डॉ. किशोर महाबळ
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संगणकाच्या माध्यमातून माहितीच्या महाजालात म्हणजे इंटरनेटमध्ये प्रवेश करता येतो आणि अक्षरशः कोट्यवधी विषयांची माहिती, संकल्पना, सिद्धांत, विचार, ज्ञान, कल्पना यांचे ज्ञान मिळविणे आता कोणालाही सहज शक्य झाले आहे. संगणक आणि इंटरनेटच्या सुविधेची उपयोग करणारी व्यक्ती अशाच सुविधेचा उपयोग करणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तीशी, संस्थेशी, लोकांच्या गटाशी काही क्षणांत सहजगत्या संपर्क साधू शकते. तसेच, इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्तीव्यक्तींमध्ये, गटागटांमध्ये, संस्थांमध्ये आणि राष्ट्राराष्ट्रांमध्ये क्षणार्धात हव्या तेवढ्या माहितीचे आदानप्रदान करणे शक्य होऊ लागले आहे. आता कोणत्याही विषयाचे मर्यादित स्वरूपात का होईना, पण ज्ञान मिळविणे हे कोणालाही सहजगत्या शक्य होऊ लागले आहे. या इंटरनेट क्रांतीमुळे एका विशिष्ट स्तरापर्यंत, असंख्य विषयांचा घरबसल्या अभ्यास करणे सहज शक्य झाले आहे. हे सगळे बदल अभूतपूर्व असे आहेत.
माहिती तंत्रज्ञानाने घडवून आणलेली ही क्रांती अध्ययन आणि अध्यापनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ठरणार आहे. विकिपीडिया यासारखे असंख्य प्रकारचे विश्वकोश आणि मराठी विश्वकोशासारखे प्रादेशिक भाषेतील असंख्य विश्वकोश आता सहजगत्या उपलब्ध आहेत. यात असंख्य विषयांबद्दल भरपूर माहिती उपलब्ध झालेली आहे. याशिवाय, विविध भाषांचे शब्दकोश, समानार्थी शब्दांचे कोशही उपलब्ध आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकता आणि बौद्धिक पातळी लक्षात घेऊन असंख्य विषयांवर दृकश्राव्यस्वरुपात माहिती देणाऱ्या हजारो चित्रफिती उपलब्ध आहेत. याशिवाय, विविध विषयांवरील अक्षरश: अब्जावधी चित्रे आणि फोटो वेगवेगळ्या वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत. यापैकी, बरेचसे शैक्षणिक साहित्य हे त्या त्या विषयांतील तज्ज्ञांनी तयार केलेले आहे. जगातील नामवंत विद्यापीठांच्या वेबसाइटवर दृकश्राव्य चित्रफितींशिवाय असंख्य अभ्यासपूर्ण लेखही वाचायला मिळतात. जगातील नामवंत साहित्यिकांची गाजलेली पुस्तकेही काही वेबसाइटवर वाचायला मिळू शकतात. जगभरातील नामवंत संगीतकारांची, गायकांची गाणी, संगीतरचना, इंटरनेटमुळे सहजगत्या जगभर कुठेही ऐकता येऊ शकतात. सर्व प्रकारच्या खेळांची माहिती, त्या खेळासंबंधीच्या चित्रफिती आज इंटरनेटवर सहजगत्या उपलब्ध आहेत. याशिवाय, काही वेबसाइटसच्या माध्यमातून विविध विषयांचे अभ्यासक आणि तज्ज्ञ हे संशोधकांना संशोधनात मार्गदर्शनही करतात.
हेही वाचा – Education : शिकण्याची नेमकी गरज काय?
