Friday, August 1, 2025

banner 468x60

HomeललितKavi Grace : 'ती गेली तेव्हा...'च्या निमित्ताने

Kavi Grace : ‘ती गेली तेव्हा…’च्या निमित्ताने

मानसी देशपांडे

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून स्त्रीचं निघून जाणं म्हणजे त्याच्या आयुष्याची तप्तपदी झाल्यासारखं असतं. मनाची ही असह्य अवस्था पुरुष रडून सांगू शकत नाही किंवा असं म्हणूया की, ती तो व्यक्त करू शकत नाही. मी आज हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, कवी ग्रेस यांची “ती गेली तेव्हा रिमझिम…” ही कविता. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात, “वियोगाची दहशत एका क्षणात रंगपंचमीची धुळवड करते…” मनातलं दुःख हे कवी ग्रेस  यांनी आपल्या कवितेतून अत्यंत काळजाला स्पर्श करणाऱ्या शब्दांतून मांडलं आहे –

“ती गेली तेव्हा रिमझिम,
पाऊस निनादत होता…”

आयुष्यातून प्रिय व्यक्ती जेव्हा अचानक निघून जाते, तेव्हा मनाला सावरणं खूप अवघड असतं. कारण, त्या व्यक्तिशी भावनिक भावबंध जोडलेले असतात. तिच्या जाण्याचं दुःख हे इतकं असह्य आहे की, त्या व्याकुळ अवस्थेत सुचलेल्या या ओळी असाव्यात. रसिकांना खेचून घेतील अशा या ओळी… इथे व.पु. काळे यांचा अजून एक विचार मनात येतो, “अश्रू हे कितीही प्रामाणिक असले तरी त्यांच्यात भूतकाळ परत आणण्याची ताकद नसते…” कवीची प्रतिभा या कडव्यात बघा कशी समोर येते.. मनाचा झालेला कोंडमारा मांडताना कवी ग्रेस देखील आपल्या भावनांना आवरू शकले नाही. “घन व्याकुळ मीही रडलो…” आयुष्यात आई सोबत नाही, ही एकाकीपणाची जाणीव सारखी कवीला होत आहे.

“ती आई होती म्हणुनी,
घन व्याकुळ मीही रडलो…”

हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात

ग्रेस यांच्या प्रतिभेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विरह हा कोणाचाही असो तो वाईटच… पुरुषांचं मन हे देखील कधीतरी कोलमडून जातेच, जेव्हा आयुष्याला अर्थ देणाऱ्या व्यक्तीचा त्यांना विरह सहन करावा लागतो. तोच हुंदका या कवितेत दिसतो. व.पुं.नी म्हणूनच ठेवले आहे, “समजूत घालणारं कुणी भेटलं की, हुंदके अधिक वाढतात…” मन हे जेव्हा एकाकी होते, तेव्हा जवळ आपली व्यक्ती लागतेच. मनातले हुंदके किती काळ मनात ठेवणार?

“अंगणात गमले मजला,
संपले बालपण माझे,
खिडकीवर धुरकट तेव्हा,
कंदील एकटा होता…”

एकाकी मनाला कंदिलाची दिलेली उपमा आपल्याला नि:शब्द करते. खरंच, आवडत्या व्यक्तीचा झालेला विरह अंतर्मुख करणारा ठरतो. मुळात, स्त्रीचं आयुष्यातून निघून जाणं म्हणजे कधीही न भरून निघणारी पोकळी असते. कारण, तिचं रूप कोणतंही असलं तरी त्यातील प्रेम हे कधीच संपत नाही. ती आई असेल तर तिथे ममत्व असते. ती पत्नी झाल्यावर मैत्रीण देखील होते. तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं की, एकाकीपणाची जाणीव देखील होत नाही. पण तिचे कायमस्वरूपी मिटलेले डोळे मात्र तिच्यासोबत घालवलेले श्वास आणि सहवास परत देऊ शकत नाही हे खरे… म्हणून तर व.पु. म्हणतात, “ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते…” पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी हे गीत गाऊन त्याला चारचांद लावले आहेत. काय ते काळजाला हात घालणारे शब्द, कवी ग्रेस यांची प्रतिभा… निव्वळ अप्रतिम!!! ग्रेस यांच्या काही ओळी –

“तू मला कुशीला घ्यावे,
अंधार हळू ढवळावा,
संन्यस्त सुखाच्या काठी,
वळीवाचा पाऊस यावा…”

हेही  वाचा – कवी ग्रेस अन् “भय इथले संपत नाही…” कविता

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!