सुहास गोखले
सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती 27.3 दिवसांत एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे 27 भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आकाशस्थ नक्षत्रांसंदर्भातील लेखमालेचा हा पाचवा भाग. आतापर्यंतच्या चार लेखांमध्ये अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, फाल्गुनी आणि हस्त या नक्षत्रांची माहिती घेतली. आज आपण पुढच्या दोन नक्षत्रांची माहिती पाहुया.
चित्रा : हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल, तिचेच नाव चित्रा. उत्तर इजिप्शियनांच्या एका लोककथेनुसार इसिस ही देवता टायफून नावाच्या दैत्यावर स्वार होऊन जात होती. तिच्या हातात मक्याचे कणीस होते. टायफूनच्या झंझावाती वेगामुळे तिच्या हातातील कणीस पडले. इसिस या देवतेला कन्या म्हणून स्थान मिळाले तर, तिच्या हातून खाली पडलेल्या मक्याच्या कणसाचे दाणे विखुरले आणि त्याची आकाशगंगा तयार झाली. त्या आकाशगंगेतून लक्षावधी तारकांचे पीक फुलून आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी आदिवासी लोक या नक्षत्रास ‘चित्ता’ म्हणतात.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
स्वाती : चित्रा नक्षत्राच्या थोडे उत्तरेकडे पाहिल्यास काही अंतरावर आपणास अगदी चित्रासारखीच दुसरी एक टपोरी चांदणी चमकताना आढळेल. चित्रानंतर आपणास हीच अशी चांदणी आढळेल की, जी चटकन नजरेत भरते. ही चांदणी म्हणजे स्वाती नक्षत्र. तिच्या तेजामुळे हे नक्षत्र ओळखण्यास सोपे जाते.
दुसऱ्या प्रकारे हे नक्षत्र शोधावयाचे असल्यास उत्तर धृवाशेजारी असलेल्या सप्तर्षी या तारकासमूहातील शेवटच्या दोन तारकांना धरून पूर्वेकडे एक सरळ काल्पनिक रेषा काढल्यास ती बरोबर स्वाती नक्षत्रास येऊन मिळते. स्वातीलाच काही ठिकाणी आदिवासी लोक ‘स्वहाती’ असेही म्हणतात. त्याबद्दलची त्यांची कल्पना अशी की, स्वाती नक्षत्रात पाऊस पडल्याने समुद्रातील शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. म्हणजे, परमेश्वर स्वतःच्या हाताने स्वाती नक्षत्रातील पावसाचे थेंब मोती तयार करण्यासाठी शिंपल्यामध्ये भरतो.
हेही वाचा – नक्षत्र रोहिणी, मृग, आद्रा अन् पुराणकथा…!
(लेखक निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)