जीवनाला समृद्ध करणाऱ्या, ज्ञानात भर घालणाऱ्या, निखळ मनोरंजन करणाऱ्या अक्षरशः अगणित गोष्टी विविध वेबसाइटवरून मिळविता येऊ शकतात. सर्जनशीलपणे अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना हा खजिना आता सहजगत्या उपलब्ध झाला आहे. विविध रंग, आकृत्या, चित्रे यांचा उपयोग करून तयार केलेल्या चित्रफलकांच्या माध्यमातून विषय शिकविला तर, तो जास्त काळ लक्षात राहतो. चित्रफिती, ध्वनिफिती यासारख्या दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग करून अध्यापन केल्यास ते अधिक प्रभावी होते, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने सिद्ध केले आहे. दृकश्राव्य माध्यमांच्या उपयोगामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो आणि त्यामुळेच शिकलेला विषय त्यांच्या जास्त काळ लक्षात राहतो, हेही मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. शिक्षकांनी नकाशे, चित्रफलक, तक्ते तयार करावेत असे आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणूनच सांगते!
सुंदर हस्ताक्षर नसणाऱ्या तसेच चित्रकला न येणाऱ्या शिक्षकांना असे चित्रफलक, तक्ते तयार करणे हे अत्यंत त्रासदायक काम वाटते. म्हणूनच बहुतांश शिक्षक बीएड, डीएडची पदवी मिळविण्यापुरते तक्ते तयार करतात आणि नंतर तक्ते करणे गरजेचे आहे, हे नंतर विसरूनच जातात. शिवाय एकदा तयार केलेले तक्ते पुन्हा तयार करणे, हे जिकरीचे काम असते.
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे तयार तक्ते मिळतात पण शिक्षकांना अपेक्षित असे ते तक्ते असतीलच असे नाही. संगणकाने मात्र हे काम आता अत्यंत सोपे करून टाकले आहे.
संगणकाच्या मदतीने असंख्य प्रकारचे रंग, आकृत्या, चिन्हे, चित्रे, अक्षरांचे विविध प्रकार तसेच विविध आकार वापरून अभ्यासाच्या विषयांची माहिती, संकल्पना, विचार स्पष्ट करणारे आकर्षक चित्रफलक, तक्ते तयार करता येऊ शकतात. आवश्यकता पडल्यास या तक्त्यांमध्ये केव्हाही बदल करता येऊ शकतात आणि छपाई यंत्राद्वारे त्या तक्त्यांच्या हव्या तेवढ्या प्रति, हव्या त्या आकारात तयार करता येऊ शकतात. हे तक्ते संगणकात साठवून ठेवता येऊ शकतात आणि आवश्यकता असेल तेव्हा पुन्हा उपयोगात आणता येऊ शकतात.
हेही वाचा – NCC… शिबिरार्थी होण्याचा अपूर्व अनुभव
संगणकाच्या आणि प्रोजेक्टरच्या मदतीने हे तक्ते पडद्यावर दाखविता येऊ शकतात. त्यासाठी संबंधित विषय आणि त्यातील मुद्दे दाखविणाऱ्या स्लाइड्स संगणकावर तयार करता येऊ शकतात. या स्लाइड्सच्या माध्यमातून विषयाची माहिती, त्यासंबंधीचे फोटो, चित्रे, चित्रफिती, आकर्षक पद्धतीने सादर करता येऊ शकतात. यालाच ‘पीपीटी प्रेझेंटेशन’ असे म्हटले जाते. संगणकाचा उपयोग करण्याचे मूलभूत ज्ञान जर मिळविले तर, असे प्रेझेंटेशन तयार करणे अत्यंत सोपे आणि अत्यल्प खर्चात शक्य आहे.
संगणकाचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग केला तर कोणताही विषय अत्यंत आकर्षक पद्धतीने शिकविता येऊ शकतो. संगणकामुळे मुख्यतः दृकश्राव्य पद्धतीने उत्तम आनंददायी असे अध्यापन करता येऊ शकते. संगणक महाग असतात आणि इंटरनेटच्या सेवेसाठी खूप खर्च येतो, असा आक्षेप शिक्षक घेऊ शकतात. पण आपले अध्यापन उत्तम व्हायला हवे, असे ज्या शिक्षकाला वाटत असेल आणि ज्याला व्यवस्थित पगार मिळत असेल, असा शिक्षक संगणक विकत घेण्यासाठी तसेच इंटरनेटवरील खर्च हा अत्यंत आवश्यक असा खर्च आहे असेच मानेल.


