वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोsपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥22॥
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥144॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥23॥ अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥24॥
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥145॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥25॥
हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥146॥ अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥147॥ हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥148॥ हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना। निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥149॥ हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु । अनादि अविकृतु । सर्वरूप ॥150॥ अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥151॥
अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥26॥
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी । तर्ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥152॥ जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥153॥ तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मिनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥154॥ इयें तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥155॥ म्हणोनि हे आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी ॥156॥ ना तरी हे अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥157॥ तरी येथ कांही । तुज शोकासि कारण नाहीं । जे जन्ममृत्यु हे पाहीं । अपरिहर ॥ 158॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च। तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां अर्जुना आणिक कांही एक सांगेन मी आइक…
अर्थ
ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन घेतो, त्याप्रमाणे आत्मा जीर्ण शरीरे टाकून देऊन दुसरी नवी प्राप्त करून घेतो. ॥22॥
ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. ॥144॥
याला (आत्म्याला) शस्त्र तोडीत नाहीत, अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही आणि वारा सुकवीत नाही. ॥23॥ या आत्म्याचा छेद होणे, दाह होणे, तो आर्द्र होणे आणि शुष्क होऊन जाणेही अशक्यच आहे. हा नित्य, सर्वव्यापी, स्थिर, अचल आणि सनातन आहे. ॥24॥
हा आत्मा अनादी, नित्यसिद्ध (शाश्वत असणारा), उपाधिरहित आणि अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगाने घात होत नाही. ॥145॥
हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य आणि अविकारी असल्याचे म्हटले आहे. म्हणून याला याप्रकारे (सकलात्मक) जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही. ॥25॥
हा (आत्मा) प्रलयकाळाच्या पाण्याने बुडत नाही, हा अग्नीने जळणे संभवत नाही. येथे वायूच्या महाशोषणशक्तीचा प्रभाव चालत नाही. ॥146॥ अर्जुना, हा नित्य, स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी भरलेला असा आहे. ॥147॥ अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. ध्यान तर याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते. ॥148॥ हा मनाला नेहमी दुर्लभ आहे आणि साधनाला प्राप्त न होणारा (आहे.) हा पुरुषोत्तम अनंत आहे. ॥149॥ हा (सत्वादि) तीन गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादि, विकार न पावणारा आणि सर्वव्यापी आहे. ॥150॥ अर्जुना, असा हा आहे, हे लक्षात घे. हा सकालात्मक आहे, हे ओळख. मग तुझा हा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल. ॥151॥
हे महाबाहो, हा आत्मा नेहमी (प्रत्येक देहोत्पत्तीच्य वेळी) जन्म पावतो आणि नेहमी मृत्यू पावतो, असे जरी मानलेस तरीदेखील शोक करणे तुला योग्य नाही. ॥26॥
अथवा हा असा आहे, हे न जाणता तू (हा) नाशवंतच आहे असे जरी मानलेस, तरी अर्जुना, तुला शोक करणे उचित नाही. ॥152॥ कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ती स्थिती आणि नाश यांचा क्रम अखंड आहे. ॥153॥ ते (गंगाजल) उगमस्थानी तुटत नाही, (त्याची उत्पत्ती एकसारखी सुरूच असते) व शेवटी समुद्रात तर एकसारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते, ॥154॥ त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तिन्ही बरोबरच असतात, असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबविता येत नाहीत. ॥155॥ म्हणून या सगळ्यांचा शोक करण्याचे येथे तुला कारण नाही; कारण मुळापासूनच स्वभवत: अशी ही व्यवस्था चालत आलेली आहे. ॥156॥ अथवा अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्यूच्या अधीन आहे, असे पाहून जरी हे (वरील म्हणणे) तुझ्या मनाला येत नसेल ॥157॥ तरी पण त्यात तुला शोक करण्याचे कारण नाही. (कारण) असे पहा की हे जन्ममृत्यु हे टाळता न येणारे आहेत. ॥158॥
कारण की, उत्पन्न झालेल्याला नि:संशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला निःसंशय जन्म आहे. म्हणून अटळ अशा गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. ॥27॥
क्रमश:
(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं धरूनि देहाभिमानातें…