन, हे सांगत होतो की, तुमच्याकडे रेकॉर्डमध्ये असलेला मोबाइल नंबर आता माझ्या नावावर आहे आणि या मोबाइल नंबरशी रजनीश जंगम या व्यक्तीचा काहीही संबंध नाही. परंतु बँकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला मी सांगितलेला खुलासा पटत नव्हता.

बँक आणि बँकेच्या रिकव्हरी एजंटकडून मला एसएमएस आणि टेलिफोन कॉल येणे सुरू होते. 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास मला बँकेच्या कॉल सेंटरमधून 91xxxxx935 या मोबाइल नंबरवरून एका मुलीने कॉल केला आणि घेतलेल्या कर्जाची रक्कम त्वरित फेडण्याची धमकी देऊन अत्यंत अश्लील भाषेत संभाषण केले.

शेवटी मी बँकेच्या चीफ मॅनेजरशी संपर्क करून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. पण त्यांनी एक आश्चर्यजनक प्रस्ताव मला दिला. ते म्हणाले की, जो मोबाइल नंबर मी सध्या वापरत आहे, तो त्यांच्या रेकॉर्डमधून डिलीट करण्यासाठी मी माझे आधार कार्ड आणि पॅन कार्ड कॉपी बँकेला सबमिट करावी. यासाठी मी पूर्णपणे असहमती दर्शवली कारण माझा त्या “पहिल्या” बँकेशी कोणत्याही प्रकारेच्या बँकिंग व्यवहाराशी संबंध नव्हता.

परंतु टेलिफोन कॉल येणे किंवा एसएमएस येणे थांबलेच नव्हते. यामुळे मला प्रचंड मनस्ताप होत होता. शेवटी त्यांना निर्वाणीचा इशारा दिला की, मला जर परत कॉल आले ते अनसॉलिसिटेड कॉल आहे, असे मानून मी डीओटीकडे तक्रार करेन.

शेवटी जानेवारी 2025पासून कॉल किंवा एसएमएस येणे बंद झाले आहे. पण परत केव्हा कॉल किंवा एसएमएस येतील याचा भरवसा नाही.

तेव्हा बँक ग्राहकांनो सावधान…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!